Friday, 10 November 2017

डॉ. आंबेडकर अखेरच्या श्वासापर्यंत विद्यार्थीच: उत्तम कांबळे


ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे

कोल्हापूर, दि. १० नोव्हेंबर: डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आयुष्यभर विद्यार्थी म्हणूनच राहिले. ज्ञानकण संचयाचे काम त्यांनी अखेरच्या श्वासापर्यंत केले, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार व विचारवंत उत्तम कांबळे यांनी आज येथे केले. शिवाजी विद्यापीठाच्या सेवा-पूर्व मार्गदर्शन केंद्रात आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शैक्षणिक परिवर्तन या विषयावरील विशेष व्याख्यानात ते बोलत होते.
श्री. कांबळे म्हणाले, बाबासाहेबांना शिक्षणाचे महत्त्व आणि प्रयोजन खूप लवकर लक्षात आले कारण या देशातील सामाजिक परिस्थिती आणि व्यवस्थेविषयी ते दररोज एका नित्यनव्या प्रश्नाला सामोरे जात होते. त्यातून त्यांना आपल्याला माणूस म्हणून समान वागणूक का दिली जात नाही, हा प्रश्न छळू लागला. त्यातून वडिलांसोबत कबीराचे दोहे गाताना किंवा केळुस्कर गुरूजींनी भेट दिलेले बुद्धचरित्राची पारायणे करताना त्यांना त्यांच्या शिक्षणाचे प्रयोजन सापडले, ते म्हणजे मला समाज बदलायचा आहे, हे होय. मी माणूस आहे आणि मला माझी सच्ची ओळख निर्माण करायची आहे, मिळवायची आहे, हा बाबासाहेबांच्या अथक संघर्षाचा महत्त्वाचा मुद्दा राहिला. त्यातूनच त्यांनी शिक्षणाचा असा काही ध्यास घेतला की, अल्पावधीत या देशातील ते सर्वाधिक उच्चशिक्षित व्यक्ती बनले. परदेशातील खडतर परिस्थितीत एकवेळ उपाशी राहून त्यांनी जी ज्ञानोपासना केली, त्याला इतिहासात तोड नाही. जो विषय अभ्यासायला घेतला तो ते संपूर्णतया आत्मसात करीत असत. त्या विषयाशी पूर्णतः तादात्म्य पावत असत. त्यामुळे बाबासाहेबांच्या शिक्षणाचा या देशातील अडाणी, निरक्षरदलित समाजमनावर अत्यंत दूरगामी परिणाम झाले. शिक्षणाचे महत्त्व त्यांच्या मनावर बिंबले. बाबासाहेबांनी केलेले हे महत्त्वाचे शैक्षणिक परिवर्तन कार्य होते.
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करीत असताना जिंकण्याची सकारात्मक ऊर्मी असणे हा सर्वात महत्त्वाचा घटक असल्याचे सांगून श्री. कांबळे म्हणाले, स्पर्धा परीक्षा किंवा कोणताही अभ्यास करीत असताना आपले पर्यावरण समजून घेणे ही अत्यंत महत्त्वाची पूर्वअट आहे. आपण आपल्या भोवतालच्या सामाजिक, राजकीय, जातीय, धार्मिक, आर्थिक आदी प्रकारच्या पर्यावरणाला गृहित धरतो किंवा त्याच्याशी संबंध नाकारतो, तिथेच मोठी चूक करतो. या पर्यावरणाचे भान आणि जाण आपल्यात विकसित झाली पाहिजे. त्यातून प्रश्न विचारण्याची ताकद निर्माण झाली पाहिजे. प्रश्न विचारणे हे व्यक्तीगत ज्ञानपिपासू वृत्तीचे आणि जागृतीचे महत्त्वाचे लक्षण आहे. गटचर्चा म्हणजे सुद्धा कोणाला संवादात हरवणे नव्हे, तर एकमेकांना समजून घेऊन एखाद्या सर्वसमावेशक निष्कर्षाप्रत येणे होय. आपल्या जगण्याला जसे प्रयोजन आवश्यक तसेच शिक्षणालाही आवश्यकच आहे. कोणत्याही अभ्यासातून अंतिमतः चौफेर व्यक्तीमत्त्व विकास होणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने विद्यार्थ्यांनी जिंकण्याच्या ऊर्मीनेच अभ्यास करायला हवा, असा सल्ला त्यांनी दिला.
यावेळी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी आलोक जत्राटकर यांनी प्रास्ताविक व परिचय करून दिला, तर सचिन कदम यांनी आभार मानले.

मरेस्तोवर मारा, खरं याच्यातला बाबासाहेब जागा करा!’
आपल्या भाषणात श्री. कांबळे यांनी बाबासाहेबांच्या शैक्षणिक साधनेचा परिणाम दर्शविणारी अनेक उदाहरणे सांगितली. त्यामध्ये त्यांच्या शाळेच्या पहिल्या दिवसाची आठवण सांगताना ते म्हणाले, मी शाळेत जायला तयार नव्हतो. पण, माझी आजी मला बदडतच शाळेत घेऊन गेली. तिथं मास्तरांसमोर मला उभा करून म्हणाली, मास्तर, याला मरेस्तोवर मारा; खरं याच्यातला बाबासाहेब जागा करा!’ ही बाबासाहेबांच्या शैक्षणिक परिवर्तनाची किमया होती. शिक्षणापासून वंचित म्हातारीमध्येही आपल्या नातवामध्ये दडलेल्या बाबासाहेबाला जागृत करण्याची तीव्र इच्छा प्रदीप्त झाली होती, हे बाबासाहेबांचे यश होते. या महामानवाच्या शाळा प्रवेशाचा दिवस विद्यार्थी दिन म्हणून साजरा होण्याला म्हणूनच आगळे महत्त्व आहे.

No comments:

Post a Comment