Tuesday 18 February 2020

डॉ. मेघा पानसरे, किरण गुरव यांचा विद्यापीठात गौरव

महाराष्ट्र शासनाच्या सन २०१८साठीच्या यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार प्राप्त करणाऱ्या डॉ. मेघा पानसरे यांचा शिवाजी विद्यापीठ प्रशासनातर्फे ग्रंथभेट देऊन गौरव करताना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे. सोबत (डावीक़डून) डॉ. व्ही.एन. शिंदे, किरण गुरव, परीक्षा संचालक गजानन पळसे, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, डॉ. भारती पाटील. 


महाराष्ट्र शासनाच्या सन २०१८साठीच्या यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार प्राप्त करणारे किरण गुरव यांचा शिवाजी विद्यापीठ प्रशासनातर्फे ग्रंथभेट देऊन गौरव करताना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे. सोबत (डावीक़डून) डॉ. व्ही.एन. शिंदे, परीक्षा संचालक गजानन पळसे, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, डॉ. मेघा पानसरे, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, डॉ. भारती पाटील.


वाङ्मय पुरस्कारांमुळे विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा: कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे

कोल्हापूर, दि. १८ फेब्रुवारी: डॉ. मेघा पानसरे आणि किरण गुरव यांच्या साहित्यकृतींना महाराष्ट्र शासनाचे वाङ्मय पुरस्कार एकाच वेळी मिळाल्याने शिवाजी विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे, अशी भावना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी काल सायंकाळी येथे व्यक्त केली.
महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट मराठी वाङ्मय निर्मितीसाठी देण्यात येणाऱ्या यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार-२०१८ नुकतेच जाहीर करण्यात आले. त्यामध्ये डॉ. पानसरे आणि श्री. गुरव यांच्या साहित्यकृतींना पुरस्कार जाहीर झाले. शिवाजी विद्यापीठाच्या विदेशी भाषा अधिविभागाच्या प्रमुख डॉ. मेघा पानसरे यांच्या सोविएत रशियन कथाया कथासंग्रहाला प्रौढ वाङ्मय- अनुवादित प्रकारातील पुस्तकासाठी देण्यात येणारा तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी पुरस्कार, तर विद्यापीठात अधीक्षकपदी कार्यरत असणाऱ्या किरण गुरव यांच्या जुगाड या कादंबरीस ह.ना. आपटे पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यानिमित्त काल त्यांचा विद्यापीठ प्रशासनातर्फे गौरव करण्यात आला. त्या प्रसंगी कुलगुरू डॉ. शिंदे बोलत होते.
कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, विद्यापीठातील दोन सहकाऱ्यांना एकाच वेळी राज्यस्तरीय प्रतिष्ठेचा पुरस्कार प्राप्त होण्याला विशेष महत्त्व आहे. साहित्यिक अभिव्यक्तीच्या बाबतीत शिवाजी विद्यापीठातील शिक्षक आणि प्रशासकीय सेवक या दोन्ही स्तरांवरील सजगता यातून अधोरेखित होते. डॉ. पानसरे यांनी मराठी आणि रशियन या दोन भाषांच्या दरम्यान संवादाचा पूल उभारण्याची मोलाची कामगिरी केली आहे. त्याबद्दल त्यांचा राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठा गौरवही झाला आहे. त्याचप्रमाणे प्रशासकीय जबाबदारी सांभाळत असताना आपला वेळ लेखन अभिव्यक्तीच्या कामी सत्कारणी लावून किरण गुरव यांनी सुद्धा मराठी साहित्य क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण केली आहे. ही बाब अभिमानास्पद आहे.
प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के म्हणाले, लेखनासारख्या सर्जनशील प्रांतामध्ये विद्यापीठातील सहकारी दमदार आणि लक्षणीय कामगिरी करीत आहेत, ही बाब कौतुकास्पद आहे. त्यांच्या या लेखनकार्याची शासन स्तरावरुन दखल घेतली जाणे, हे त्याहून अधिक गौरवास्पद आहे. विद्यापीठातील अन्य शिक्षक, सेवक यांच्यासाठी सुद्धा ही बाब आदर्शवत स्वरुपाची असून त्यांनीही आपल्यातील सर्जनशीलतेला वाव देण्याची गरज आहे.
यावेळी कुलगुरू डॉ. शिंदे यांच्या हस्ते ग्रंथ भेट देऊन डॉ. पानसरे आणि श्री. गुरव यांचा गौरव करण्यात आला. जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक गजानन पळसे, अधिष्ठाता डॉ. भारती पाटील, उपकुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment