Friday 13 September 2024

खगोलविज्ञानाच्या क्षेत्राला ध्येयभारित संशोधकांची गरज: डॉ. आर. श्रीआनंद

शिवाजी विद्यापीठात तीनदिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेस प्रारंभ

शिवाजी विद्यापीठात आयोजित दिनदिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेच्या उद्घाटन सत्रात बोलताना 'आयुका'चे संचालक डॉ. आर. श्रीआनंद. मंचावर (डावीकडून) प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के आणि डॉ. राजेंद्र सोनकवडे.

शिवाजी विद्यापीठात आयोजित दिनदिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेच्या उद्घाटन सत्रात बोलताना 'आयुका'चे संचालक डॉ. आर. श्रीआनंद. 


कोल्हापूर, दि. १३ सप्टेंबर: ध्येयभारित संशोधकांची खगोलविज्ञानाच्या क्षेत्राला गरज आहे. त्या दृष्टीने नवसंशोधकांनी तयारीला लागावे, असे आवाहन पुणे येथील इंटर-युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अॅस्टॉनॉमी अँड अॅस्ट्रोफिजिक्स (आयुका)चे संचालक डॉ. आर. श्रीआनंद यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्रातील समकालीन समस्या-२०२४ या विषयावरील तीनदिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे उद्घाटन आज सकाळी डॉ. श्रीआनंद यांच्या हस्ते झाले. विद्यापीठाचा भौतिकशास्त्र अधिविभाग आणि आयुका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या या परिषदेच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते, तर प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील प्रमुख उपस्थित होते.

डॉ. श्रीआनंद म्हणाले, खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्र या विषयांबाबत विद्यार्थ्यांमध्ये खूप आकर्षण असते. तथापि, केवळ तेवढ्याने भागत नाही, तर या विषयांमध्ये संशोधन करू इच्छिणाऱ्यांत प्रचंड संयम आणि तितकेच कुतूहलही असावे लागते. त्यासाठी संशोधकांनी सातत्याने स्वतःला प्रेरित करावे लागते. असा ध्येयाने भारलेला संशोधकच या क्षेत्रामध्ये काही तरी भरीव काम करू शकतो. ही गुणवैशिष्ट्ये विद्यार्थ्यांनी स्वतःमध्ये विकसित करावीत. अशा संशोधकांची 'आयुका'ला, देशाला मोठ्या प्रमाणात गरज आहे.

भूगुरुत्वाकर्षण तरंग लहरींच्या अनुषंगाने बोलताना ते म्हणाले, या लहरी खूपच क्षीण असतात. त्यामुळे त्यांचा शोध घेणे हे कठीणातील कठीण काम असते. त्या शोधण्यासाठी वापरलेली उपकरणे, त्यांची क्षमता आणि निवडलेली ठिकाणे यांनुसारही त्यांच्या मापनामध्ये फरक पडू शकतो. त्यामुळे संशोधन अधिक क्लिष्ट असते. या लहरींचे स्वरुप, अस्तित्वशोध आणि त्यांचे परिणाम यांच्याविषयी संशोधनाच्या अमाप संधी आहेत. संशोधकांना या क्षेत्रातही भरीव संशोधन करण्याच्या अमाप संधी आहेत. त्याचप्रमाणे खगोलभौतिकीच्या क्षेत्रामध्ये डाटा विश्लेषणाचे कामही खूप किचकट असते. त्यासाठी उच्च बौद्धिक क्षमता असणारे संशोधक आणि उपकरणेही आवश्यक असतात. अशा विविध उत्पादनांच्या अनुषंगाने उद्योगांशीही साहचर्य राखणे गरजेचे असते. त्यासाठीही हजारो संशोधकांची आवश्यकता असल्याचेही त्यांनी सांगितले.

प्र-कुलगुरू डॉ. पाटील म्हणाले, खगोलभौतिकशास्त्र हा खूप चित्ताकर्षक विषय असून गूढ आणि संशोधकांना सतत आव्हान देणारा, आकर्षित करणारा आहे. आकाशगंगा, कृष्णविवर, प्रकाशलहरी, विद्युतचुंबकीय लहरी यांसह अनेक क्षेत्रांत संशोधनास वाव आहे. विद्यार्थ्यांनी त्यात रस घ्यायला हवा.

कुलगुरू डॉ. शिर्के अध्यक्षीय मनोगतात म्हणाले, या राष्ट्रीय कार्यशाळेच्या निमित्ताने 'आयुका'शी शिवाजी विद्यापीठाच्या सहकार्यास सुरवात होणे हा उत्तम संकेत आहे. येथून पुढील काळात 'आयुका'समवेत रितसर सामंजस्य करार, शिक्षक व विद्यार्थी संयुक्त प्रशिक्षण उपक्रम, आयुकाचे ऑनलाईन अभ्यासक्रम शिवाजी विद्यापीठाच्या अभ्यासक्रमांशी संलग्नित करून विद्यार्थ्यांना ते करण्यास प्रोत्साहित करणे, 'आयुका'मध्ये विद्यार्थ्यांना ऑन-जॉब प्रशिक्षणास प्रेरित करणे, विविध विद्याशाखांमधील शिक्षकांचे गट करून 'आयुका'समवेत संयुक्त संशोधन प्रकल्प हाती घेणे आणि पन्हाळा येथील शिवाजी विद्यापीठाचे अवकाश संशोधन केंद्राचे आयुकाच्या सहकार्याने सक्षमीकरण करणे इत्यादी उपक्रम नजीकच्या काळात हाती घेण्याबाबत विद्यापीठ सकारात्मक आहे.

सुरवातीला डॉ. श्रीआनंद यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने राष्ट्रीय कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. भौतिकशास्त्र अधिविभागाचे प्रमुख डॉ. राजेंद्र सोनकवडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. एस.पी. दास यांनी परिचय करून दिला, तर डॉ. व्ही.एस. कुंभार यांनी आभार मानले. कार्यशाळेस ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सी.डी. लोखंडे यांच्यासह 'आयुका'चे डॉ. संदीप मित्रा, डॉ. आर. एस. व्हटकर, आर. एन. घोडपागे, श्री. जे. अहंगर, आयआयजी, कोल्हापूर तसेच भौतिकशास्त्र अधिविभागातील डॉ. के. वाय. राजपुरे, डॉ. ए. व्ही. मोहोळकर, डॉ. एन. एल. तरवाळ, डॉ. एम. व्ही. टाकळे, डॉ. एम. आर. वाईकर, डॉ. ए. आर. पाटील, डॉ. एस. एस. पाटील आदींसह देशभरातील विविध शैक्षणिक संस्था व विद्यापीठांतील शंभरहून अधिक संशोधक, विद्यार्थी उपस्थित होते.

शिवाजी विद्यापीठाचा पहिला ‘पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील पुरस्कार’ मारुतीराव जाधव यांना जाहीर

 

मारुतीराव जाधव (तळाशीकर गुरूजी)

 

कोल्हापूर दि. १३ सप्टेंबर: संत साहित्यामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या अभ्यासकांसाठी या वर्षीपासून शिवाजी विद्यापीठाने पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील पुरस्कार सुरू केला आहे. सन २०२४ साठीचा पहिला पुरस्कार तळाशी (ता. राधानगरी) येथील मारुतीराव जाधव (तशाळीकर गुरुजी) यांना आज जाहीर करण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप रोख रुपये एक लक्ष, सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल आणि श्रीफळ असे आहे. ही माहिती कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी दिली.

पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या कुटुंबियांनी शिवाजी विद्यापीठाला दिलेल्या देणगीतून सुरू करण्यात आलेला हा पुरस्कार दोन वर्षातून एकदा संत साहित्यामध्ये जीवनभर ध्यासपूर्वक काम करणाऱ्या ज्येष्ठ अभ्यासकाला देण्यात येणार आहे.

मारुतीराव जाधव हे राधानगरी तालुक्यातील तळाशीसारख्या दुर्गम आणि शेतकरी कुटुंबात राहून ध्यासपूर्वक संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि इतर संतांच्या साहित्याचा अभ्यास करीत आहेत.  शिवाजी विद्यापीठाच्या संत तुकाराम अध्यासनासाठी त्यांनी तुकारामबोवांच्या गाथेचे निरूपण’ (खंड एक आणि दोन) हा सुमारे १८०० पृष्ठांचा आणि कान्होबाची गाथा हा सुमारे ४०० पृष्ठांचा ग्रंथ सिद्ध केला आहे. त्यांनी निरूपण केलेली तुकारामबोवांची गाथा अल्पावधीत लोकप्रिय झाली असून त्याची दुसरी आवृत्तीही विद्यापीठाने नुकतीच प्रसिद्ध केली आहे.

तळाशी गावातील मंदिराचा जिर्णोद्धार करण्याबरोबरच लोकजागृतीसाठी श्री ज्ञानेश्वरी व अध्यात्मावर ज्ञान देणारी आनंदाश्रमसंस्‍थेची स्थापना त्यांनी केली आहे. १९५६ पासून पंढरपूरला जाणाऱ्या पायी दिंडीचे ते संयोजन करीत आहेत. गावोगावी प्रवचनाच्या माध्यमातून आध्यात्मिक प्रबोधनाचे काम ते अखंडितपणे करीत आहे. सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे.

या पुरस्कार निवड समितीमध्ये मा. कुलगुरू यांनी नियुक्त केलेले सदस्य डॉ. रमेश वरखेडे (नाशिक), डॉ. एकनाथ पगार (देवळा), प्रा. प्रवीण बांदेकर (सावंतवाडी) यांनी काम केले. सदस्य सचिव म्हणून शिवाजी विद्यापीठाच्या संत तुकाराम अध्यासनाचे समन्वयक आणि मराठी विभाग प्रमुख डॉ. नंदकुमार मोरे यांनी काम पाहिले. सदर पुरस्कार प्रदान समारंभ लवकरच सन्मानपूर्वक करण्यात येणार असल्याची माहितीही कुलगुरू डॉ. शिर्के यांनी दिली.

 

Wednesday 11 September 2024

परीघाबाहेरील वंचित विद्यार्थ्यांसाठी सागर बगाडे यांचे कार्य महत्त्वाचे: कुलगुरू डॉ. शिर्के

 

राष्ट्रपती पुरस्कार विजेते कलाशिक्षक सागर बगाडे यांचा शिवाजी विद्यापीठाच्या वतीने सत्कार करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. सोबत (डावीकडून) प्रभाकर हेरवाडे, डॉ. तानाजी चौगुले, प्राचार्य सूर्यकांत चव्हाण, डॉ. महादेव देशमुख, डॉ. वैभव ढेरे, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, डॉ. सुहासिनी पाटील, डॉ. अजितसिंह जाधव, डॉ. शिवाजी जाधव आणि डॉ. आलोक जत्राटकर.


कोल्हापूर, दि. ११ सप्टेंबर: सागर बगाडे यांनी परीघाबाहेरील वंचित विद्यार्थ्यांसाठी चाकोरीबाहेर जाऊन महत्त्वाचे शैक्षणिक, सांस्कृतिक कार्य केले. त्याची पोचपावती त्यांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्काराद्वारे मिळाली आहे, असे गौरवोद्गार शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी आज येथे काढले.

कोल्हापूर येथील कलाशिक्षक सागर बगाडे यांना नुकताच नवी दिल्ली येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आदर्श शिक्षक म्हणून राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यानिमित्त आज शिवाजी विद्यापीठ परिवाराच्या वतीने श्री. बगाडे यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील प्रमुख उपस्थित होते.

कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, कोल्हापूरच्या शिक्षकाला राष्ट्रीय पुरस्कार मिळून सोळा वर्षे लोटली. त्यानंतर हा पुरस्कार बगाडे यांना मिळाला. तथापि, देशात कलाशिक्षकाला हा पुरस्कार प्राप्त होण्याचा हा दुर्मिळ प्रसंग आहे, म्हणूनच तो महत्त्वाचा आहे. बगाडे यांनी कोल्हापूरच्या सामाजिक, सांस्कृतिक वर्तुळात वावरत असताना केवळ कलाशिक्षक म्हणून न वावरता जबाबदार नागरिकाची भूमिका निभावली. सातत्याने परीघाबाहेरील वंचित विद्यार्थ्यांचा विचार केला. ते एक जाणिवासमृद्ध शिक्षक तर आहेतच, शिवाय त्यांची सामाजिक बांधिलकी उच्च कोटीची आहे. करवीरनगरीचे कलानगरी हे नामाभिधान सार्थ ठरविताना त्यावर या पुरस्काराच्या रुपाने राजधानी दिल्लीची मोहोर उमटविण्यात बगाडे यशस्वी झाले आहेत. शिवाजी विद्यापीठाच्या विविध उपक्रमांशी ते जोडलेले आहेतच. यापुढील काळातही त्यांच्या शैक्षणिक, सांस्कृतिक उपक्रमांना विद्यापीठाचे सर्वोतोपरी सहकार्य राहील, अशी ग्वाही त्यांनी या प्रसंगी दिली.

सत्काराला उत्तर देताना सागर बगाडे म्हणाले, आयुष्यामध्ये कोणतेही काम पुरस्कारासाठी केले नाही. या पुरस्काराचा अर्जही माझ्या विद्यार्थ्यांनी भरला. आता हा पुरस्कार मिळाल्यामुळे जबाबदारीची जाणीव अधिक तीव्र झाली आहे. येथून पुढील काळातही निरपेक्ष भावनेने आणि स्वान्तसुखाय काम करीत राहायचे आहे. भावी काळात काही शैक्षणिक प्रकल्पांवर काम करणार आहे. त्याला शिवाजी विद्यापीठाचे पाठबळ लाभावे, तसेच विद्यापीठाने शालेय विद्यार्थ्यांसाठी संस्कृती संवर्धन निवासी शिबिरे घेण्याबाबत विचार करावा, असेही त्यांनी सुचविले.

यावेळी कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते श्री. बगाडे यांचा शाल, श्रीफळ, ग्रंथभेट आणि अभिनंदन पत्र देऊन सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे त्यांच्या पाठीशी उभे राहणारे न्यू एज्युकेशन सोसायटीचे प्रभाकर हेरवाडे आणि प्राचार्य सूर्यकांत चव्हाण यांचाही ग्रंथभेट देऊन गौरव करण्यात आला. यावेळी मानव्यशास्त्र विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. तानाजी चौगुले, मास कम्युनिकेशन विभागाचे प्रमुख डॉ. शिवाजी जाधव, उपकुलसचिव डॉ. वैभव ढेरे उपस्थित होते. जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर यांनी सूत्रसंचालन केले, तर कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी आभार मानले.


मास कम्युनिकेशनच्या विद्यार्थ्यांनी घेतली मुलाखत 

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेते सागर बगाडे यांची त्यांच्या वाटचालीविषयी आणि कार्याविषयी शिवाजी विद्यापीठाच्या एम.ए. मास कम्युनिकेशनच्या विद्यार्थ्यांनी विशेष मुलाखत घेतली आहे. ती सर्वांना https://youtu.be/GZY4aRwZh2o?si=yvX9kDAeKTU_YNRS या लिंकवर जाऊन पाहता येईल. 


शिवाजी विद्यापीठात १३पासून खगोलशास्त्रावरील राष्ट्रीय कार्यशाळा

गुरुत्वाकर्षण तरंगांवरील संशोधनाच्या नव्या दिशांविषयी होणार चर्चा 

प्रा. (डॉ.) आर. श्रीआनंद, संचालक, आयुका, पुणे


कोल्हापूर, दि. ११ सप्टेंबर: शिवाजी विद्यापीठात खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्रातील समकालीन समस्या-२०२४ या महत्त्वपूर्ण विषयावर येत्या १३ ते १५ सप्टेंबर या कालावधीत राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. विद्यापीठाचा भौतिकशास्त्र अधिविभाग, पुणे येथील आयुका (इंटर-युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या या परिषदेचे उद्घाटन १३ सप्टेंबरला सकाळी ११ वाजता आयुकाचे संचालक प्रा. (डॉ.) आर. श्रीआनंद यांच्या हस्ते आणि कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या अध्यक्षतेखाली होईल. प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील प्रमुख उपस्थित असतील, अशी माहिती अधिविभाग प्रमुख डॉ. राजेंद्र सोनकवडे यांनी दिली आहे.

डॉ. सोनकवडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकीच्या सतत विस्तारणाऱ्या संशोधनाच्या क्षेत्रामध्ये लेझर इंटरफेरोमीटर ग्रॅव्हिटेशनल-वेव्ह ऑब्झर्व्हेटरी (लिगो) हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील गुरुत्वाकर्षणाचे तरंग शोधण्यासाठी समर्पित असा प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे विश्वातील कृष्णविवरांच्या आणि न्युट्रॉन ताऱ्यांच्या टक्करांसारख्या महत्त्वाच्या घटनांचा अभ्यास करता येतो. या अनुषंगाने सदर राष्ट्रीय परिषदेत चर्चा होईल. परिषदेत गुरुत्वाकर्षण तरंगलहरींच्या अनुषंगाने आधुनिक तंत्रज्ञान आणि संशोधनाची माहिती दिली जाईल. राष्ट्रीय स्तरावरील विद्यार्थी, संशोधक आणि शिक्षकांसह आंतरराष्ट्रीय पातळीवरील तज्ज्ञही यात सहभागी होणार आहेत.

१४ सप्टेंबर हा दिवस गुरुत्वाकर्षण लहरींच्या संशोधनातील महत्त्वाचा टप्पा असल्याने लिगो दिन म्हणून साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर सदर परिषद होत असून तिचे प्रमुख उद्दिष्ट हे विद्यार्थी, संशोधक आणि तरुण-शास्त्रज्ञांना खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्रातील अत्याधुनिक विषयांमध्ये सखोल अभ्यासासाठी व्यासपीठ प्रदान करणे हे आहे. परिषदेत गुरुत्वाकर्षण लहरी, लिगो-इंडियाच्या सहयोगाशिवाय इस्रोच्या आदित्य-L1 मोहिमेवरील सोलर अल्ट्राव्हायोलेट इमेजिंग टेलिस्कोप (SUIT), एस्ट्रोसॅट आणि संक्षिप्त ताऱ्यांचे भौतिकशास्त्र आदी विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शन करतील.

परिषदेत बिट्स पिलानी, हैदराबाद, सरदार वल्लभभाई नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सुरत, भूपेंद्र नारायण मंडळ विद्यापीठ, मधेपुरा, बिहार, बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, रांची, झारखंड, बर्दवान विद्यापीठ, पश्चिम बंगाल, गुजरात विद्यापीठ, तिरुवरूर विद्यापीठ, तमिळनाडू यासह देशभरातील विविध  नामांकित शैक्षणिक संस्थांमधील शंभरहून अधिक संशोधक सहभागी होणार आहेत. या कार्यशाळेचा सर्व संशोधकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. सोनकवडे यांनी केले आहे.

काय आहे लिगो’?

लेझर इंटरफेरोमीटर ग्रॅव्हिटेशनल-वेव्ह ऑब्झर्व्हेटरी (लिगो) हा प्रकल्प अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ किप थॉर्न आणि रेनर वेइस यांनी प्रथम प्रस्तावित केला. एकविसाव्या शतकातील हा सर्वात महत्त्वाचा वैज्ञानिक प्रकल्प असून  लिगोने  गुरुत्वाकर्षण लहरींना शोधून खगोल भौतिकशास्त्रात क्रांती घडवून आणली. या लहरींचे भाकीत प्रख्यात वैज्ञानिक अल्बर्ट आइनस्टाईन यांनी सन १९१५ मध्येच प्रथम केले होते. १४ सप्टेंबर २०१५ रोजी लिगोने १.३ अब्ज प्रकाश-वर्षे दूर असलेल्या कृष्णविवराच्या विलीनीकरणातून गुरुत्वीय लहरी शोधून काढल्या आणि आइन्स्टाईनचे भाकित खरे असल्याचे सिद्ध केले. हा विज्ञानाच्या क्षेत्रातील एक महत्त्वाचा इतिहास ठरला.


Thursday 5 September 2024

शिवाजी विद्यापीठामध्ये चक्रधर स्वामी जयंती उत्साहात

 


कोल्हापूर, दि.05 सप्टेंबर - भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांची जयंती शिवाजी विद्यापीठात आज उत्साहात साजरी करण्यात आली.


विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के यांच्या हस्ते भगवान सर्वज्ञ श्री. चक्रधर स्वामी यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.यावेळी वित्त लेखाधिकारी डॉ.सुहासिनी पाटील, आजीवन अध्ययन विस्तार विभागाचे संचालक डॉ.रामचंद्र पवार, सूक्ष्मजीवशास्त्र अधिविभागप्रमुख डॉ.पी.एम.गुरव, डॉ.एन.एच.नदाफ, पदार्थविज्ञान विभागप्रमुख डॉ.राजेंद्र सोनकवडे, डॉ.के.वाय.राजपुरे, डॉ.आर.एस.व्हटकर, डॉ.एन.व्ही.मोहळकर, एन.एम.नाईक, एच.बी.कांबळे यांच्यासह शिक्षक, प्रशासकीय सेवक आणि विद्यार्थी-विद्यार्थीनी उपस्थित होते.

-----

Wednesday 4 September 2024

‘डॉ. आर.व्ही. भोसले स्मृती पारितोषिका’साठी

शिवाजी विद्यापीठास दीड लाख रुपयांची देणगी

 

डॉ. आर.व्ही. भोसले स्मृती पारितोषिकासाठी दीड लाख रुपयांचा निधी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्याकडे सुपूर्द करताना श्रीमती विजया भोसले. सोबत (डावीकडून) पंजाबराव भोसले, डॉ. विजय मारुलकर, शिवप्रकाश भोसले, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील व प्राचार्य शशिकांत शिंदे.


कोल्हापूर, दि. ४ सप्टेंबर: जागतिक कीर्तीचे खगोलशास्त्रज्ञ डॉ. राजाराम विष्णू तथा आर. व्ही. भोसले यांच्या स्मृतीप्रित्यर्थ शैक्षणिक पारितोषिक देण्यासाठी त्यांच्या पत्नी श्रीमती विजया भोसले यांनी शिवाजी विद्यापीठास काल दीड लाख रुपयांची देणगी दिली. कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्याकडे त्यांनी धनादेश सुपूर्द केला.

शिवाजी विद्यापीठाच्या खगोलशास्त्र विभागाचे माजी प्रमुख असलेल्या डॉ. भोसले यांचे सन २०२०मध्ये वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचे खगोलशास्त्रातील संशोधन जागतिक पातळीवर मान्यताप्राप्त होते. भारताचा पहिला रेडिओस्कोप तयार करण्याची कामगिरी त्यांच्या नावावर आहे. शिवाजी विद्यापीठाचे पन्हाळा येथे अवकाश संशोधन केंद्र व्हावे, यासाठी डॉ. भोसले यांचा पाठपुरावा महत्त्वाचा ठरला. डॉ. भोसले यांच्या स्मृती शिवाजी विद्यापीठाच्या माध्यमातून चिरंतन राहाव्यात, यासाठी त्यांच्या पत्नी श्रीमती विजया भोसले यांनी पदार्थविज्ञान विभागातील एम.एस्सी. भाग-२ खगोलविज्ञान या विषयात प्रथम आणि द्वितिय येणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनीस डॉ. राजाराम वि. भोसले स्मृती पारितोषिक देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी दीड लाख रुपयांची देणगी त्यांनी आज कुलगुरू डॉ. शिर्के यांच्याकडे सुपूर्द केली. या प्रसंगी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्यासह प्राचार्य शशिकांत शिंदे, पंजाबराव भोसले, डॉ. विजय मारुलकर आणि शिवप्रकाश भोसले उपस्थित होते.