कोल्हापूर, दि. ५
फेब्रुवारी: शिवाजी विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या ग्रंथ महोत्सवात देशभरातील अनेक
मान्यवर प्रकाशकांनी सहभाग घेतला आहे. त्यांच्या स्टॉलवर अभ्यासक्रमातील अनेकविध
विषयांच्या संदर्भग्रंथांसह महत्त्वाच्या अवांतर वाचनासाठीही हजारो पुस्तके उपलब्ध
आहेत. त्याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे
यांनी आज येथे केले.
शिवाजी
विद्यापीठाच्या ५६व्या दीक्षान्त समारंभाच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे बॅ.
बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राच्या वतीने राजमाता जिजाऊसाहेब बहुउद्देशीय
सभागृहासमोरील आमराईमध्ये भव्य ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. या दोन दिवसीय
प्रदर्शनाचे उद्घाटन करताना कुलगुरू डॉ. शिंदे बोलत होते. यंदा ग्रंथ प्रदर्शनाचे
१४ वे वर्ष आहे. प्रदर्शनात सुमारे ३३ स्टॉल मांडण्यात आले आहेत.
यावेळी कुलगुरू डॉ.
शिंदे यांच्या हस्ते शिवाजी विद्यापीठाच्या क्रमांक १ च्या स्टॉलचे फीत कापून
प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस.आर. रंगनाथन आणि
बॅ. बाळासाहेब खर्डेकर यांच्या छायाचित्रांना कुलगुरू डॉ. शिंदे व प्र-कुलगुरू डॉ.
डी.टी. शिर्के यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले.
त्याचप्रमाणे मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनही करण्यात आले. कुलगुरूंसह सर्व
मान्यवरांनी यावेळी सर्व स्टॉलधारक प्रकाशक व अन्य सहभागींची सदिच्छा भेट घेऊन
त्यांना विद्यापीठाची दैनंदिनी भेट देऊन स्वागत केले.
यावेळी कुलसचिव डॉ.
विलास नांदवडेकर, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे
संचालक गजानन पळसे, अधिष्ठाता डॉ. पी.डी. राऊत, डॉ. भारती पाटील, डॉ. ए.एम. गुरव,
बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राच्या संचालक डॉ. नमिता खोत, डॉ.
बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्राचे संचालक डॉ. श्रीकृष्ण महाजन, उपग्रंथपाल
डॉ. डी.बी. सुतार, सहाय्यक ग्रंथपाल डॉ. पी.बी. बिलावर, डॉ. एस.व्ही. थोरात,
इंटरनेट विभागाचे समन्वयक डॉ. मिलींद जोशी, परीक्षा विभागाचे उपकुलसचिव एन.एम.
आकुलवार, सहाय्यक कुलसचिव निवास माने यांच्यासह शिक्षक, प्रशासकीय सेवक, राष्ट्रीय
सेवा योजनेचे विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘ट्रेड फेअर स्टार्ट-अप-२०२०’
ट्रेड फेअरमध्ये सहभागी विद्यार्थ्यांच्या फूड स्टॉलचे उद्घाटन करताना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे. सोबत प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, डॉ. नमिता खोत, डॉ. बारती पाटील, डॉ. ए.एम. गुरव व महेश चव्हाण. |
शिवाजी
विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना मार्केटिंग व व्यवस्थापनाचे प्रत्यक्ष अनुभव
मिळावेत आणि त्यांच्यातून चांगले उद्योजक-व्यावसायिक घडावेत, यासाठी गतवर्षीपासून
विद्यापीठाच्या कौशल्य व उद्योजकता विकास केंद्रामार्फत विद्यार्थ्यांसाठीही काही
स्टॉल घेऊन त्यांचे कौशल्य सर्वांसमोर प्रदर्शित करण्याची संधी देण्यास सुरवात
करण्यात आली. यंदाही या उपक्रमाची व्याप्ती वाढवून कौशल्य व उद्योजकता विकास
केंद्राने एमबीए युनिटच्या सहकार्याने ‘ट्रेड फेअर स्टार्टअप-२०२०’चे आयोजन केले आहे.
याअंतर्गत एकूण १० स्टॉल घेण्यात आले असून त्यातील आठ विविध खाद्यपदार्थांचे तर
सेंद्रिय गूळ आणि कोल्हापुरी चप्पलचा प्रत्येकी एक स्टॉल आहे. यात एमबीए, कॉमर्स,
रसायनशास्त्र आणि फूड टेक्नॉलॉजीच्या सुमारे ४० विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सहभाग
घेतला आहे. या फेअरचे नियोजन समन्वयक डॉ. ए.एम. गुरव, श्रीमती डॉ. इंगवले व कौशल्य
विकास अधिकारी महेश चव्हाण यांनी केले आहे.
‘गीत-बहार’ला जल्लोषी प्रतिसाद
शिवाजी विद्यापीठाच्या
संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाच्या वतीने ग्रंथ महोत्सवाच्या उद्घाटनानंतर ‘गीत-बहार’ या विद्यार्थ्यांच्या
सांगितिक कार्यक्रमाचे आयोजन केले. अत्यंत बहारदार झालेल्या आणि विद्यार्थ्यांच्या
वाढत्या प्रतिसादाने उत्तरोत्तर रंगतदार होत गेलेल्या या कार्यक्रमाने उपस्थितांची
मने जिंकली. कार्यक्रमाची सुरवात ‘कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटातील ‘सूर निरागस हो...’ या गीताने झाली. सिद्धराज या दिव्यांग (अंध)
विद्यार्थ्याने ही सुरवातच इतकी खणखणीत केली की, कुलगुरू डॉ. शिंदे यांच्यासह
मान्यवरांनी गीत संपताच व्यासपीठावर जाऊन पुष्पगुच्छ देऊन त्याचे अभिनंदन केले.
‘सच्च्या गुणवत्तेला कोणत्याही मर्यादा नसतात. शारिरीक
अगर अन्य कोणतेही व्यंग तुमच्या अभिव्यक्तीमधील अडथळा ठरू शकत नाही, हे सिद्धराजने
खऱ्या अर्थाने सिद्ध केले आहे,’ असे कौतुकोद्गार कुलगुरू डॉ. शिंदे यांनी काढले.
त्यानंतर
कार्यक्रमात अधीर मन झाले.., जीव रंगला.., मोह मोह के धागे, मला वेड लागले
प्रेमाचे, नैनो में बदरा छाए, पहला नशा, डिपाडी डिपांग, एकवीरेची पाहात होते वाट,
रश्के कमर अशी गीते विद्यार्थ्यांनी एकाहून एक सरस या प्रकारे सादर केली. या गायक विद्यार्थ्यांत
सिद्धराज पाटील याच्यासह गीता रणवाडकर, विनायक लोहार, हर्षदा परीट, भावना हांडे,
रोहित कांबळे यांचा समावेश होता. त्यांना अमित साळोखे, ओंकार गुरव, विक्रम परीट,
संदेश कायंदे यांनी अतिशय उत्कृष्ट संगीतसाथ केली. आदित्य मैंदर्गीकर यांनी निवेदन
केले. या कार्यक्रमानंतर विभागाच्याच विद्यार्थ्यांनी ‘शिरियल फिरियल’ ही पार्सिकल लघुनाटिका
सादर केली. तिलाही विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद लाभला. संगीत व नाट्यशास्त्र अधिविभाग
प्रमुख डॉ. अंजली निगवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. विनोद ठाकूरदेसाई आणि निखील
भगत यांनी कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले.
No comments:
Post a Comment