शिवाजी विद्यापीठात गांधी जयंतीनिमित्त आयोजित विशेष व्याख्यानात बोलताना ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौैसाळकर. |
शिवाजी विद्यापीठात महात्मा गांधी आणि लाल बाहदूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमापूजन प्रसंगी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील. सोबत (डावीकडून) |
कोल्हापूर, दि. २
ऑक्टोबर: महात्मा गांधी यांना अभिप्रेत मूल्यांच्या पायावर
आजच्या राजकारणाचे शुद्धीकरण करण्यास प्रतिबद्ध व्हावे, हाच आजच्या दिवसाचा संदेश
आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या गांधी अभ्यास केंद्रातर्फे महात्मा गांधी यांच्या
जयंतीनिमित्त आयोजित विशेष व्याख्यानात ते बोलत होते. विद्यापीठाच्या राजर्षी शाहू
सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते,
तर प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील प्रमुख उपस्थित होते.
डॉ. चौसाळकर म्हणाले, महात्मा गांधी यांची न्यायविषयक भूमिका अत्यंत सुस्पष्ट
स्वरुपाची होती. आयुष्यात कितीही मोठे आमिष अगर सत्ताशक्ती हाती आले, तरी सुद्धा
कोणत्याही परिस्थितीत न्यायाने वागणे न सोडणारी माणसे त्यांना अभिप्रेत होती. विशेषतः
आजच्या राजकारणाच्या संदर्भात हे विधान अधिक लागू पडणारे आहे. राजकारणाच्या बाबतीत
लोकमान्य टिळकांची भूमिका ‘शठे
प्रति शाठ्यम्’ आणि गांधीजींची भूमिका
‘शठे प्रति सत्यम्’ अशी असली तरी सध्याची स्थिती या
दोघांनाही मान्य होणारी नाही. म्हणूनच राजकारणाचे मोठ्या प्रमाणात नैतिकीकरण होणे
आवश्यक आहे.
डॉ. चौसाळकर पुढे म्हणाले, लोकमान्य टिळकांनी स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण
आणि बहिष्कार या चार संकल्पना भारताला दिल्या, तथापि, त्या अनुषंगाने त्यांना
मर्यादित काम करता आले. महात्मा गांधी यांनी या चार संकल्पना खऱ्या अर्थाने समृद्ध
करण्याचे काम केले. गांधीजींनी अनुक्रमे हिंद स्वराज्य, खादी आणि ग्रामोद्योग, नई
तालीम अर्थात नवशिक्षण आणि निःशस्त्र प्रतिकार अर्थात सत्याग्रह असा त्यांचा
विस्तार व अवलंब केला. श्रमशक्ती, धंदेशिक्षण आणि कौशल्य विकास असे सर्वांगीण
व्यक्तीमत्त्व घडविणारे तिहेरी शिक्षण त्यांना अपेक्षित होते.
यावेळी डॉ. चौसाळकर यांनी कार्यक्रमात प्रकाशित करण्यात आलेल्या प्रा. राम
बापट यांच्या ‘स्वराज्य आणि
राज्यसंस्था’ आणि प्रा. भारती पाटील
संपादित ‘लोकमान्य आणि महात्मा’ या पुस्तकांविषयीही सविस्तर
विवेचन केले.
प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांनी संशोधनाच्या क्षेत्रामध्येही महात्मा
गांधी यांना अपेक्षित नैतिकता आणि मूल्ये यांची नितांत आवश्यकता असल्याचे
प्रतिपादन केले.
अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, सन १९३७मध्ये वर्धा येथे
झालेल्या शैक्षणिक परिषदेला महात्मा गांधी उपस्थित होते आणि त्यावेळी त्यांनी
राष्ट्रीय शिक्षण पद्धतीच्या अनुषंगाने नई तालीम पद्धती उद्घोषित केली.
विद्यार्थ्यांचे मन, बुद्धी आणि शरीर यांचा सुसंगम साधून त्यांचा सर्वांगीण विकास
साधण्यासाठी एक मोठी देणगी या माध्यमातून दिलेली आहे. मूल्यशिक्षणाच्या बरोबरीने नई
तालीमही आपण पुढे घेऊन जाणे गरजेचे आहे. वाचिक शिक्षण हे तर महत्त्वाचेच, मात्र
कृतीशील शिक्षण हे माणसाला परिपूर्ण बनविते. गांधीजींचे विचार आपल्याला त्या
परिपूर्णतेकडे घेऊन जाणारे आहेत. त्यांच्या सिद्धांतांचा अंगिकार केल्यास
राष्ट्रविकास शक्य आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर यांनीही मनोगत व्यक्त केले. मान्यवरांच्या
हस्ते प्रा. राम बापट लिखित ‘स्वराज्य
आणि राज्यसंस्था’
आणि प्रा. भारती पाटील संपादित ‘लोकमान्य
आणि महात्मा’ या पुस्तकांचे प्रकाशन
करण्यात आले. त्याचप्रमाणे कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते महात्मा गांधी
यांच्या ‘सत्याचे प्रयोग’ या आत्मकथेच्या क्रमशः अभिवाचन
ध्वनी-मालिकेचे अनावरण करण्यात आले. विद्यापीठाच्या ‘शिव-वाणी’
या युट्यूब ध्वनी-वाहिनीवरुन या मालिकेचे दररोज सकाळी ८.३० वाजता प्रसारण होणार
आहे.
गांधी जयंतीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धा, निबंध
स्पर्धा आणि पोस्टर स्पर्धा यांचे बक्षीस वितरण यावेळी करण्यात आले. डॉ. भारती
पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सुस्मिता खुटाळे यांनी सूत्रसंचालन केले,
तर प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी आभार मानले.
तत्पूर्वी, शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय भवनात महात्मा गांधी आणि लालबहादूर
शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ.
प्रमोद पाटील यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. तसेच आंतरराष्ट्रीय अहिंसा
दिनानिमित्त सामूहिक शपथही घेण्यात आली.
यावेळी परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, वाणिज्य व
व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, मराठी विभाग प्रमुख डॉ.
नंदकुमार मोरे, इतिहास विभाग प्रमुख डॉ. अवनीश पाटील, विकास विभागाचे संचालक डॉ.
आर.व्ही. गुरव, क्रीडा विभागाचे संचालक डॉ. शरद बनसोडे, डॉ. पी.एस. कांबळे, डॉ.
प्रमोद वासंबेकर, ज्येष्ठ पत्रकार दशरथ पारेकर यांच्यासह शिक्षक, प्रशासकीय अधिकारी
आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment