कोल्हापूर, दि. १८
फेब्रुवारी: जीवनशैलीमध्ये पूरक बदल आणि योग्य आहार व नियमित व्यायामाने वजन कमी करणे या बाबींच्या
सहाय्याने महिलांना पॉलिसिस्टीक ओव्हरियन आजारांवर (पीसीओडी) निश्चितपणे मात करता
येते, असे प्रतिपादन येथील प्रिस्टीन महिला हॉस्पिटलचे प्रख्यात वंध्यत्व व
आयव्हीएफ तज्ज्ञ डॉ. सचिन कुलकर्णी यांनी आज येथे केले.
शिवाजी
विद्यापीठाच्या ‘डॉ. आप्पासाहेब तानसेन वरुटे स्मृती व्याख्यानमाले’मध्ये ‘तरुण महिलांमधील
प्रजननविषयक सर्वसाधारण समस्या आणि आयव्हीएफ तंत्रज्ञान’ या विषयावर व्याख्यान
देताना डॉ. कुलकर्णी बोलत होते. प्राणीशास्त्र अधिविभागाच्या सभागृहात झालेल्या या
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आंतरविद्याशाखा विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. पी.डी.
राऊत होते.
डॉ. सचिन कुलकर्णी
यांनी आपल्या सुमारे दोन तासांच्या भाषणामध्ये स्त्री-आरोग्य, त्याविषयीचे
समज-गैरसमज, मासिक पाळी, स्त्री-पुरूषांतील वंध्यत्व समस्या, त्यासंदर्भातील
जागृतीची गरज आणि आधुनिक तंत्रज्ञान आदी बाबींविषयी अत्यंत सहजसोप्या भाषेत प्रबोधन
केले. व्याख्यानाला विद्यार्थिनींची लक्षणीय उपस्थिती होती.
Dr. Sachin Kulkarni |
डॉ. कुलकर्णी
म्हणाले, स्त्री-पुरूषांतील शारीरिक व लैंगिक बदल हे नैसर्गिक आहेत. त्याविषयी मनामध्ये विनाकारण गैरसमज आणि संकोच बाळगण्याची अजिबात गरज नाही. शरीरामधील
संप्रेरकांच्या पातळीमधील बदल सर्व प्रकारच्या लैंगिक समस्यांना कारणीभूत ठरतो.
वाढलेले वजन आणि मासिक पाळी यांचा थेट संबंध आहे, ही बाब लक्षात घेतली पाहिजे.
त्यामुळे दोन ते सात दिवस या दरम्यान असणारी मासिक पाळी आणि साधारण २१ ते ३५
दिवसांचे पाळीचे चक्र या बाबी अत्यंत सर्वसाधारण आहेत, हे लक्षात घ्यावे. त्यापेक्षा
कमी अगर अधिक कालावधी असेल तर मात्र वैद्यकीय सल्ला घेणे अधिक योग्य ठरते.
दहावी-बारावीच्या परीक्षांच्या कालखंडात मानसिक ताणतणाव, सारीरिक श्रम कमी होणे,
हालचालीचा अभाव आणि बसल्या जागी खाणे यांचा परिणाम आरोग्याच्या समस्या उद्भवण्यात
होतो. मुलींमध्ये वजन वाढल्याने त्यांच्यात पाळीविषयक समस्या निर्माण होतात.
त्यामुळे वजन नियंत्रणात राखणे हाच या सर्व समस्यांवरचा महत्त्वाचा उपाय असल्याचेही
त्यांनी सांगितले.
डॉ. कुलकर्णी पुढे
म्हणाले, विवाह ठरविला जात असताना वधू-वरांनी अन्य कोणत्याही बाबींपेक्षा मूल
केव्हा होऊ द्यायचे, याविषयी खुलेपणाने चर्चा करणे आजघडीला खूप गरजेचे आहे. त्या
दृष्टीने निरोधाच्या साधनांची निवड वैद्यकीय सल्ल्याने करणे अधिक श्रेयस्कर ठरते.
प्रसुती ठरवित असताना महिलांनी त्यांची अँटी-म्युलेरियन हार्मोन (ए.एम.एच.) चाचणी
जरुर करून घ्यावी. ती वैद्यकीय तज्ज्ञांकडूनही करून घेता येते अगर आपली आई अथवा
मावशी यांची मासिक पाळी कधी समाप्त झाली, यावरुनही त्याचा आडाखा बांधता येतो.
ज्यांची एएमएच मुदत अलीकडे असेल, त्यांनी आधी मूल होऊ द्यावे आणि मग करिअर करावे
आणि ज्यांचा कालावधी अधिक आहे, त्या महिला प्रसुती थोडी लांबवू शकतात. तथापि,
कोणत्याही महिलेने प्रसुतीला आपल्या करिअरमधला अडथळा मानू नये कारण प्रजननातून
मिळणारा सृजनाचा जीवनानंद तुम्हाला अन्य कोणत्याही गोष्टीतून मिळू शकत नाही. तसेच
विवाह शक्यतो नात्यांतर्गत करू नयेत कारण नात्यातील विवाहातून जन्मणारी सुमारे तीस
टक्के बालके सव्यंग जन्मतात. नात्याबाहेरील विवाहात हे प्रमाण अडीच टक्के इतकेच
आहे, असा सल्लाही त्यांनी दिला.
विवाहेच्छु महिलांनी
विवाहाआधी किमान एक वर्षभर फॉलिक अॅसिड, व्हिटॅमिन
बी-१२ या गोळ्यांचा कोर्स करावा. त्याचप्रमाणे आहारामध्ये नेहमीच कॅल्शियम व
प्रथिनयुक्त पदार्थांचा समावेश असेल, याची दक्षता घ्यावी. महिलांनी विशेषतः आपल्या
हिमोग्लोबिन व थायरॉईडच्या पातळीची नित्य तपासणी करीत राहावे, असा सल्लाही डॉ.
कुलकर्णी यांनी दिला. त्यांनी यावेळी आयव्हीएफ तंत्रज्ञानाची सर्वंकष माहिती दिली,
त्याचप्रमाणे उपस्थितांच्या शंकांना उत्तरेही दिली.
अध्यक्षीय भाषणात अधिष्ठाता डॉ. पी.डी. राऊत म्हणाले, महिला आणि पुरूष या
दोघांमध्येही जीवनशैलीशी निगडित वंध्यत्व समस्या दिसून येतात. त्यावर वैद्यकीय
शास्त्राने उपाय शोधून दिले आहेतच, पण केवळ जीवनशैली बदलून सुद्धा त्यावर मात करता
येते, हे या व्याख्यानातून स्पष्ट झाले आहे. त्याचप्रमाणे एम्ब्रियॉलॉजी ही
ज्ञानशाखा या क्षेत्रामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे दिसून येते.
त्या शाखेचा एखादा लघु अभ्यासक्रम विभागात सुरू करण्याच्या दृष्टीने प्रयत्न
करण्याची आवश्यकता आहे.
यावेळी व्याख्यानमालेचे समन्वयक डॉ. एस.एम. गायकवाड यांनी स्वागत व
प्रास्ताविक केले. अधिविभाग प्रमुख डॉ. व्ही.एस. मन्ने यांनी परिचय करून दिला. डॉ.
एम.पी. भिलावे यांनी आभार मानले. यावेळी डॉ. ए.डी. जाधव, डॉ. श्रीमती एम.व्ही.
वाळवेकर, डॉ. एन.ए. कांबळे, डॉ. एस.आर. यनकंची, डॉ. ए.ए. देशमुख यांच्यासह
विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment