शिवाजी विद्यापीठात लोकनेते बाळासाहेब देसाई अध्यासनाच्या आढावा बैठकीत बोलताना मंत्री शंभूराज देसाई. सोबत जिल्हाधिकारी राहुल रेखावार, आमदार सुजीत मिणचेकर, उच्च व तंत्र शिक्षण उपसंचालक हेमंत कठरे. |
कोल्हापूर, दि. १
ऑक्टोबर: शिवाजी विद्यापीठाच्या
लोकनेते बाळासाहेब देसाई अध्यासनाच्या कामाला गती देण्यासाठी शासकीय तसेच
व्यक्तीगत स्तरावर सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही महाराष्ट्राचे राज्य
उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी आज येथे दिली.
मंत्री शंभूराज देसाई यांनी आज शिवाजी विद्यापीठात लोकनेते बाळासाहेब देसाई
अध्यासनाच्या अनुषंगाने आढावा बैठक घेतली. या बैठकीमध्ये अध्यासनाच्या कामकाजाची
विशेषतः अडचणींची आणि भविष्यात करता येऊ शकणाऱ्या विविध विधायक कामांची माहिती
घेतली.
लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे शिवाजी विद्यापीठाच्या उभारणीमधील योगदान
अतुलनीय स्वरुपाचे असल्याचे सांगून मंत्री श्री. देसाई म्हणाले, नव्या पिढीला
लोकनेते देसाई यांचे उत्तुंग कार्य माहिती होण्याच्या दृष्टीने या अध्यासनाच्या
माध्यमातून विविध उपक्रमांच्या माध्यमातून प्रयत्न होणे आवश्यक आहे. त्यासाठी मदतीसाठी
शासन तत्पर असून अध्यासनासाठी मंजूर करण्यात आलेल्या तीन कोटी रुपयांमधील उर्वरित
अडीच कोटी रुपयांचा निधी तातडीने विद्यापीठास वितरित करण्यासाठी आवश्यक त्या पूर्तता
करण्यात येतील. शासनाव्यतिरिक्त विविध उद्योग-व्यवसायांच्या सामाजिक दायित्व
निधीमधूनही निधी मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. त्याचप्रमाणे विद्यापीठाच्या
वस्तुसंग्रहालय संकुलामध्ये लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या जीवनकार्यावर
प्रकाशझोत टाकणारे स्वतंत्र कलादालन निर्माण करण्यात यावे. त्यासाठीही सर्वोतोपरी
सकारात्मक मदत करण्यात येईल. यासाठी जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण
योजनेअंतर्गत निधीची तरतूद करण्याची सूचनाही मंत्री महोदयांनी जिल्हाधिकारी राहुल
रेखावार यांना या प्रसंगी केली. अध्यासनाच्या कामाला गती देण्यासाठी राज्याचे उच्च
व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, पालकमंत्री दीपक केसरकर
यांच्यासमवेतही चर्चा करू, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी सुरवातीला मंत्री श्री. देसाई यांच्या हस्ते लोकनेते बाळासाहेब देसाई
यांच्या प्रतिमेस पुष्पहार वाहून अभिवादन करण्यात आले. प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद
पाटील यांच्या हस्ते मंत्री श्री. देसाई यांचा शाल, श्रीफळ व ग्रंथभेट देऊन सत्कार
करण्यात आला. अध्यासनाचे प्रमुख डॉ. अवनीश पाटील यांनी अध्यासनाविषयी सादरीकरण
केले. यावेळी आमदार सुजीत मिणचेकर, श्री. शिवराज देसाई, जिल्हाधिकारी राहुल
रेखावार, उच्च व तंत्रशिक्षण कोल्हापूर विभागाचे उपसंचालक हेमंत कठरे, प्रभारी
कुलसचिव डॉ. विलास शिंदे, प्रभारी वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, मानव्यशास्त्र
विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. एम.एस. देशमुख, डॉ. भारती पाटील, डॉ. अरुण भोसले, व्ही.जी.
पानस्कर आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment