Monday, 27 November 2017

शिवाजी विद्यापीठातर्फे ‘पुस्तकांच्या गावा’ला ५१७ ग्रंथ भेट


शिवाजी विद्यापीठातर्फे भिलार गावाला ५१७ ग्रंथांची भेट देण्यात आली. ती स्वीकारताना महाराष्ट्राचे ग्रंथालय संचालक श्री. किरण धांडोरे. शेजारी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर व अन्य मान्यवर.



भिलार या पुस्तकांच्या गावातील प्रकल्प कार्यालयास भेट देऊन त्याविषयी माहिती घेताना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे.

भिलार येथील पुस्तकांची पाहणी करताना शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे.

कोल्हापूर, दि. २७ नोव्हेंबर: देशातील वाचन संस्कृती वृद्धिंगत होण्याच्या दृष्टीने भिलारसारखी पुस्तकांची गावे जिल्ह्या-जिल्ह्यांत निर्माण व्हायला हवीत, अशी अपेक्षा शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी काल भिलार (जि. सातारा) येथे व्यक्त केली.
Dr. Devanand Shinde
देशातील पहिले पुस्तकांचे गाव म्हणून महाराष्ट्र शासनाने विकसित केलेल्या भिलारला शिवाजी विद्यापीठाच्या वतीने काल ५१७ पुस्तके प्रदान करण्यात आली. सातारा जिल्हा ग्रंथालय संघाचे ४५ वे अधिवेशन, मातृ-पितृ पुरस्कार वितरण आणि स्वातंत्र्यसैनिक देशभक्त भि.दा. भिलारे गुरूजी यांची ९८वी जयंती अशा संयुक्त समारंभाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते. या कार्यक्रमात विद्यापीठाच्या वतीने हा पुस्तक प्रदान सोहळा पार पडला.
महाराष्ट्र राज्याचे ग्रंथालय संचालक किरण धांडोरे यांनी भिलारच्या वतीने कुलगुरूंच्या हस्ते ग्रंथभेट स्वीकारली. यावेळी उद्योजक श्री. सारंग श्रीनिवास पाटील, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. द.ता. भोसले, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष संभाजीराव पाटणे, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ. डी.के. गायकवाड, उपकुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, प्राचार्य डॉ. डी.आर. मोरे, प्राचार्य डॉ. आर.एस. पाटील, प्राचार्य डॉ. दिलीप कुरळपकर, प्राचार्य डॉ. बी.एस. सावंत आदी उपस्थित होते.
कुलगुरू डॉ. शिंदे यांनी काल सकाळपासूनच भिलार गावात फिरून तेथील विविध घरांमधील ग्रंथसंग्रहाची पाहणी केली. प्रकल्प समन्वयक श्री. धर्माधिकारी यांनी त्यांना या समग्र प्रकल्पाविषयी माहिती दिली. सध्या या प्रकल्पांतर्गत भिलारमध्ये सुमारे १५ हजार पुस्तके असून अनेक घरे वाचकांच्या स्वागतासाठी रात्रंदिवस खुली असतात, अशी माहिती त्यांनी दिली. यावर कुलगुरू डॉ. शिंदे यांनी वाचनसंस्कृती जोपासण्यासाठी व वृद्धिंगत करण्यासाठी भिलार येथे राबविलेला पुस्तकांचे गाव हा प्रकल्प स्तुत्य व ऐतिहासिक स्वरुपाचा असून त्यासाठी योगदान देणाऱ्या ग्रामस्थांचा उत्साह अवर्णनीय आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून पुस्तकांमधील ज्ञान व त्यांची उपलब्धता या दृष्टीने एक नवा आयाम स्थापित होत असून त्याचे शिवाजी विद्यापीठाच्या सर्व संबंधित घटकांतर्फे मनःपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा. अशा शब्दांत आपल्या सदिच्छा व्यक्त केल्या. विद्यापीठातर्फे सध्या प्रातिनिधिक स्वरुपात ५१७ पुस्तकांची देणगी देत असून या पुढील काळातही या उपक्रमामध्ये विद्यापीठ सर्वोतोपरी सहकार्य करीत राहील, अशी ग्वाही कुलगुरू डॉ. शिंदे यांनी या प्रसंगी दिली. या पुस्तकांमध्ये विद्यापीठातर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या महत्त्वाच्या पुस्तकांबरोबरच विद्यापीठातील शिक्षक, अधिकारी, प्राचार्य यांनीही काही पुस्तके भेट स्वरुपात दिली असल्याचे कुलगुरूंनी या प्रसंगी सांगितले.

नागरबाई शिंदे यांचा मातृ-पितृ पुरस्काराने गौरव
स्वतः अल्पशिक्षित असूनही आपल्या मुलाला मोठ्या संघर्षातून जिद्दीने शिकवून कुलगुरू पदापर्यंत पोहोचविणाऱ्या श्रीमती नागरबाई शिंदे यांचा या कार्यक्रमात संभाजीराव पाटणे यांच्या हस्ते मातृ-पितृ पुरस्कार प्रदान करून गौरव करण्यात आला. या प्रसंगी त्यांचे सुपुत्र कुलगुरू डॉ. शिंदे व स्नुषा सौ. अनिता यांच्यासह शिंदे परिवारातील अनेक सुहृद उपस्थित होते. आपल्या आईचा गौरव केल्याबद्दल डॉ. शिंदे यांनी आयोजकांना मनापासून धन्यवाद दिले.

No comments:

Post a Comment