Monday, 27 November 2017

संविधानाचा नियमित अभ्यासक्रमात समावेश आवश्यक

शिवाजी विद्यापीठातील परिसंवादात सूर



 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन केल्यानंतर (डावीकडून) डॉ. एस.एस. महाजन, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, डॉ. राजेंद्र कुंभार, प्रा. सुभाष दगडे व डॉ. रविनंद होवाळ.


शिवाजी विद्यापीठात आयोजित परिसंवादात उपस्थितांसमोर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनपट मांडताना रेहान शकील नदाफ हा बालक.

कोल्हापूर, दि. २७ नोव्हेंबर: भारतीय संविधानाविषयी नागरिकांत जास्तीत जास्त जागृती करण्याची गरज असून संविधानाचा नियमित अभ्यासक्रमात समावेश करणे आवश्यक आहे, असा सूर शिवाजी विद्यापीठात आज झालेल्या परिसंवादात व्यक्त झाला.
भारतीय संविधान दिनानिमित्त विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्राच्या वतीने भारतीय संविधान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या विषयावर विशेष परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. परिसंवादात डॉ. रविनंद होवाळ (सोलापूर), प्रा. सुभाष दगडे (सांगली) आणि डॉ. राजेंद्र कुंभार (सातारा) यांनी सहभाग घेतला. अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के होते.

क्रांतीचे चक्र पूर्ण फिरविणे आवश्यक: डॉ. कुंभार
Dr. Rajendra Kumbhar
या प्रसंगी बोलताना डॉ. राजेंद्र कुंभार यांनी बाबासाहेबांच्या क्रांतीचे चक्र अर्धेच फिरले आहे, या विधानाचा संदर्भ दिला आणि म्हणाले की, भारताचा हा अर्धा प्रवास एक व्यक्ती, एक मत इतकाच झाला आहे. अद्याप एक मत, एक मूल्य हा प्रवास पूर्ण करून क्रांतीच्या चक्रास पूर्णत्व प्रदान करावयाचे आहे. माहीतगार आणि नीतिमान लोकांचा समूहच देशाला खऱ्या लोकशाहीपर्यंत घेऊन जाईल. त्या दृष्टीने अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना केवळ साक्षर होण्याचे नव्हे, तर मनुष्य होण्याचे शिक्षण देण्याची गरज आहे. सामाजिक समता ही आपोआप प्रस्थापित होणारी बाब नसून त्यासाठी शिक्षणाची पुनर्मांडणी करण्याची गरज असून नीतिमानतेचे प्रशिक्षण देणेही आवश्यक आहे. त्यासाठी महात्मा फुले, एम.एन. रॉय आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सत्य हे मूल्य मानणाऱ्या विचारसरणीचा अभ्यासात समावेश आवश्यक आहे. राजकीय स्वातंत्र्यापेक्षा सामाजिक व आर्थिक स्वातंत्र्य व समता प्राप्त करण्यासाठी संघर्ष अटळ आहे. त्यासाठी सर्वच स्तरांवरील शिक्षण मोफत करण्याची गरज असून ज्ञानाची ऊर्जाकेंद्रे असलेल्या विद्यापीठांनी त्यासाठी प्रयत्न करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.

शिक्षणव्यवस्था विज्ञानवादी व्हावी: प्रा. दगडे
Prof. Subhash Dagade
प्रा. सुभाष दगडे यांनी संविधानास अभिप्रेत असणारे लोककल्याणकारी राज्य आणि शिक्षणव्यवस्थेमधील सुधारणा या दृष्टीने अत्यंत चिंतनपर मांडणी केली. ते म्हणाले, बाबासाहेबांनी भारतातील विषमतावादी समाजरचनेचा सर्वंकष अभ्यास करून त्यावर उपाय म्हणून सामाजिक, नैसर्गिक मूल्यांवर आधारित संविधान देण्याचा प्रयत्न केला. येथे पूर्वापार वसलेल्या धर्मसंसदेपेक्षा लोकसंसद प्रभावी ठरली पाहिजे, लोकांना आवाज प्राप्त झाला पाहिजे, असा आग्रह त्यामागे होता. या पार्श्वभूमीवर बुद्धीप्रामाण्यवादी, लोकशाहीवादी दृष्टीकोन निर्माण करण्याची जबाबदारी धोरणकर्त्यांवर आहे. त्याचप्रमाणे आजची शिक्षणव्यवस्था अधिकाधिक विज्ञानवादी व प्रगल्भ होण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. बाबासाहेबांनी म्हटल्याप्रमाणे जंगल, जमीन आणि जल या नैसर्गिक साधनसंपत्तीचा विकास, संवर्धन व वाटप यांचे योग्य नियोजन करण्याची गरज आहे. संविधानात विषमतेला थारा नाही. अशा व्यवस्थेला प्रोत्साहनाचे प्रयत्न नाकारून सामाजिक-आर्थिक न्यायाच्या प्रस्थापनेसाठी प्रयत्न करण्यासाठी चळवळींचे पुनरुज्जीवन करण्याची गरजही त्यांनी प्रतिपादन केली.

राष्ट्रीय वृत्ती अंगी बाणवा: डॉ. होवाळ
Dr. Ravinand Howal
डॉ. रविनंद होवाळ यांनी भारतीय संविधानाची विविध वैशिष्ट्ये, पैलू आणि त्याच्या निर्मितीमध्ये डॉ. आंबेडकर यांच्या योगदानाचा सविस्तर ऊहापोह केला. ते म्हणाले, स्वातंत्र्यप्राप्तीनंतर गेल्या ७० वर्षांच्या वाटचालीत आपण आता कुठे संविधानाच्या प्रास्ताविकेपर्यंत पोहोचलो आहोत. अद्याप बराच पल्ला आपल्याला गाठावयाचा आहे. डॉ. आंबेडकर यांनी संविधानात प्रत्येक शब्द अत्यंत अभ्यासपूर्वक व चिकित्सकपणे योजला आहे. घटना राबविणारे हात चांगले असतील, तर तिची चांगली फळे मिळतील, अन्यथा हे चांगले हात निर्माण करण्याची जबाबदारी समाजाची आहे, याची जाणीव बाबासाहेबांनी करून दिलेली होती. भारतात विषमतेचे मूळ असणाऱ्या जाती विसर्जित केल्याखेरीज आपण कधीही एक राष्ट्र बनू शकणार नाही, असा इशाराही त्यांनी देऊन ठेवला आहे. त्यामुळे आजघडीला या देशातल्या प्रत्येक नागरिकाने देशहिताला सर्वोच्च प्राधान्य देत अंगी राष्ट्रीय वृत्ती बाणवण्याची गरज आहे, असे मत डॉ. होवाळ यांनी व्यक्त केले.
Pro-Vice Chancellor Dr. D.T. Shirke
अध्यक्षीय भाषणात प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी संविधानाच्या संदर्भात विद्यार्थ्यांत जागृती घडविण्याची आणि सामाजिक प्रबोधन करण्याची जबाबदारी शिक्षण क्षेत्राची असून हे कर्तव्य पार पाडण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करण्याची गरज व्यक्त केली. ते म्हणाले, शिवाजी विद्यापीठाने संविधान दूत ही योजना आजपासून अंमलात आणली असून त्याअंतर्गत महाविद्यालयांकडून त्यांची नियुक्ती झाल्यानंतर विद्यापीठ स्तरावर संविधान दूतांना सविस्तर प्रशिक्षण देण्यात येईल. संविधान जागृतीसाठी करावयाच्या उपक्रमांचे धोरण आखून त्यानुसार प्रत्येक संबंधित घटकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करण्यात येईल.
कार्यक्रमाच्या सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते संविधानाची प्रत उघडून परिसंवादाचे प्रतिकात्मक उद्घाटन करण्यात आले. तसेच, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. यावेळी विधी सेवा प्राधिकरणाचा ब्रँड अँम्बॅसिडर असलेल्या पाच वर्षांच्या रेहान शकील नदाफ या बालकाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनपट उपस्थितांसमोर उलगडला. डॉ. आंबेडकर केंद्राचे संचालक डॉ. एस.एस. महाजन यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. तेजपाल मोरे यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment