Friday 15 December 2017

स्वातंत्र्यासाठी एकत्र येऊन लढल्यामुळेच भारतीय संस्कृती अबाधित - प्रा.डॉ.मार्क डेव्हिड ब्राऊन

                                   





कोल्हापूर दि.१४ डिसेंबर - अमेरिकेमधील विविध प्रांतांनी स्वातंत्र्य प्राप्तीसाठी स्वतंत्ररित्या लढले आणि नंतर एकत्र आले. भारतातील विविध संस्थाने, महात्मा गांधीजी आणि इतर स्वातंत्र्य सैनिकांच्या हाकेला प्रतिसाद देत या ठिकाणच्या सर्व जातिधर्मातील लोकांनी एकत्र येवून स्वातंत्र्य प्राप्तीसाठी लढा दिला. त्यामुळे भारताला आपली संस्कृती जपणे शक्य झाले. मात्र अमेरिकेवर ब्रिटिश संस्कृतीची छाप कायम आहे, असे प्रतिपादन अमेरिकेतील वॉशिंग्टन स्टेट युनिव्हर्सिटीचे ज्येष्ठ विधिज्ञ प्रा.डॉ.मार्क डेव्हिड ब्राऊन यांनी आज येथे केले.
प्रा.डॉ.मार्क डेव्हिड ब्राऊन
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या 'ग्लोबल इनिशिएटिव्ह ऑफ ॲकॅडेमिक नेटवर्क' (ग्यान) उपक्रमांतर्गत 'अंडरस्टैंडिंग द अलॉकेशन ऑफ पॉवर अंडर द युनायटेड स्टेट्स अँड इंडियन कॉन्स्टिटयूशन : अ कम्पॅरॅटिव्ह ॲनालिसीस' या विषयावर प्रा.डॉ.ब्राऊन यांचे विशेष व्याख्यान विद्यापीठाच्या बॅ.बाळासाहेब खर्डेकर ग्रंथालयाच्या व्हर्चुअल क्लासरुममध्ये आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ.डी.टी.शिर्के उपस्थित होते.
प्रा.डॉ.ब्राऊन अमेरिका व भारतीय संविधानाचे तुलनात्मक विश्लेषण आजपासून 20 डिसेंबर पर्यंत व्याख्यानांद्वारे करणार आहेत. 'ग्यान' उपक्रमाअंतर्गत ही सातवी कार्यशाळा विद्यापीठामध्ये आयोजित करण्यात आली आहे.
         प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना कोल्हापूर न्यायालयाचे प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश एम.ए.लव्हेकर म्हणाले, अन्याय, अत्याचार, हिंसा आणि शोषणाविरुध्द लढा देताना न्यायपालिकांनी महत्वपूर्ण अशी सकारात्मक भूमिका घेणे आवश्यक आहे.
यावेळी अध्यक्षस्थानावरुन बोलताना प्र-कुलगुरु डॉ.डी.टी.शिर्के म्हणाले,'एमएचआरडी'द्वारे देशातील वीस निवडक विद्यापीठांना अनुदान देण्यात येणार आहे. त्यामुळे 'ग्यान'सारखे विशेष उपक्रम विद्यार्थ्यांसाठी राबविणे विद्यापीठांना शक्य होणार आहे.
विद्यापीठाच्या 'ग्यान' उपक्रमाचे समन्वयक डॉ.आर.के.कामत यांनी उपक्रमाची माहिती विशद केली. अभ्यासक्रम समन्वयक डॉ.व्ही.वाय.धुपदाळे यांनी स्वागत व पाहुण्यांचा परिचय करुन दिला.
यावेळी कायदे सल्लागार डॉ.संतोष शहा, डॉ.भारती पाटील, ॲड.अनुष्का कदम, ॲड.संजय पाटील तसेच विधी अधिविभाग व समाजशास्त्र अधिविभागाच्या विद्यार्थ्यांसमवेत मुंबई, चेन्नई, बिहार येथून आलेल्या विद्यार्थ्यांची विशेष उपस्थिती होती.
-----







      




No comments:

Post a Comment