Tuesday, 16 January 2018

विद्यार्थ्यांना एकमेकांबद्दल जाणून घेताना संपूर्ण देशाच्या संस्कृतीचे दर्शन घडते - प्र-कुलगुरु डॉ.डी.टी.शिर्के



 कोल्हापूर दि.१६ जानेवारी - राष्ट्रीय एकात्मता यात्रेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात एकमेकांबद्दल जाणून घेताना संपूर्ण देशाच्या संस्कृतीचे दर्शन घडते, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ.डी.टी.शिर्के यांनी केले.

    शिवाजी विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहामध्ये राष्ट्रीय एकात्मता यात्रा-२०१८ च्या माध्यमातून आलेल्या भारतातील ईशान्य राज्यातील विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात आला.  त्याप्रसंगी विद्यार्थी विकास मंडळाच्यावतीने आयोजित 'विद्यार्थी संवाद' या कार्यक्रमामध्ये विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ.डी.टी.शिर्के बोलत होते. यावेळी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.विलास नांदवडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्र-कुलगुरु डॉ.डी.टी.शिर्के पुढे म्हणाले, प्रत्येक दिवशी आपण काहीतरी शिकत राहतोच.  शिक्षण ही प्रगल्भता वाढीची प्रक्रीया आहे. विविध ठिकाणची निसर्ग संपदा, भौगोलीक प्रदेश, विविधतेतील लोकजीवन, बदलते तंत्रज्ञान, नवीन संशोधन याची माहिती प्राप्त करुन घेताना देशाची एकात्मता विद्यार्थ्यांच्या माध्यमातून अधिक दृढ होते.

प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना पूर्वोत्तर क्षेत्रीय संघटन मंत्री निरव घेलाणी म्हणाले, या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध राज्यांमधील लोकजीवनाची अनुभूती मिळते. देशातील अन्य राज्यातील विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी ही यात्रा उपयुक्त आहेे. 1966 पासून सुरु झालेल्या या यात्रेमधील विद्यार्थी आज देशातील विविध उच्च पदांवर विराजमान आहेत.

अरुणाचल प्रदेश येथील विद्यार्थी बेन्जोंग आपल्या मनोगतामध्ये म्हणाले, अनेक वैशिष्टयाने भरलेले हे विद्यापीठ अद्वितीय नैसर्गिक सौंदर्यांने बहरलेले आहे.  निश्चितच आमच्यापेक्षा हे वेगळे आहे.  येथील लोकांमधील सकारात्मक ऊर्जा, लोकांचे प्रेम, स्नेह, आदरातिथ्य, संस्कृती, वातावरण, या आठवणी कायमस्वरुपी आमच्या स्मरणात राहतील.

ईशान्य राज्यातील विध्यार्थ्यानी लीड बॉटॉनिकल गार्डनची पाहणी केली
मेघालय येथील विद्यार्थींनी निशा पाल आपल्या मनोगतामध्ये म्हणाल्या, विद्यापीठातील संगीत अधिविभाग, अद्यावत विद्यापीठ ग्रंथालय, वनस्पतीशास्त्र अधिविभागामधील बोटोनिकल गार्डन हे पाहून विद्यापीठ आधुनिक तंत्रज्ञानासह किती निसर्गसंपन्न आहे, याची जाणीव आम्हा सर्वांना होते.  शिवाजी विद्यापीठाचा परिसर आम्हाला खूप आवडला.

निर्भय विसपुते यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी आंतरराज्य छात्र जीवन दर्शन माहितीपट  दाखविण्यात आले.

विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ.आर.व्ही.गुरव यांनी प्रास्ताविक केले.  कु.क्रांती शेवाळे यांनी आभार मानले. यावेळी भारतातील ईशान्य राज्यातून आलेले विद्यार्थी विद्यापीठातील विविध अधिविभागातील विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

------

No comments:

Post a Comment