गुरुत्वाकर्षण तरंगांवरील संशोधनाच्या नव्या दिशांविषयी होणार चर्चा
प्रा. (डॉ.) आर. श्रीआनंद, संचालक, आयुका, पुणे |
कोल्हापूर, दि. ११ सप्टेंबर: शिवाजी विद्यापीठात ‘खगोलशास्त्र आणि
खगोल भौतिकशास्त्रातील समकालीन समस्या-२०२४’ या महत्त्वपूर्ण
विषयावर येत्या १३ ते १५ सप्टेंबर या कालावधीत राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली
आहे. विद्यापीठाचा भौतिकशास्त्र अधिविभाग, पुणे येथील आयुका (इंटर-युनिव्हर्सिटी
सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी
अँड ॲस्ट्रोफिजिक्स) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या
या परिषदेचे उद्घाटन १३ सप्टेंबरला सकाळी ११ वाजता आयुकाचे संचालक प्रा. (डॉ.) आर. श्रीआनंद यांच्या हस्ते
आणि कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या अध्यक्षतेखाली होईल. प्र-कुलगुरू डॉ.
प्रमोद पाटील प्रमुख उपस्थित असतील, अशी माहिती अधिविभाग प्रमुख डॉ. राजेंद्र
सोनकवडे यांनी दिली आहे.
डॉ. सोनकवडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, खगोलशास्त्र आणि
खगोलभौतिकीच्या सतत विस्तारणाऱ्या संशोधनाच्या क्षेत्रामध्ये लेझर इंटरफेरोमीटर
ग्रॅव्हिटेशनल-वेव्ह ऑब्झर्व्हेटरी (लिगो) हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील गुरुत्वाकर्षणाचे तरंग
शोधण्यासाठी समर्पित असा प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे विश्वातील कृष्णविवरांच्या
आणि न्युट्रॉन ताऱ्यांच्या टक्करांसारख्या महत्त्वाच्या घटनांचा अभ्यास करता येतो.
या अनुषंगाने सदर राष्ट्रीय परिषदेत चर्चा होईल. परिषदेत गुरुत्वाकर्षण तरंगलहरींच्या
अनुषंगाने आधुनिक तंत्रज्ञान आणि संशोधनाची माहिती दिली जाईल. राष्ट्रीय स्तरावरील
विद्यार्थी, संशोधक आणि शिक्षकांसह आंतरराष्ट्रीय पातळीवरील
तज्ज्ञही यात सहभागी होणार आहेत.
१४ सप्टेंबर हा दिवस गुरुत्वाकर्षण लहरींच्या संशोधनातील महत्त्वाचा टप्पा
असल्याने ‘लिगो दिन’ म्हणून साजरा
केला जातो. या पार्श्वभूमीवर
सदर परिषद होत असून तिचे प्रमुख उद्दिष्ट हे विद्यार्थी, संशोधक आणि
तरुण-शास्त्रज्ञांना खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्रातील अत्याधुनिक
विषयांमध्ये सखोल अभ्यासासाठी व्यासपीठ प्रदान करणे हे आहे. परिषदेत गुरुत्वाकर्षण
लहरी, लिगो-इंडियाच्या सहयोगाशिवाय
इस्रोच्या आदित्य-L1 मोहिमेवरील सोलर अल्ट्राव्हायोलेट
इमेजिंग टेलिस्कोप (SUIT), एस्ट्रोसॅट आणि संक्षिप्त
ताऱ्यांचे भौतिकशास्त्र आदी विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शन करतील.
परिषदेत बिट्स पिलानी, हैदराबाद, सरदार वल्लभभाई नॅशनल
इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सुरत, भूपेंद्र
नारायण मंडळ विद्यापीठ, मधेपुरा, बिहार,
बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, रांची,
झारखंड, बर्दवान विद्यापीठ, पश्चिम बंगाल, गुजरात विद्यापीठ, तिरुवरूर विद्यापीठ, तमिळनाडू यासह देशभरातील विविध नामांकित शैक्षणिक संस्थांमधील शंभरहून अधिक संशोधक
सहभागी होणार आहेत. या कार्यशाळेचा सर्व संशोधकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. सोनकवडे यांनी केले आहे.
काय आहे ‘लिगो’?
लेझर इंटरफेरोमीटर ग्रॅव्हिटेशनल-वेव्ह ऑब्झर्व्हेटरी (लिगो) हा प्रकल्प अमेरिकन
भौतिकशास्त्रज्ञ किप थॉर्न आणि रेनर वेइस यांनी प्रथम प्रस्तावित केला. एकविसाव्या
शतकातील हा सर्वात महत्त्वाचा वैज्ञानिक प्रकल्प असून लिगोने
गुरुत्वाकर्षण लहरींना शोधून खगोल भौतिकशास्त्रात क्रांती घडवून आणली. या
लहरींचे भाकीत प्रख्यात वैज्ञानिक अल्बर्ट आइनस्टाईन यांनी सन १९१५ मध्येच प्रथम
केले होते. १४ सप्टेंबर २०१५ रोजी लिगोने १.३ अब्ज प्रकाश-वर्षे दूर असलेल्या
कृष्णविवराच्या विलीनीकरणातून गुरुत्वीय लहरी शोधून काढल्या आणि आइन्स्टाईनचे
भाकित खरे असल्याचे सिद्ध केले. हा विज्ञानाच्या क्षेत्रातील एक महत्त्वाचा इतिहास
ठरला.
No comments:
Post a Comment