Dr. S.S. Mahajan |
कोल्हापूर, दि. २४
नोव्हेंबर: शिवाजी विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्रातर्फे
येत्या संविधान दिनानिमित्त (दि. २६ नोव्हेंबर) ‘संविधान दूत’ ही अभिनव योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे,
अशी माहिती केंद्राचे संचालक डॉ. एस.एस. महाजन यांनी आज येथे दिली.
संविधान दूत
उपक्रमाबद्दल अधिक माहिती देताना डॉ. महाजन म्हणाले की, विद्यार्थी हे देशाचे भावी
नागरिक सक्षम व प्रगल्भ व्हावेत, त्यांच्या माध्यमातून समाजात स्वातंत्र्य, समता,
बंधुता, न्याय आणि धर्मनिरपेक्षता आदी उदात्त मानवी मूल्यांची रुजवात व्हावी तसेच
भारतीय संविधानाबद्दल जागृती करण्याच्या दृष्टीने विद्यापीठ कार्यक्षेत्रात विशेष
योजना राबविण्याचे डॉ. आंबेडकर केंद्राने ठरविले होते. त्यानुसार ‘संविधान दूत’ ही योजना हाती घेण्यात येत
आहे. भारतीय संविधानाबद्दल विद्यार्थी व शिक्षकांत जागृती निर्माण करणे व
त्यांच्या माध्यमातून समाजालाही त्याविषयी अवगत करणे, मानवी हक्क व मानवी
मूल्यांप्रती जागृती निर्माण करणे आणि त्यांच्या रुजवातीसाठी प्रयत्न करणे ही या
प्रकल्पाची प्रमुख उद्दिष्ट्ये आहेत.
या प्रकल्पाच्या
अंमलबजावणीबाबत सांगताना डॉ. महाजन म्हणाले, सांविधानिक मूल्यांचा प्रचार व प्रसार
करण्याचे महत्त्वाचे कार्य ‘संविधान दूत’ करतीलच; शिवाय, डॉ. आंबेडकर केंद्रातर्फे राबविण्यात येणाऱ्या
समाजोपयोगी उपक्रमांची माहिती समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सदर
केंद्राचे महाविद्यालयीन प्रतिनिधी म्हणून संविधानदूत कार्य करतील. संबंधित
महाविद्यालयाचे प्राचार्य महाविद्यालयातील किमान एका शिक्षकाची ‘संविधान दूत’ म्हणून निवड करतील आणि
त्यांचे नाव डॉ. आंबेडकर केंद्राला कळवतील. या प्रकारे प्रत्येक महाविद्यालयात
किमान एक संविधान दूत कार्यरत असेल. डॉ. आंबेडकर केंद्र आणि संलग्नित महाविद्यालये
एकत्रितपणे निर्धारित उद्दिष्टांनुसार जागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करतील.
यामध्ये व्याख्याने, चर्चासत्रे, कार्यशाळा, प्रशिक्षण वर्ग आदींचा समावेश असेल.
यासाठी संविधान दूत समन्वयक म्हणून काम पाहतील. त्याचप्रमाणे संयुक्त
संशोधनकार्यही हाती घेण्यात येईल. त्यात महाविद्यालयीन शिक्षक, विद्यार्थी
यांच्यासह अन्य समाजघटकांनाही आवश्यकतेनुसार सामावून घेतले जाईल. या सर्व
प्रक्रियेमध्ये संविधान दुताची भूमिका महत्त्वाची असेल.
‘संविधानाविषयी जागृतीसाठी
महत्त्वाचा उपक्रम’
विद्यापीठाच्या डॉ.
बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्राने हाती घेतलेला ‘संविधान दूत’ हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा
आहे. त्या माध्यमातून भारतीय संविधानाविषयी विद्यापीठ परिक्षेत्रात जागृती करण्यात
येणार असून सांविधानिक मूल्ये आणि मूलभूत मानवी मूल्यांबाबत विद्यार्थी व नागरिक
यांना अवगत करण्याच्या दृष्टीने तो अत्यंत उपयुक्त ठरेल. या उपक्रमाला सर्व
महाविद्यालये आणि नागरिकांनीही आवश्यक सहकार्य देऊन यशस्वीपणे राबविण्यास हातभार
लावावा, असे आवाहन कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी केले आहे.
संविधान दिनानिमित्त सोमवारी परिसंवाद
डॉ. आंबेडकर
केंद्रातर्फे संविधान दिनाच्या निमित्ताने येत्या सोमवारी (दि. २७) सकाळी १०.३०
वाजता विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात ‘भारतीय संविधान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या विषयावर परिसंवाद
आयोजित केला आहे. परिसंवादात डॉ. रविवंद होवाळ (सोलापूर), प्रा. सुभाष दगडे
(सांगली) आणि राजेंद्र कुंभार (सातारा) हे सहभागी होतील. अध्यक्षस्थानी
प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के असतील. या परिसंवादाचा लाभ घेण्याचे आवाहनही संचालक
डॉ. महाजन यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment