डॉ. जयसिंगराव पवार. व्यासपीठावर डॉ. भारती पाटील. |
कोल्हापूर, दि. ८ नोव्हेंबर: लोकसंख्येत स्त्रियांचे प्रमाण आज बावन्न टक्क्यांहून अधिक असूनही त्यांची उपेक्षा नव्वद टक्के इतकी आहे. त्यामुळे स्त्री जातीच्या कल्याणासाठी स्त्रियांनीच पुढाकार घेतला पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ.जयसिंगराव पवार यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या कै. (श्रीमती) शारदाबाई गोविंदराव पवार अध्यासनाच्या वतीने 'कोल्हापुरातील कर्तृत्ववान स्त्रिया' या विषयावर दोन दिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्राच्या उद्घाटन समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून बीजभाषण करताना डॉ.जयसिंगराव पवार बोलत होते. विद्यापीठाच्या अर्थशास्त्र अधिविभागाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरु डॉ. डी.टी. शिर्के होते.
डॉ. पवार म्हणाले, थोर समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा काढून समाज सुधारणेचा मजबूत पाया रचला. मुली शिकल्या पाहिजेत, असे आजही समाजसुधारकांना वाटते. स्त्रियांचा इतिहास हा स्त्रियांनीच लिहिला पाहिजे. आपल्या इतिहासाची दुरुस्ती आपणच केली पाहिजे. विमलाबाई बागल यांनी कोल्हापूरमध्ये स्त्रियांचे हॉस्पिटल होण्यासाठी आमरण उपोषण केले होते. त्यामुळे स्त्रियांसाठीचे सावित्रीबाई फुले हॉस्पिटल इथे उभे राहिले. आज लोकांना त्यांच्या या कार्याचा विसर पडलेला आहे. १९६० साली विमलाबाई बागल यांना संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे अध्यक्ष करण्यात आले होते. स्त्रिया पुरुषांपेक्षाही बुद्धिमान असतात. कर्तबगार स्त्रिया इतिहास घडवितात. कोल्हापूरचा इतिहास स्त्रियांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणारा आहे. चौथ्या शिवाजी महाराजांच्या राणी आनंदीबाई यांना शिकवण्यासाठी पुण्याच्या मिचेलबाईंनी मूळच्या कोल्हापूरच्या असलेल्या रखमाबाईंच्या नावाची शिफारस केली. रखमाबाई केरुळकर कोल्हापूर राज्यातील पहिल्या नेटीव्ह एज्युकेशन ऑफिसर झाल्या.
डॉ.पवार पुढे म्हणाले, रखमाबाईंची कन्या कृष्णाबाई केरुळकरांची शिक्षण प्रक्रिया म्हणजे महाराष्ट्रातील स्त्रियांचे साधन ग्रंथ होते. शाहू महाराजांनी कृष्णाबाईंची कोल्हापूर राज्यातील पहिल्या मेडिकल ऑफिसर म्हणून नेमणूक केली. कृष्णाबाईंना पुढील शिक्षणासाठी शाहू महाराजांनी इंग्लंडला पाठविले. अशा कृष्णाबाई आपल्याला
माहीतही नाहीत. कृष्णाबाईंनी आत्मचरित्र लिहीले नाही. कर्तबगार स्त्रिया आत्मचरित्र लिहीत नाहीत; ते लिहीले पाहिजे. आजच्या स्त्री संशोधक पिढीने इतिहासातील व वर्तमानातील विविध क्षेत्रातील कर्तबगार स्त्रियांचा मागोवा घेतल्यास तो अमूल्य ठेवा होईल.
अध्यक्षीय भाषणात प्र-कुलगुरु डॉ.डी.टी.शिर्के म्हणाले, स्त्रियांनी सर्वच क्षेत्रात कर्तृत्व सिद्ध केले आहे. क्रीडा क्षेत्रात स्त्रियांचे प्रमाण कमी होते, पण तेही चित्र आता बदलत आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील सर्वच क्षेत्रांतील स्त्रियांच्या कर्तृत्वाचा विचार करता त्याचे ऑडीओ- व्हिज्युअल स्वरुपातही संकलन केल्यास पुढे ते सर्वांना मार्गदर्शक ठरु शकेल.
यावेळी डॉ.भारती पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, तर डॉ.निलांबरी जगताप यांनी आभार मानले. या चर्चासत्रासाठी विजयाताई पाटील, वसुधाताई पवार, दशरथ पारेकर, डॉ. विलास पवार, समाजशास्त्र अधिविभागप्रमुख डॉ.प्रकाश पवार, इतिहास अधिविभागप्रमुख डॉ.नंदा पारेकर, डॉ.अवनिश पाटील, उदय गायकवाड, सूर्यकांत गायकवाड आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment