कोल्हापूर, दि. ३० जुलै: प्रागतिक, सुधारणावादी
आणि चिकित्सक दृष्टीकोनातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी राजकारण आणि समाजकारणाला
विशेष आकार दिला. देश उभारणीसाठी प्रयत्न करीत असताना शेतकऱ्यांना शेतीमध्ये आणि स्त्रियांना
वस्त्रोद्योगामध्ये प्रोत्साहन देऊन रयतेची काळजी वाहिली. पुढे तोच उद्योग जगभर विकसित
झाला, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाच्या राज्यशास्त्र अधिविभागाचे प्रमुख डॉ.प्रकाश
पवार यांनी आज येथे केले.
शिवाजी
विद्यापीठाच्या अहिल्यादेवी होळकर अध्यासनाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर
यांच्या त्रिशताब्दी जयंती महोत्सवी वर्षानिमित्त इतिहास अधिविभागाच्या सभागृहामध्ये
‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर: जीवन
आणि कार्य’ या विषयावर एकदिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के होते,
तर वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन यांची
विशेष उपस्थिती होती.
डॉ.पवार
म्हणाले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना राजकारणाची जाणीव
आयुष्याच्या पहिल्या पंचवीस वर्षांमध्येच झालेली होती. अहिल्यादेवींनी आपल्या कार्यकर्तृत्वाने
अठराव्या शतकाला आकार देण्याचा प्रयत्न केला. अठरावे शतक होळकरांनी व्यापलेले आहे.
अहिल्यादेवींनी लहानपणी चौंडीच्या परिसरातील पाटलांचे, त्यांच्या वडिलांचे राजकारण
त्यांनी पाहिले आणि ते त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचे ठरले. पुढील काळात त्यांनी उत्तर
आणि पश्चिम हिंदुस्थानासह संपूर्ण हिंदुस्थान पाहिले. त्यांच्या सासऱ्यांनी मुलगा आणि
मुलगी यामध्ये भेदभाव करावयाचा नाही, हा दृष्टीकोन दिला. त्यामुळे अहिल्यादेवींनी सती
जाण्याचा निर्णय नाकारून होळकरशाहीचे उदयास आलेले राजकारण सांभाळण्याचा निर्णय घेतला.
एक महिला समाज, राजकारणाला आकार देवू शकते, ही अहिल्यादेवींमुळे आलेली पहिली परंपरा आहे. महिला राजकारण करू शकते, हे भारतामध्ये
या ठिकाणी पहिल्यांदाच घडले.
अहिल्यादेवींनी
स्वच्छ प्रशासन कारभार केला आणि आर्थिक दृष्टीकोनातून त्या अत्यंत सजग असल्याचे
सांगून डॉ. पवार म्हणाले, अठरावे शतक हे आर्थिकदृष्टया अनागोंदीचे शतक होते. होळकरशाहीची
संस्थाने कधीही कर्जात पडलेली नव्हती. राज्य उभारण्यासाठी स्वनिधी उपलब्ध होता. मराठेशाहीचा
पहिला टप्पा आणि होळकरांचा दुसरा टप्पा हे एकमेकांशी जोडून आहेत. राघोबादादांनी मल्हारराव
होळकरांची संपत्ती मिळविण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी अहिल्यादेवींचा मुत्सद्दीपणा
आणि डावपेच महत्त्वाचे ठरले. अहिल्यादेवींचे प्रशासनावर चांगले नियंत्रण होते. समाजोपयोगी
कामासाठी लागणारा पैसा हा त्यांनी कधीच कररूपाने गोळा केला नाही. स्वत:च्या पंधरा ते
सोळा कोटी रूपयांचा अहिल्यादेवींनी सार्वजनिक कल्याणासाठी वापर केला. सरकारचा पैसा खाजगीकडे खर्च न करण्याचा
आदर्श वस्तुपाठ अहिल्यादेवींनी घालून दिला. अहिल्यादेवींचे अखिल चरित्र संशोधकांना
खुणावणारे आहे. त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आधुनिक संशोधकांनी वेध घेणे महत्त्वाचे
आहे.
अध्यक्षीय
मनोगतामध्ये कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के म्हणाले, तीनशे वर्षांपूर्वीच्या
थोर व्यक्तींवर अपेक्षित संशोधन वा अभ्यास झालेला नाही. समकालीन ब्रिटीश लेखकांनी इतिहासलेखन
केले नसते, तर अडचणी अधिकच वाढल्या असत्या. कोल्हापूर दफ्तरामध्ये होळकरशाहीशी संबंधित
अप्रकाशित इतिहास आहे. त्याचा अभ्यास व्हायला हवा. होळकरशाहीमधील स्त्रियांचा अभ्यास
व्हायला हवा. राजकीय अर्थव्यवस्थेमध्ये त्यांचे किती महत्त्व होते हे आधोरेखीत करण्यासाठी
हा अभ्यास आवश्यक आहे. जातीभेदाच्या पलीकडे जाऊन त्यांनी कार्य केले. त्यावेळच्या स्थापत्यशास्त्राचाही
अभ्यास करणे आवश्यक आहे. कोरीव लेख, शिलालेख, ताम्रपट यांचा अभ्यास नवसंशोधकांनी जरुर करावा, असे आवाहन त्यांनी केले.
डॉ. मच्छिंद्र गोफणे यांनी प्रास्ताविक केले. प्राजक्ता राजमाने यांनी सूत्रसंचालन केले तर दत्ता टिपूगडे यांनी आभार मानले. यावेळी बबनराव रानगे, इतिहास अधिविभागप्रमुख डॉ.अवनीश पाटील, डॉ.रणधीर शिंदे, डॉ.नंदकुमार मोरे, डॉ. नीलांबरी जगताप, ॲड.अभिषेक मिठारी, डॉ.करपे, शहाजी सिद, खगोल अभ्यासक किरण गवळी, डॉ. अनमोल कोठडिया, नांगरे यांच्यासह संशोधक, शिक्षक, विद्यार्थी- विद्यार्थिनी मोठया संख्येने उपस्थित होते.