शिवाजी विद्यापीठाच्या मराठी अधिविभागातर्फे आयोजित लोककला महोत्सवात धनगरी ओव्या सादर करताना कुरळप (जि. सांगली) येथील श्री बिरदेव भैरुसिद्ध ओवीकार मंडळाचे लोककलाकार. |
शिवाजी विद्यापीठाच्या मराठी अधिविभागातर्फे आयोजित लोककला महोत्सवात गजनृत्य सादर करताना आरेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथील श्री बिरोबा गजनृत्य वालूग मंडळाचे लोककलावंत. |
कोल्हापूर, दि. 26 फेब्रुवारी: लोककला हेच आपल्या संस्कृतीचे संचित असून पारंपरिक लोककलेचा वारसा जपण्याबरोबरच त्याचे संवर्धन करणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विद्यापीठाच्या मराठी विभागातर्फे आयोजित विशेष लोककला
महोत्सव अत्यंत स्तुत्य स्वरुपाचा आहे, असे कौतुकोद्गार शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.देवानंद शिंदे यांनी आज येथे काढले.
शिवाजी विद्यापीठाच्या मराठी अधिविभागामार्फत मराठी भाषा गौरव दिनानिमित्त 'लोकसाहित्य: उत्सव मराठीचा' या लोककला महोत्सवाचे आयोजन वि.स.खांडेकर भाषा भवन सभागृहामध्ये करण्यात आले. त्यावेळी कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी कुलगुरू डॉ.शिंदे बोलत होते. प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरू डॉ.शिंदे म्हणाले, प्रमाण भाषेचे अवडंबर
माजविताना बोली भाषा, लोकभाषा, मातृभाषा यांकडे संकुचित पध्दतीने पाहिले जाते. हा संकुचित
दृष्टीकोन दूर करणे आवश्यक आहे. महाराष्ट्रातील लोककलेला व्यापक स्वरूप प्राप्त होण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत. मातृभाषेचे जतन करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असणे गरजेचे आहे. लोकसंगीत, लोककला आणि लोकसाहित्य हा आपला वारसा आहे. त्याकडे काही तरी ग्राम्य म्हणून पाहणे उचित नाही, ते आपल्या संस्कृतीचे खरे संचित आहे, या भावनेतून त्याकडे पाहिले जाणे आवश्यक आहे. जो समाज आपला इतिहास विसरतो, तो इतिहास घडवू शकत नाही, असे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार होते. त्यानुसार आपला हा वारसा आपण विसरुन चालणार नाही. तथापि, लोककलांचे संवर्धन करण्याची आपली जबबादारी आहेच, मात्र त्याच वेळी आजच्या काळात विवेकवादाला नकार देणे हे सुद्धा योग्य होणार नाही.
याप्रसंगी प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के म्हणाले, आपल्या संस्कृतीचा ठेवा असलेल्या कलाविष्कारांचा काळाबरोबर ऱ्हास होऊ नये. सोशल मीडियाच्या काळामध्ये या कलाविष्कारांचे जतन करण्यासाठी त्यांचे स्वरुप बदलण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे.
सुरवातीला कवी कुसुमाग्रज आणि सरोजिनी बाबर यांच्या प्रतिमांचे पुजन करण्यात आले. याप्रसंगी चित्रकार भास्कर हांडे यांनी अक्षरचित्र रेखाटन केलेल्या प्रतिमेचे अनावरण कुलगुरू डॉ.शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
दरम्यान, या लोककला महोत्सवामध्ये जात्यावरील ओव्या, धनगरी ओव्या, गजनृत्य, गण-गवळण, लावणी व बैठकीची लावणी, भेदिक शाहिरी, राष्ट्रीय शाहिरी, झिम्मा फुगडी, पोतराज, वासुदेव यांचे वैविध्यपूर्ण पद्धतीने सादरीकरण करण्यात आले.
मराठी अधिविभागाप्रमुख डॉ.रणधीर शिंदे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, तर डॉ. नंदकुमार मोरे यांनी आभार मानले. यावेळी संगीत व नाटयशास्त्र अधिविभागप्रमुख डॉ.अंजली निगवेकर, विदेशी भाषा अधिविभागप्रमुख डॉ.मेघा पानसरे, साहित्यिक किरण गुरव यांच्यासह मराठी भाषा आणि लोककलाप्रेमी जनता, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment