Tuesday 4 October 2022

‘राणादा बदाम थंडाई’चे शिवाजी विद्यापीठात उद्घाटन

 सेक्शन-८ कंपनीमार्फत नवउद्योगास पाठबळ

 

शिवाजी विद्यापीठाच्या सेक्शन-८ कंपनीमार्फत नवउद्योगांना पाठबळ उपक्रमांतर्गत 'राणादा बदाम थंडाई'चे उद्घाटन करताना संभाजीराजे छत्रपती आणि कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. सोबत (डावीकडून) डॉ. विलास शिंदे, डॉ. मेघा गुळवणी, डॉ. श्रीकृष्ण महाजन, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, डॉ. एम.एस. देशमुख, धनंजय वडेर आणि त्यांचे कुटुंबीय व डॉ. प्रकाश पवार.

कोल्हापूर, दि. ४ ऑक्टोबर: महाराष्ट्र स्टार्टअपच्या माध्यमातून नवसंकल्पना नव व्यवसायाच्या संधी युवकांना उपलब्ध होत आहेत. राज्यातील नाविन्यपूर्ण संकल्पना नवउद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या नाविन्यता सोसायटी शिवाजी विद्यापीठाच्या एसयुके रिसर्च ॲन्ड डेव्हलपमेंट फाऊंडेशन या सेक्शन 8 कंपनीमार्फत 15 नवउद्योगांच्या पंखांना बळ दिले आहे. त्याअंतर्गत धनंजय वडेर यांनी 'राणादा फुड्स एलएलपी' ही कंपनी सुरू झाली असून या कंपनीतर्फे 'बदाम थंडाई' हे पेय तयार केले आहे. याकरिता सिनेअभिनेता हार्दिक जोशी हे कंपनीचे सदिच्छादूत आहे.

बदाम थंडाई ही कोल्हापूरच्या कुस्ती क्षेत्राची ओळख आहे. पैलवानांकरीता हे पेय म्हणजे अमृतच आहे. अलिकडचे सेलिब्रीटी न्यूट्रिशनिस्ट ऋतुजा दिवेकर यांनी या पेयाचे फायदे सांगितले आहेत. त्यामुळे या पेयास मागणी वाढत असून राणादा बदाम थंडाई आता प्रदूषणविरहित गाडीमधून संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध करून देणार आहेत. या गाडीत थंडाई पारंपरिक पध्दतीने थंड करून ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामागचा उद्देश एकच आहे की कमीत कमी गुंतवणुकीमध्ये जास्तीत जास्त रोजगार मिळवून देता येईल.

      'राणादा थंडाई' या शून्य प्रदूषण गाडीचे उद्धाटन शिवाजी विद्यापीठाच्या नवोपक्रम, नवसंशोधन साहचर्य केंद्र येथे झाले. याप्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के म्हणाले की, अशा प्रकारचे पारंपरि उद्योग नव्या स्वरूपात तरूणाई आणत असून स्वत:चा व्यवसाय सुरू करून त्यामध्ये इतरांना व्यवसाय देण्याचे काम करीत आहे. ही अत्यंत आनंदाची बाब आहे. अशा व्यवसायाच्या फ्रॅन्चाइजी युवकांनी घेतल्यास बेरोजगारी कमी होण्यास नक्कीच मदत होईल.

या समारंभास प्रमुख उपस्थित असणारे छत्रपती संभाजीराजे यांनीही या उपक्रमाचे स्वागत केले. ते म्हणाले, या इन्क्यूबेशन सेंटर च्या माध्यमातून  नविन स्टार्टअप ना प्रोत्साहन मिळेल आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. असे नव्या या पध्दतीचे व्यवसाय सुरू केल्यास त्यास आपण नक्कीच प्रोत्साहन देऊ, असे सांगितले.

सदर उद्धाटन प्रसंगी आमदार ऋतुराज पाटील उपस्थित होते. त्यांनीही या उपक्रमास शुभेच्छा देऊन शासनाकडूनही मदत मिळवून देण्याची ग्वाही दिली.

कार्यक्रमास शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, अधिष्ठाता नवोपक्रम, नवसंशोधन साहचर्य केंद्राचे संचालक डॉ एम.एस. देशमुख, अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, अधिष्ठाता डॉ. मेघा गुळवणी, प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, डॉ. प्रकाश पवार आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment