Friday, 10 November 2017

कौशल्य विकास, रोजगाराभिमुख ज्ञानरचनावादाची गरज: डॉ. विलास नांदवडेकर

डॉ. विलास नांदवडेकर

प्रशिक्षणात सहभागी शिक्षक

विद्यापीठात 'इन्फोसिस'च्या सहकार्याने फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामचे उद्घाटन

कोल्हापूर, दि. १० नोव्हेंबर: उच्चशिक्षणाच्या क्षेत्रात कौशल्य विकास व रोजगाराभिमुख ज्ञानरचनावादाच्या निर्मितीची नितांत गरज आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठात इन्फोसिसच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या आठ दिवसीय फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामचे उद्घाटन आज सकाळी डॉ. नांदवडेकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. रसायनशास्त्र अधिविभागाच्या सभागृहात झालेल्याया कार्यक्रमास इन्फोसिसच्या सी.एस.आर. व डायव्हर्सिटी इनिशिएटिव्ह्ज व्यवस्थापक रिना रवी आणि ट्रेनर लीना अमृते, श्री. जोसेफ प्रमुख उपस्थित होत्या. उपक्रमात विविध महाविद्यालयांतील ४५ शिक्षक सहभागी झाले आहेत.
कुलसचिव डॉ. नांदवडेकर म्हणाले, प्राथमिक शिक्षणाच्या क्षेत्रात विद्यार्थ्यांत सृजनशीलता विकास डोळ्यांसमोर ठेवून ज्ञानरचनावाद आकाराला आला. त्याच धर्तीवर उच्चशिक्षणाच्या क्षेत्रातही सृजनशीलता विकास, आऊटकम बेस्ड लर्निंग, कौशल्य विकास व उपयोजित ज्ञान देऊन हातांना काम प्रदान करणाऱ्या शिक्षणाची आणि ते देणाऱ्या शिक्षकांची गरज आहे. केंद्र सरकारने अशा प्रकारचे ३५०हून अधिक विशेष अभ्यासक्रमांची निर्मिती केली आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी नव्याने रुजू होणाऱ्या शिक्षकांसाठी प्रशिक्षण देण्याची आवश्यकता प्रतिपादन केली आहे. आजचा विद्यार्थी हा माहितीसंपन्न आहे. तथापि, त्यांच्याकडील माहितीचे ज्ञानात रुपांतर करून त्याचा पद्धतशीरपणे वापर करण्याची क्लृप्ती या शिक्षकांनी शिकविणे नव्या व्यवस्थेत अभिप्रेत आहे.
या उपक्रमाच्या आयोजनामागील हेतू अधिक स्पष्ट करून सांगताना कुलसचिव डॉ. नांदवडेकर म्हणाले, आपण निवडक शिक्षकांनी या प्रशिक्षणादरम्यान घेतलेल्या प्रशिक्षणाचा लाभ आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविला पाहिजे. संशोधनाची गरज, सृजनशीलता वृद्धी, अभिनव संकल्पना विकास व सहभाग, रोजगार व रोजगारक्षमता निर्मिती आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे एक उत्तम नागरिक म्हणून विद्यार्थ्यांचा विकास करण्याची जबाबदारी आपणा सर्व शिक्षकांवर आहे. त्याचप्रमाणे व्यक्तीगत विकास करीत असतानाच संस्थेच्या हिताचा विचारही तितकाच महत्त्वाचा आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
उपक्रमाचे समन्वयक डॉ. ए.एम. गुरव यांनी प्रास्ताविक केले. इन्फोसिसच्या रिना रवी यांनी सुधा मूर्ती यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या ट्रेन द ट्रेनर उपक्रमाचे समाजाच्या तसेच शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाचे महत्त्व विषद केले. सचिन जाधव यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment