Wednesday, 23 October 2019

विदेशी भाषा विभागाच्या दहा विद्यार्थिनींचे

आंतरराष्ट्रीय जपानी परीक्षेत यश

शिवाजी विद्यापीठाच्या विदेशी भाषा विभागात आंतरराष्ट्रीय जपानी परीक्षेत लक्षणीय यश प्राप्त करणाऱ्या विद्यार्थिनींच्या प्रमाणपत्र वितरण समारंभात बोलताना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे. व्यासपीठावर स्नेहल शेट्ये, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर आणि डॉ. मेघा पानसरे.


शिवाजी विद्यापीठाच्या विदेशी भाषा विभागात आंतरराष्ट्रीय जपानी परीक्षेत लक्षणीय यश प्राप्त करणाऱ्या विद्यार्थिनींच्या प्रमाणपत्र वितरण समारंभात यशस्वी विद्यार्थिनींसमवेत कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे. सोबत डॉ. मेघा पानसरे, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर आणि स्नेहल शेट्ये.

कोल्हापूर, दि. २२ ऑक्टोबर: शिवाजी विद्यापीठाच्या विदेशी भाषा विभागाच्या दहा विद्यार्थिनींनी ‘जपानी भाषा प्राविण्य चाचणी परीक्षा’ (जे.एल.पी.टी.) या जपानी भाषेतील आंतरराष्ट्रीय स्तरावरील परीक्षेमध्ये विशेष प्राविण्य मिळविले. या विद्यार्थिनींना शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते व कुलसचिव डॉ. विलास नांदडवेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रमाणपत्र वितरणाचा समारंभ काल (दि. २२) सायंकाळी झाला.
याप्रसंगी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी भारतीय संस्कृती व जपानी संस्कृती यातील साम्य अधोरेखित केले. ते म्हणाले, जपानी संस्कृती, तेथील दृढ नातेसंबंध आपल्याला भारतीय संस्कृतीची आठवण करून देतात. कोणतीही विदेशी भाषा शिकल्याने आपले व्यक्तिमत्त्व विकसित होते. आपल्याला त्या भाषेची केवळ माहितीच होत नाही, तर त्या देशाचे लोक आणि त्यांचे जनजीवन आतून समजू लागतात. या प्रसंगी त्यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व त्यांना पुढील भाषा कौशल्य प्राप्त करण्यासाठी  सदिच्छा दिल्या.
यावेळी विदेशी भाषा विभागप्रमुख डॉ. मेघा पानसरे म्हणाल्या की, आंतरराष्ट्रीय स्तरावर शिवाजी विद्यापीठाने मिळविलेले यश नक्कीच कौतुकास्पद आहे. जपान व भारतातील आर्थिक परस्परसंबंध अधिकाधिक दृढ होत असल्याने अनेक जपानी कंपन्या भारतात आल्या आहेत. त्यातून जपानी भाषेच्या विद्यार्थ्यांना करियरमध्ये रोजगाराच्या  अनेक संधी उपलब्ध होतात. विदेशी भाषा विभागमध्ये रशियन, जर्मन, जपानी भाषांचे सर्टिफिकेट कोर्स शिकविले जातात. यावर्षी जपानी भाषा डिप्लोमा व पोर्तुगीज भाषा सर्टिफिकेट कोर्स सुरु झाले आहेत. तसेच पुढील वर्षीपासून फ्रेंच भाषा सर्टिफिकेट कोर्स सुरु होणार आहे.

विद्यार्थिनींचे लक्ष्यवेधी यश
‘जपान फाऊंडेशन’ आणि ‘जपान एज्युकेशनल एक्स्चेंजेस अँड सर्व्हिसेस’ या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘जपानी भाषा प्राविण्य चाचणी परीक्षा’ घेतल्या जातात. यातील N5 परीक्षेमध्ये शिवाजी विद्यापीठाच्या विदेशी भाषा विभागातील दहा विद्यार्थिनींनी विशेष प्राविण्य मिळविले. या विद्यार्थिनींना विभागामार्फत दोन महिने विनाशुल्क विशेष मार्गदर्शन देण्यात आले. यशस्वी विद्यार्थिनींमध्ये अस्मिता मिराशी, प्राजक्ता गुरव, दीपिका भोसले, मेहजबीन शेख, गौरी सूर्यवंशी, श्वेता पुरी, पूर्वा नाडगोंडा, रुचा शिंदे, सिमरन कदम व सायली तळवडेकर यांचा समावेश आहे. पूर्वा नाडगोंडा या विद्यार्थिनीने स्वत:ची नोकरी व कुटुंब सांभाळत ९४% गुण मिळवून विशेष प्राविण्य प्राप्त केले.

जपानी भाषा शिक्षिका स्नेहल शेट्ये यांनी आभार मानले. यावेळी मराठी अधिविभागप्रमुख डॉ. रणधीर शिंदे यांच्यासह विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

Saturday, 19 October 2019

बुद्धिझम हे अस्वस्थतेचे तत्त्वज्ञान: डॉ. राजेंद्र कुंभार

डॉ. ज.रा. दाभोळे यांच्या ‘प्रतित्यसमुत्पाद’ पुस्तकाचे प्रकाशन




डॉ. ज.रा. दाभोळे लिखित 'प्रतित्यसमुत्पाद' या पुस्तकाचे प्रकाशन करताना कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर. सोबत (डावीकडून) डॉ. श्रीकृष्ण महाजन, डॉ. राजेंद्र कुंभार, डॉ. दाभोळे, डॉ. दीपा श्रावस्ती.

डॉ. ज.रा. दाभोळे लिखित 'प्रतित्यसमुत्पाद' या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात बोलताना डॉ. राजेंद्र कुंभार. व्यासपीठावर (डावीकडून) डॉ. श्रीकृष्ण महाजन, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, डॉ. राजेंद्र कुंभार, डॉ. ज.रा. दाभोळे, डॉ. दीपा श्रावस्ती.

Dr. Rajendra Kumbhar
कोल्हापूर, दि. १५ ऑक्टोबर: बुद्धाचे तत्त्वज्ञान (बुद्धिझम) हे अस्वस्थतेतून उदयास आलेले तत्त्वज्ञान असून मानवी दुःखनिवारणासाठी ते मुळापासून समजून घेणे अत्यावश्यक आहे, असे आग्रही प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य डॉ. राजेंद्र कुंभार यांनी काल येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंर्दाच्या वतीने ज्येष्ठ तत्त्वज्ञ डॉ. ज.रा. दाभोळे लिखित प्रतित्यसमुत्पाद या इंग्रजी पुस्तकाच्या प्रकाशनाचा समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी प्रमुख वक्ते म्हणून डॉ. कुंभार बोलत होते. विद्यापीठाच्या पदार्थविज्ञान विभागाच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. श्रीकृष्ण महाजन होते. तर कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर प्रमुख उपस्थित होते.
डॉ. कुंभार म्हणाले, बुद्ध तत्त्वज्ञानाचा उगम हा सिद्धार्थाच्या अस्वस्थतेमधून झाला. जगातील दुःख पाहून व्यथित झालेला संवेदनशील मनाचा सिद्धार्थ दुःखनिवारणाचा मार्ग शोधण्यासाठी राजप्रासादातून बाहेर पडला आणि पुढे त्याला ज्ञानप्राप्ती झाली. त्यानंतर त्याने ज्या तत्त्वज्ञानाची मांडणी केली, त्याच्या मुळाशी ही अस्वस्थता आहे. त्यामुळे विपश्यनेच्या मार्गाने बुद्ध तत्त्वज्ञानाची अनुभूती घेऊ पाहणाऱ्यांची खरे तर कीव करावीशी वाटते. निब्बाणाच्या संदर्भातही व्यक्तीगत आणि सामूहिक निब्बाण असे दोन प्रकार आहेत. तथापि, व्यक्तीगत स्तरावर निब्बाण प्राप्त करवून घेणे शक्य असले तरी इतर त्यापासून वंचितच राहात असल्यामुळे व्यक्तीगत निब्बाणामध्ये स्वार्थ आहे. सामूहिक निब्बाणामध्ये मात्र तसे नाही. त्यामुळे व्यापक जनसमुदायाचे हित साधणारे निब्बाण हेच खरे निब्बाण होय, असेही त्यांनी सांगितले.
भारतीय परंपरेमधील नऊपैकी सहा दर्शने ही नास्तिक असल्याने भारतीय परंपरा व तत्त्वज्ञान हे मूलतः नास्तिक आहे. पाश्चात्य, वाळवंटी तसेच जंगली संस्कृती या आध्यात्मिक आहेत, पण भारतातील सुबत्ता आणि संपन्नता यांमुळे येथे नास्तिकवाद निर्माण झाल्याचे दिसते, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
Dr. J.R. Dabhole
यावेळी ज्येष्ठ तत्त्वज्ञ डॉ. ज.रा. दाभोळे म्हणाले, अस्मिन सति, इदं भवति अर्थात हे असेल, तर ते घडते, असे हे बुद्धाचे प्रतित्यसमुत्पादाचे तत्त्वज्ञान आहे. म्हणजे कोणतीही गोष्ट घडते, त्याला काहीतरी कार्यकारणभाव असतो. हा प्रतित्यसमुत्पाद किंवा पाली भाषेत ज्याला पटिच्चसमुप्पाद म्हणतात, ते कोणतीही गोष्ट विनाकारण घडत नाही, असे सांगतानाच अनित्यवाद आणि अनात्मवाद सिद्ध करणारे तत्त्वज्ञान आहे. बुद्धाने या तत्त्वज्ञानाची मांडणी करतानाही मध्यममार्गाचाच स्वीकार केल्याचे दिसते. याचे कारण म्हणजे बुद्धाला केवळ तात्विक काथ्याकूट करण्यात रस नव्हता, तर अखिल मानवजातीला त्याला शोषणमुक्त करावयाचे होते, दुःखमुक्त करावयाचे होते. त्याने दुःखनिवारणाचा अष्टांगमार्ग त्यासाठीच दर्शविला आहे. श्रमण परंपरा ही वैदिक परंपरेहूनही भारतातील सर्वात प्राचीन परंपरा आहे. तीमध्ये बौद्ध आणि जैन परंपरांचा समावेश आहे. या प्राचीन परंपरेच्या तत्त्वज्ञानाचा प्रतित्यसमुत्पाद हा एक महत्त्वाचा भाग आहे, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी डॉ. दाभोळे यांनी सन १९५३ साली आपण विद्यार्थी दशेत कर्मवीर भाऊराव पाटील, संत गाडगेबाबा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एकत्र आले असताना त्यांची भेट झाल्याची आठवण सांगितली. बाबासाहेबांकडे स्वाक्षरी-संदेश मागितला असता त्यांनी ‘Be a human throughout your life’ (आयुष्यभर चांगला माणूस म्हणून राहा), असा संदेश दिल्याचे सांगितले. कर्मवीरांमुळेच आपल्याला बुद्धाच्या तत्त्वज्ञानाची ओळख झाल्याचेही त्यांनी कृतज्ञतापूर्वक नमूद केले.
अध्यक्षीय भाषणात डॉ. महाजन म्हणाले, डॉ. ज.रा. दाभोळे यांनी बुद्ध तत्त्वज्ञानातील अत्यंत महत्त्वाच्या पण तितक्याच दुर्लक्षित अशा प्रतित्यसमुत्पादाचे विश्लेषण करणारे पुस्तक लिहीले आहे. आणि या पुस्तकाच्या प्रकाशनामुळे विद्यापीठाच्या लौकिकात भर पडली आहे. हे तत्त्वज्ञान मुळापासून समजून घेण्यासाठी दाभोळे सरांचे हे पुस्तक अतिशय महत्त्वाचे ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. डॉ. दीपा श्रावस्ती यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. अविनाश भाले यांनी आभार मानले. यावेळी डॉ. जगन कराडे, डॉ. पी.एस. कांबळे, डॉ. रविंद्र श्रावस्ती, प्रा. विनय कांबळे, आर. वाय. लिधडे, डॉ. यु.के. सकट, डॉ. ए.व्ही. मोहोळकर यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Thursday, 10 October 2019

अत्याधुनिक यंत्रणेमुळे छपाईस गतिमानता: कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे

शिवाजी विद्यापीठ मुद्रणालयात अत्याधुनिक वेब ऑफसेट यंत्रणा कार्यान्वित; राज्यातील पहिले अकृषी विद्यापीठ

शिवाजी विद्यापीठ मुद्रणालयात बसविण्यात आलेल्या अत्याधुनिक वेब ऑफसेट मशीनचे फीत कापून उद्घाटन करताना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे. सोबत (डावीकडून) वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, डॉ. व्ही.एन. शिंदे आदी.


शिवाजी विद्यापीठ मुद्रणालयात बसविण्यात आलेल्या अत्याधुनिक वेब ऑफसेट मशीनचे कळ दाबून उद्घाटन करताना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे. सोबत (डावीकडून) वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, डॉ. व्ही.एन. शिंदे, डॉ. डी.के. गायकवाड आदी.

शिवाजी विद्यापीठ मुद्रणालयात बसविण्यात आलेल्या अत्याधुनिक वेब ऑफसेट मशीनच्या उद्घाटन प्रसंगी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्यासोबत  कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक गजानन पळसे, डॉ. डी.के. गायकवाड, डॉ. व्ही.एन. शिंदे आदी.


कोल्हापूर, दि. १० ऑक्टोबर: शिवाजी विद्यापीठाच्या मुद्रणालयात बसविण्यात आलेल्या अत्याधुनिक वेब ऑफसेट यंत्रणेमुळे छपाईच्या कामाला गतिमानता प्राप्त होणार असून छपाईचा वेळ आणि कर्मचाऱ्यांचे श्रमही त्यामुळे वाचतील, असा विश्वास कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी मंगळवारी (दि. ८) येथे व्यक्त केला.
शिवाजी विद्यापीठाच्या सुवर्णमहोत्सवी मुद्रणालयात विजयादशमीला अत्याधुनिक वेब ऑफसेट मशीनचे कुलगुरू डॉ. शिंदे यांच्या हस्ते व प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, राज्यातील अकृषी विद्यापीठांमध्ये वेब ऑफसेट मशीन बसविणारे शिवाजी विद्यापीठ पहिलेच ठरले आहे. या नव्या मशीनवर उत्तरपत्रिकांची तसेच पुस्तक छपाई विक्रमी वेळेत पूर्ण होण्यास मदत होईल. या यंत्रणेमुळे आता विद्यापीठाची मोनो-कलरची कामे बाहेरच्या मुद्रणालयांना न देता उलट आपली छपाईची कामे वेळेत संपवून आपल्याला बाहेरची कामे घेता येऊ शकतील का, या दृष्टीनेही पुढील टप्प्यात विचार करण्यास हरकत नाही, असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
सदर अत्याधुनिक मशीन जगप्रसिद्ध मनुग्राफ कंपनीचे असून सिटीलाईन-मोनो या प्रकारचे आहे. याचा वेग २० हजार ते ३० हजार प्रती प्रतितास इतका असून त्यावर एकरंगी छपाईची कामे अल्पावधीत आणि जलदगतीने होणार आहेत.
यावेळी कुलगुरू डॉ. शिंदे यांच्या हस्ते फीत कापून आणि मशीन चालू करून उद्घाटन करण्यात आले. मनुग्राफ कंपनीचे प्रकल्प व्यवस्थापक मिलींद अभ्यंकर यांनी मशीनची सर्व माहिती उपस्थितांना दिली. यावेळी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक गजानन पळसे, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ. डी.के. गायकवाड, मुद्रणालय अधीक्षक भूषण पाटील यांच्यासह मुद्रणालयातील कर्मचारी व त्यांचे कुटुंबिय मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुद्रणालय विभागाचे उपकुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे यांनी आभार मानले.


Monday, 7 October 2019

संशोधनाचे सामाजिक ज्ञानवृद्धीत योगदान आवश्यक: कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे

शिवाजी विद्यापीठात विविध फेलोशीपप्राप्त संशोधक विद्यार्थ्यांच्या गुणगौरव समारंभात बोलताना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे. व्यासपीठावर (डावीकडून) डॉ. पी.एस. पाटील, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर.


शिवाजी विद्यापीठात विविध फेलोशीपप्राप्त संशोधक विद्यार्थ्यांच्या गुणगौरव समारंभात बोलताना प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के. व्यासपीठावर (डावीकडून) डॉ. पी.एस. पाटील, कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर.

शिवाजी विद्यापीठात विविध फेलोशीपप्राप्त संशोधक विद्यार्थ्यांसमवेत कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, डॉ. पी.एस. पाटील.

'सारथी' फेलोशीपप्राप्त संशोधक विद्यार्थ्यांचा विद्यापीठात गौरव
कोल्हापूर, दि. ७ ऑक्टोबर: आपल्या संशोधनाने एकूण सामाजिक ज्ञानामध्ये नेमकी काय भर टाकली, कोणते योगदान दिले, या बाबीकडे संशोधकांनी गांभीर्यपूर्वक लक्ष देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठातील सुमारे ४८ संशोधक विद्यार्थ्यांची महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेतर्फे (सारथी) विविध फेलोशीपसाठी निवड झाली आहे. राज्यात सर्वाधिक संख्येने या संशोधनवृत्ती प्राप्त केल्याबद्दल विद्यापीठातर्फे या विद्यार्थ्यांसह अन्य विविध योजनांखाली फेलोशीपप्राप्त ५७ विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ आज राजर्षी शाहू सभागृहात आयोजित करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
कुलगुरू डॉ. शिंदे यांनी संशोधक विद्यार्थ्यांना संशोधनाच्या प्रयोजनाबद्दल अवगत केले. ते म्हणाले, आपण संशोधन कशासाठी करतो आहोत, यासंदर्भातील संकल्पना व कल्पना संशोधकाच्या मनात स्पष्ट असल्या पाहिजेत. आपल्या संशोधनाने सामाजिक ज्ञानामध्ये थोडी का असेना भर पडली पाहिजे, याकडे आपला कटाक्ष असला पाहिजे. संशोधनाकडे आव्हान म्हणून पाहात असतानाच उपलब्ध साधनांचा पुरेपूर वापर करून त्याअंतर्गत हाती घेतलेल्या समस्येचे उत्तर शोधण्यासाठी संशोधकांनी प्रयत्न करायला हवेत. त्याअंतर्गत ज्ञान शोधण्याची कला अवगत करणे, विकसित करणे, सशक्त निरीक्षण कौशल्याचा विकास करणे या गोष्टीही संशोधन प्रक्रियेतूनच आपल्याला साध्य करता येतात. त्यातून अंतिमतः काही निष्कर्षाप्रत आपण जाऊ शकतो. आपल्याला मिळालेल्या संशोधनवृत्तीचे योग्य प्रकारे नियोजन, व्यवस्थापन करण्याचे कौशल्यही संशोधक विद्यार्थ्यांनी आत्मसात करण्याची गरज आहे. आपल्या संशोधनांतर्गत शोधलेल्या नवसंकल्पनांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी विद्यापीठाच्या इनोव्हेशन व इनक्युबेशन केंद्रामार्फतही प्रयत्न करावेत, असे आवाहनही कुलगुरूंनी केले.
यावेळी प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के म्हणाले, वरिष्ठ संशोधक विद्यार्थ्यांनी खालील वर्गांत शिकण्यासाठी दाखल झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाविषयी आस्था निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावेत. विद्यापीठ स्तरावरील दर्जेदार संशोधनाचा वारसा पुढील विद्यार्थ्यांमध्ये त्या माध्यमातून झिरपत राहील आणि विद्यापीठीय संशोधनाचा दर्जा अबाधित राहील. संशोधक विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या शैक्षणिक, प्रशासकीय समस्यांतून जावे लागते. त्यात त्यांचा वेळ जाऊ नये, यासाठी त्यांच्यासमवेत त्रैमासिक बैठका घेऊन चर्चा करून त्यांवर तोडगा काढण्यात येईल. त्यासाठी सिंगल विंडो सदृश काही व्यवस्था निर्माण करता येईल का, या दृष्टीनेही चाचपणी करता येईल.
यावेळी अरविंद पाटील (भौतिकशास्त्र) व प्रवीण शेंबडे (भूगोल) या संशोधक विद्यार्थ्यांनी प्रातिनिधिक मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे स्वागत विज्ञान व तंत्रज्ञान शाखेचे अधिष्ठाता डॉ. पी.एस. पाटील यांनी केले. कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी आभार मानले. धैर्यशील यादव यांनी सूत्रसंचालन केले, तर उपकुलसचिव संजय कुबल यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालये व विद्यापीठ विभागातर्फे कार्यक्रमाचे संयोजन करण्यात आले.
फेलोशीपप्राप्त संशोधक विद्यार्थ्यांची संख्या अशी-
सारथी योजनेअंतर्गत मा. मुख्यमंत्री विशेष संशोधन फेलोशीप-२०१९ (१६ विद्यार्थी), सारथी राष्ट्रीय संशोधन फेलोशीप-२०१९ (३२ विद्यार्थी); अन्य विविध फेलोशीपप्राप्त (५७ विद्यार्थी) - एकूण १०५ विद्यार्थी.

Thursday, 3 October 2019

अपारंपरिक ऊर्जेचा वापर करून पर्यावरणाप्रती अहिंसा आवश्यक: कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे

शिवाजी विद्यापीठाच्या तंत्रज्ञान अधिविभागात आयोजित सौरदूत कार्यशाळेत मार्गदर्शन करताना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे. व्यासपीठावर (डावीकडून) कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, परीक्षा संचालक गजानन पळसे.



शिवाजी विद्यापीठाच्या तंत्रज्ञान अधिविभागात आयोजित सौरदूत कार्यशाळेत सोलर स्टडी लँप तयार करणारे विद्यार्थी.

शिवाजी विद्यापीठाच्या तंत्रज्ञान अधिविभागात आयोजित सौरदूत कार्यशाळेत तयार केलेल्या सौरदिव्यांसह सहभागी विद्यार्थी.

गांधी ग्लोबल सौर यात्रेअंतर्गत विद्यापीठात २५० सौरदूतांना प्रशिक्षण
कोल्हापूर, दि. ३ ऑक्टोबरस्वच्छ ऊर्जा आणि ऊर्जेच्या संदर्भात स्वयंपूर्णता हा जगातील प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. त्यासाठी युवकांनी अपारंपरिक ऊर्जेचा वापर करून गांधी जयंतीच्या निमित्ताने पर्यावरणाप्रती अहिंसा व प्रेम प्रदर्शित करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी काल येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या तंत्रज्ञान अधिविभागात आयआयटी, मुंबई यांच्या सहकार्याने महात्मा गांधी यांच्या १५०व्या जयंतीच्या निमित्ताने गांधी ग्लोबल सौर यात्रा उपक्रमांतर्गत विद्यार्थी सौरदूत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या कार्यशाळेत २५० सौरदूतांना सोलर स्टडी लँप बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.
कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, ग्लोबल वॉर्मिंगसदृश हवामान बदलांच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणाप्रती सजगता आणि स्वच्छ ऊर्जेचा पुरस्कार करण्याची आज नितांत गरज आहे. त्यासाठी जगभरातील विद्यार्थ्यांमध्ये जाणीवजागृती करण्यासाठी आयआयटी, मुंबईने गांधी जयंतीच्या निमित्ताने केवळ देशातच नव्हे, तर जगभरातील ८० देशांतील सुमारे चार हजार केंद्रांमध्ये ग्लोबल सौर यात्रेचे आयोजन केले. त्यामध्ये विद्यापीठाच्या तंत्रज्ञान अधिविभागाचा समावेश करण्यात आला, ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेऊन सौर ऊर्जेचा वापर जनसामान्यांचे जीवन सुखकर करण्यासाठी कसा वापर करता येईल, या दृष्टीने या कार्यशाळेचा लाभ घ्यावा. तसेच, भावी जीवनातही अपारंपरिक ऊर्जेच्या क्षेत्रात संशोधनासाठी सिद्ध व्हावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
तंत्रज्ञान अधिविभागाचे संचालक डॉ. जे.एस. बागी म्हणाले, गांधी ग्लोबल सौर यात्रेतून जगभरात सौरऊर्जेबाबत जागृती तसेच अपारंपरिक ऊर्जा वापरण्यासाठी प्रोत्साहन देण्याचा उद्देश आहे. याद्वारे अत्यल्प खर्चात, विश्वासार्ह आणि टिकाऊ सौर उपकरणांची निर्मिती शक्य आहे. अशा उपक्रमांतून युवकांना रोजगार निर्मितीसाठी सक्षम बनविण्याबरोबरच स्थानिकांना या ऊर्जेचे लाभ देणेही शक्य होणार आहे.
या उद्घाटन समारंभाला प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक गजानन पळसे उपस्थित होते. तंत्रज्ञान अधिविभागातील प्रवीण प्रभू यांनी कार्यशाळेचे समन्वयक व मार्गदर्शक म्हणून काम पाहिले.


२५० सौरदूतांनी बनविले सोलर स्टडी लँप
तंत्रज्ञान अधिविभागात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेत बी.टेक.च्या सुमारे २५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या विद्यार्थ्यांना सोलर स्टडी लँप बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. टेक्विप उपक्रमांतर्गत त्यांना त्यासाठी आवश्यक साधनांची उपलब्धता करून देण्यात आली. सौरऊर्जेच्या प्रसारासाठी काम करण्याची आणि पर्यावरणाप्रती अहिंसाधर्म बाळगण्याची त्यांना यावेळी शपथ देण्यात आली.

Wednesday, 2 October 2019

शिवाजी विद्यापीठात स्वच्छता अभियान उत्साहात

शिवाजी विद्यापीठात आज महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले. यावेळी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्यासमवेत कुलसचिव डॉ. विलास नांदवेडकर, डॉ. भारती पाटील, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, परीक्षा मंडळाचे संचालक गजानन पळसे, डॉ. जे.एस. बागी, डॉ. आर.व्ही. गुरव, डॉ. ए.एम. गुरव आदी.
शिवाजी विद्यापीठाच्या सिंथेटिक ट्रॅक परिसरातील प्लास्टीक कचरा गोळा करताना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे.

शिवाजी विद्यापीठाच्या सिंथेटिक ट्रॅक परिसरातील प्लास्टीक कचरा गोळा करताना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे.

शिवाजी विद्यापीठाच्या सिंथेटिक ट्रॅक परिसरातील प्लास्टीक कचरा गोळा करताना प्र- कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के.
शिवाजी विद्यापीठाच्या स्वच्छता मोहिमेअंतर्गत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा परिसराची सफाई करताना कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर.
शिवाजी विद्यापीठाच्या स्वच्छता मोहिमेअंतर्गत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा परिसराची सफाई करताना वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील.

 
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थ्यांसमवेत स्वच्छता मोहिमेत सहभागी झालेले कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के व अन्य अधिकारी.

शिवाजी विद्यापीठात स्वच्छता अभियानात सहभागी झालेले अधिकारी व कर्मचारी.

शिवाजी विद्यापीठाच्या स्वच्छता अभियानात सहभागी झालेले विद्यार्थी.

शिवाजी विद्यापीठाच्या स्वच्छता अभियानात सहभागी झालेले विद्यार्थी.

कोल्हापूरदि. २ ऑक्टोबरशिवाजी विद्यापीठात दरवर्षीप्रमाणेच महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून विद्यापीठ परिसर स्वच्छता अभियान अत्यंत उत्साहात राबविण्यात आले. अभियानाला शिक्षकप्रशासकीय अधिकारीकर्मचाऱ्यांसह विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद लाभला.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक गजानन पळसे यांच्या मार्गदर्शनाखाली आज सकाळी साडेसात ते दहा या कालावधीत स्वच्छता अभियान यशस्वीरित्या राबविण्यात आले. रस्त्याकडेला वाढलेली काटेरी झुडपेगवतपरिसरात पडलेला कचरा अशा प्रकारचा कचरा आज मोठ्या प्रमाणात साफ करण्यात आला.
गेल्या चार वर्षांपासून स्वच्छता अभियानामध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टीकमुक्ती करण्यात आलेली असल्यामुळे तसेच परिसरात वावरणाऱ्या व्यक्तींच्या सजगतेमुळे विद्यापीठाचा परिसर हा बहुतांश प्लास्टीकमुक्त बनला आहे. तथापि, अलिकडेच सिंथेटिक ट्रॅकवर झालेल्या काही क्रीडा स्पर्धांमुळे त्या मैदानाच्या परिसरात चॉकलेट-बिस्कीटांचे रॅपर मोठ्या प्रमाणात पडले होते. ही बाब लक्षात येऊन कुलगुरू डॉ. शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. शिर्के, कुलसचिव डॉ. नांदवडेकर या तिघांनी त्या परिसरातील प्लास्टीक कचरा गोळा करण्यास प्राधान्य दिले आणि अर्ध्या तासात तेथील प्लास्टीक कचरा गोळा केला. यंदा पाऊस अधिक झाल्यामुळे परिसरात गवत, खुरट्या वनस्पती आणि झुडपे मोठ्या प्रमाणात वाढली. रस्त्याकडेला असणाऱ्या अशा बहुतांश झुडपांची आजच्या मोहिमेत सफाई करण्यात आली.
कोणत्याही औपचारिकतेशिवाय कुलगुरू डॉ. शिंदे यांच्यासह सर्वच अधिकाऱ्यांनी हातात खराटे, खुरपी घेऊन स्वच्छतेला सुरवात केली. मुख्य प्रशासकीय इमारतीमधील प्रशासकीय सेवकांनी त्यांना नेमून दिलेल्या एनसीसी भवन गेटपर्यंतच्या परिसरामध्ये तर अधिविभागांनी आपापल्या परिसराची स्वच्छता केली.
कुलगुरू डॉ. शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. शिर्के यांनी अन्य अधिकाऱ्यांसह पर्यावरणपूरक मोटारीतून विद्यापीठ परिसरातील प्रत्येक अधिविभागाला भेट देऊन त्या त्या ठिकाणी चाललेल्या स्वच्छता मोहिमेची पाहणी केली आणि शिक्षक व विद्यार्थ्यांना परिसर स्वच्छतेबरोबरच प्लास्टीकमुक्तीचे आवाहन केले.

महात्मा गांधी, लाल बहादूर शास्त्री यांना आदरांजली

अभियानानंतर मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये कुलगुरू डॉ. शिंदे यांच्या हस्ते महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर गांधी अभ्यास केंद्राच्या संचालक तथा अधिष्ठाता डॉ. भारती पाटील यांनी उपस्थितांना अहिंसा, शांततेची तसेच स्वच्छतेची शपथ दिली.
या प्रसंगी कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्यासह अधिष्ठाता डॉ. पी.डी. राऊत, डॉ. ए.एम. गुरव, विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. आर.व्ही. गुरव, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ. डी.के. गायकवाड यांच्यासह विविध अधिविभागांचे प्रमुख, शिक्षक, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फिट इंडिया दौड उत्साहात
आज सकाळी कुलगुरू डॉ. देवानंद शिंके व प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्या हस्ते फिट इंडिया प्लॉगिंग दौडीचे उद्घाटन करण्यात आले. विद्यार्थी-विद्यार्थिनींनी या दौडीत बहुसंख्येने सहभाग दर्शविला आणि रॅली उत्साही प्रतिसादात यशस्वी झाली. विद्यापीठाच्या क्रीडा अधिविभागाच्या वतीने या दौडीचे नियोजन करण्यात आले.



शिवाजी विद्यापीठात आयोजित फिट इंडिया प्लॉगिंग दौडीत कुलगुरू डॉ. शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. शिर्के यांच्यासमवेत सहभागी झालेले विद्यार्थी-विद्यार्थिनी.



Tuesday, 1 October 2019

गांधीजींची मूल्ये अंगीकारण्याची गरज: कुलगुरू डॉ देवानंद शिंदे


डॉ. निशा मुडे-पवार यांच्या पुस्तकांचे प्रकाशन
शिवाजी विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागप्रमुख डॉ. निशा मुडे-पवार यांच्या पुस्तकांचे प्रकाशन करताना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे. सोबत ([डावीकडून) डॉ. रत्नाकर पंडित, ज्येष्ठ पत्रकार दशरथ पारेकर, डॉ. रविंद्र ठाकूर, डॉ. भारती पाटील आणि डॉ. निशा मुडे-पवार.

कोल्हापूर- दि. ऑक्टोबर: गांधीजींचा मार्ग अनुसरत असताना दुटप्पी भूमिका घेता अहिंसा, सत्य ही त्यांची मूल्ये अंगिकारली पाहिजेत, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी आज येथे केले. विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या व संवादशास्त्र अधिविभागाच्या वतीने महात्मा गांधी यांची १५० वी जयंती आणि विभागप्रमुख डॉ. निशा मुडे-पवार यांच्या पुस्तकांचे प्रकाशन अशा संयुक्त कार्यक्रमात ते बोलत होते.
कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, गांधीजींना कवेत घेणे सोपे नाही. त्यांनी दिलेली मूल्ये अत्यंत महत्त्वाची आहेत. गांधीजी केवळ एक व्यक्ती नव्हते, तर कृतिशील सत्यविचार होते. गांधीजींच्या तत्वांपासून प्रेरणा घेऊन त्या विचारांचा अवलंब करण्याची आणि आपण गांधीरूप होण्याचे धाडस दाखवण्याची गरज आहे.
डॉ निशा मुडे-पवार यांच्या पुस्तकांत विचार आणि सृजनशीलतेचा मिलाफ दिसून येतो, अशा शब्दांत त्यांनी त्यांच्या पुस्तकांचे कौतुक केले. या प्रसंगी ज्येष्ठ संपादक दशरथ पारेकर यांनी डॉ. निशा मुडे-पवार लिखित 'वृत्तपत्रीय लेखनाची दोन दशके' या पुस्तकाविषयी अभिप्राय व्यक्त केला. शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागाचे माजी विभागप्रमुख प्रा. डॉ रविंद्र ठाकुर यांनी 'सनीरेज' या काव्यसंग्रहाविषयी अभिप्राय व्यक्त केला. तर पदमश्री (कै.) डॉ. ग.गो. जाधव अध्यासनाचे चेअर प्रोफेसर डॉ. रत्नाकर पंडित यांनी 'संवादशास्त्र' या पुस्तकावियी अभिप्राय व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त सामाजिक शास्त्र अभ्यास मंडळाच्या अधिष्ठाता आणि गांधी अभ्यास केंद्राच्या समन्वयक डॉ. भारती पाटील यांचे 'महात्मा गांधीजी यांची पत्रकारिता आणि सदयस्थिती' या विषयावर व्याख्यान झाले. अध्यक्षस्थानी दशरथ पारेकर होते.  डॉ. भारती पाटील यांनी दक्षिण अफ्रिकेत 'इंडियन ओपिनीयन' ते 'हरीजन' या वृत्तपत्रांच्या प्रकाशन कालावधीतील गांधीजींच्या पत्रकारितेचा प्रवास कथित केला. गांधीजींवर संपादित १०० खंडांमध्ये गांधीजींनी संपादित केलेली वृत्तपत्रे, पत्रे इतर भाषणे या सामग्रीचा प्रामुख्याने समावेश केल्याचे सांगितले.  गांधीजींच्या 'यंग इंडिया' आणि 'नवजीवन' या वृत्तपत्रांचे यावर्षी शताब्दी वर्ष असल्याचे सांगून गांधीजींच्या विचारांचा त्यांनी आढावा घेतला.
या प्रसंगी शाहीर राजू राऊत यांनी पुस्तक प्रकाशनाबददल आपली काव्यात्मक प्रतिक्रिया व्यक्त केली. सचिन दिवाण यांनी सूत्रसंचालन केले. या प्रसंगी डॉ. सुमेधा साळुंखे, अनुराधा इनामदार, सुधाकर बर्गे, रिमा पाटील, मानसी पोवार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.