Sunday 16 October 2022

जागतिक आघाडीच्या दोन टक्के संशोधकांत शिवाजी विद्यापीठाचे दहा प्राध्यापक

पदार्थविज्ञानाच्या ४ शिक्षकांसह २५ माजी विद्यार्थ्यांचाही समावेश

 

जागतिक आघाडीच्या दोन टक्के संशोधकांमध्ये स्थान प्राप्त केलेल्या शिवाजी विद्यापीठातील संशोधक-प्राध्यापकांचा सत्कार करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्यासह मान्यवर अधिकारी.



अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या ताज्या क्रमवारीतील मानांकन

कोल्हापूर, दि. १६ ऑक्टोबर: जगभरातील आघाडीच्या दोन टक्के संशोधकांची ताजी यादी अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठाने नुकतीच जाहीर केली असून त्यामध्ये शिवाजी विद्यापीठाच्या दहा संशोधकांना मानांकन प्राप्त झाले आहे. विशेष म्हणजे यामध्ये पदार्थविज्ञान अधिविभागातील चार संशोधकांसह २५ माजी विद्यार्थ्यांनाही स्थान लाभले आहे.

स्टॅनफोर्ड विद्यापीठाने गत वर्षी जाहीर केलेल्या जागतिक स्तरावरील दोन टक्के आघाडीच्या संशोधकांच्या यादीमध्येही शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांना स्थान लाभले होते. यंदाही त्यांना पुनर्मानांकन लाभले आहे. या यादीमध्ये विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. पी.एस. पाटील (पदार्थविज्ञान), प्रा. केशव राजपुरे (पदार्थविज्ञान), प्रा. ए.व्ही. राव (पदार्थविज्ञान), प्रा. एस.पी. गोविंदवार (पदार्थविज्ञान), डॉ. ज्योती जाधव (जैवरसायनशास्त्र), डॉ. ए.व्ही. मोहोळकर (पदार्थविज्ञान), प्रा. हेमराज यादव (रसायनशास्त्र), डॉ. सचिन ओतारी (नॅनोतंत्रज्ञान), प्रा. के.एम. गरडकर (रसायनशास्त्र), प्रा. तुकाराम डोंगळे (इलेक्ट्रॉनिक मटेरियल्स) यांचा समावेश आहे.

स्कोपसडेटाबेसवर आधारित एल्सव्हिअरने तयार केलेल्या या यादीसाठी सन १९६० ते २०२ या कालावधीमध्ये संशोधकीय योगदान देणाऱ्या संशोधकांचा सार्वकालिक कामगिरी आणि वार्षिक कामगिरी अशा दोन निकषांवर विचार करण्यात आला आहे. २२ विज्ञान विषय आणि १७६ उपविषयांमधील संशोधनाची दखल त्याअंतर्गत घेतली गेली आहे. शोधनिबंधांची संख्या आणि दर्जा, संशोधन पत्रिकेचा दर्जा, शोधनिबंधाला प्राप्त झालेली सायटेशन्स, एकच लेखक असणारे शोधनिबंध, स्वतःची सायटेशन्स वगळून असणारे शोधनिबंध अशा अनेक काटेकोर निकषांवर आधारित ही यादी जाहीर केली जाते.

महत्त्वाची बाब म्हणजे २०२२च्या जागतिक आघाडीच्या २% संशोधकांच्या डेटाबेसमध्ये शिवाजी विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र अधिविभागाचे चार शिक्षक आणि तब्बल २५ माजी विद्यार्थी झळकले आहेत. त्यापैकी बहुतेकजण आता परदेशात पोस्ट डॉक्टरेट करत आहेत. ही विभागाच्या आणि विद्यापीठाच्या दृष्टीने अत्यंत भूषणावह बाब आहे.

करिअर परफॉर्मन्स अर्थात सार्वकालिक कामगिरीच्या यादीत प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, निवृत्त शिक्षक डॉ. ए. व्यंकटेश्वरा राव, डॉ. सी.डी. लोखंडे, अधिविभागप्रमुख डॉ. के.वाय. राजपुरे, डॉ. आर.एस. माने, डॉ. बी.आर. संकपाळ, डॉ. दिपक डुबल आणि डॉ. संभाजी एस.शिंदे यांचा समावेश आहे. तर, वार्षिक कामगिरीच्या डेटाबेसमध्ये उपरोक्त संशोधकांसह पुढील संशोधकांनी स्थान मिळवले आहे: डॉ. ए.व्ही. मोहोळकर, डॉ. आर.एस. देवण, डॉ. व्ही.एल. मथे, डॉ. एच.एम. पठाण, डॉ. एस.एम. पवार, डॉ. आर.आर. साळुंखे, डॉ. वाय.एम. हुंगे, डॉ. एस.एस.माळी, डॉ. आर.सी. कांबळे, डॉ. एस.एस. लठ्ठे, डॉ. एन. आर. चोडणकर, डॉ. एस.जे. पाटील, डॉ. एस.के. शिंदे, डॉ. अकबर आय. इनामदार, डॉ. गिरीश गुंड, डॉ. आर.सी. पवार, डॉ. उमाकांत एम. पाटील, डॉ. ए.डी. जगदाळे आणि डॉ. एम.पी. सूर्यवंशी.

 

सातत्यपूर्ण संशोधनातून साधलेली कामगिरी विद्यापीठास भूषणावह: कुलगुरू डॉ. शिर्के

शिवाजी विद्यापीठातील दहा शिक्षक जागतिक आघाडीच्या दोन टक्के संशोधकांच्या यादीमध्ये स्थान प्राप्त करतात, ही बाब एका रात्रीत साध्य झालेली नाही. त्यामागे त्यांचे सातत्यपूर्ण संशोधकीय परिश्रम आहेत. त्यामुळेच ते सलगपणाने या यादीमधील आपले स्थान अबाधित राखू शकले आहेत. ही बाब विद्यापीठास अत्यंत भूषणावह आहे. तसेच, नवसंशोधकांना प्रेरणा देणारी आहे, असे गौरवोद्गार कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी काल काढले.

भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीचे औचित्य साधून या संशोधकांचा काल सायंकाळी विद्यापीठ कार्यालयात गौरव करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ शास्त्रज्ञ प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांच्यासह डॉ. के.वाय. राजपुरे, डॉ.ज्योती जाधव, डॉ. ए.व्ही. मोहळकर, डॉ. के.एम. गरडकर,  डॉ. टी.डी. डोंगळे, डॉ. हेमराज यादव, डॉ. सचिन ओतारी यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी प्रभारी कुलसचिव डॉ.विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.अजितसिंह जाधव, वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ.सरिता ठकार, मानव्यशास्त्र विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. एम.एस. देशमुख, क्रीडा संचालक डॉ.शरद बनसोडे, आजीवन अध्ययन केंद्राचे संचालक डॉ. रामचंद्र पवार, बॅ. बाळासाहेब ज्ञानस्रोत केंद्राचे संचालक डॉ.धनंजय सुतार आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment