शिवाजी विद्यापीठाच्या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन करताना कुलपती भगतसिंह कोश्यारी. सोबत कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्रा. भूषण पटवर्धन यांच्यासह अन्य मान्यवर. |
कोल्हापूर, दि. ७ फेब्रुवारी: शिवाजी विद्यापीठाच्या सचित्र माहितीचा समावेश असलेल्या कॉफीटेबल बुकचा उपक्रम अत्यंत स्तुत्य व अनुकरणीय आहे, असे गौरवोद्गार महाराष्ट्राचे राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी काल येथे काढले.
शिवाजी विद्यापीठाच्या ५६व्या दीक्षान्त सोहळ्याचे अध्यक्षस्थान भूषविण्यासाठी कुलपती श्री. कोश्यारी काल येथे उपस्थित होते. समारंभापूर्वी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या दालनामध्ये कुलपतींच्या हस्ते शिवाजी विद्यापीठाच्या ‘पिक्चरेस्क् शिवाजी युनिव्हर्सिटी’ या कॉफी टेबल बुकचे (मर्यादित आवृत्ती) प्रकाशन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
कुलपती श्री. कोश्यारी म्हणाले, शिवाजी विद्यापीठाने या कॉफीटेबल बुकच्या माध्यमातून विद्यापीठ परिसराचे इतके सुंदर चित्रण केले आहे की ते पुनःपुन्हा पाहात राहावेसे वाटते. मुख्य प्रशासकीय इमारतीपासून अन्य इमारती, जैवविविधता, मोर व पक्षीवैभव, जलसंवर्धन, सोयीसुविधा इत्यादी सर्वंकष माहिती केवळ छायाचित्रांच्या माध्यमातून अभ्यागतांना मिळू शकते. विद्यापीठाचे कॉफीटेबल बुक करण्याचा हा उपक्रम खरेच अनुकरणीय आहे.
यावेळी दीक्षान्त समारंभाचे प्रमुख पाहुणे प्रा. भूषण पटवर्धन, आमदार ऋतुराज पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक गजानन पळसे यांच्यासह व्यवस्थापन परिषदेचे सदस्य अमित कुलकर्णी, धैर्यशील पाटील, संजय जाधव आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment