कोल्हापूर,
दि. १८ सप्टेंबर: शिवाजी विद्यापीठाकडून या वर्षीपासून संत साहित्यामध्ये उल्लेखनीय
काम करणाऱ्या ग्रंथकाराला किंवा ग्रंथासाठी ‘सद्गुरू
डॉ.गुरुनाथ मुंगळे अध्यात्मिक तत्त्वज्ञान साहित्य पुरस्कार’
सुरू केला आहे. सोलापूर येथील डॉ. गौरी कहाते यांच्याकडून त्यांचे वडील स्व. सद्गुरू
डॉ.गुरुनाथ मुंगळे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ विद्यापीठास दिलेल्या देणगीमधून हा
पुरस्कार सुरू करण्यात आला असून पहिला पुरस्कार प्रा. समीर
चव्हाण (आय.आय.टी,
कानपूर, उत्तरप्रदेश)
यांना जाहीर करण्यात आला. या पुरस्काराचे स्वरूप रोख रु.
५१,०००/- सन्मानचिन्ह, मानपत्र,
शाल आणि श्रीफळ असे आहे. ही माहिती कुलगुरू प्रा. दिगंबर शिर्के यांनी दिली.
प्रा. समीर चव्हाण कानपूर आय.आय.टी. येथे गणित विषयाचे प्राध्यापक म्हणून काम करत
आहेत. चव्हाण यांनी अखईं ते जाले (तुकारामः हिंदुस्तानी परिवेशात) हा द्विखंडात्मक
ग्रंथ लिहिला आहे. तुकोबांच्या कवितेचा भारतीय
परिप्रेक्ष्यात नव्या पद्धतीने घेतलेला शोध म्हणजे हा ग्रंथ आहे. यातून तुकारामांकडे आणि त्यांच्या अभंगाकडे पाहण्याची नवी दृष्टी देतो. तुकारामांच्या
लेखनामागे असणाऱ्या भारतीय पातळीवरील दार्शनिक प्रेरणांचा शोध आणि भारतीय परिप्रेक्ष्यात
तुकारामांच्या गाथेचे स्थान या ग्रंथात चर्चिले गेल्याने या ग्रंथाचे महत्त्व अधिक
आहे. याबरोबरच त्यांच्या नावावर हौस, काळाची सामंती निगरण,
रात्रीची प्रतिबिंबे इत्यादी कवितासंग्रह तर समकालीन गझलः एक
व्यासपीठ, समकालीन गझलः एक अवलोकन हे समीक्षाग्रंथही
प्रसिद्ध आहेत. ‘समकालीन गझल’ या मराठी नियतकालिकाचे संपादक म्हणूनही ते काम
पाहतात.
या पुरस्कार निवड समितीचे
सचिव म्हणून संत तुकाराम अध्यासनाचे समन्वयक डॉ. नंदकुमार
मोरे यांनी काम पाहिले, तर सदस्य म्हणून डॉ. एकनाथ पगार (देवळा), डॉ. रमेश वरखेडे
(नाशिक), प्रा. प्रविण बांदेकर
(सावंतवाडी) यांनी काम पाहिले. या पुरस्काराचे वितरण लवकरच केले जाईल, असे कुलगुरू डॉ. शिर्के यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment