Friday 27 September 2024

एक वनस्पती... फुलपाखरांच्या ४२ प्रजातींची लाडकी!

 शिवाजी विद्यापीठ परिसरातील महत्त्वाचे संशोधन आंतरराष्ट्रीय शोधपत्रिकेत प्रसिद्ध





दगडी पाला वनस्पतीवर आढळलेल्या फुलपाखरांच्या काही निवडक प्रजातींची छायाचित्रे

आरती पाटील (संशोधक)

डॉ. एस.एम. गायकवाड (संशोधक मार्गदर्शक)


                                            
                                        (डॉ. सुनील गायकवाड आणि संशोधक आरती पाटील यांचे मनोगत)

कोल्हापूर, दि. २७ सप्टेंबर: दगडी पाला, कंबरमोडी, एकदांडी किंवा बंदुकीचे फूल अशा अनेक नावांनी ओळखल्या जाणाऱ्या आणि रस्त्त्याच्या कडेने, रानावनात कोठेही सहज आढळणाऱ्या वनस्पतीचे निसर्गामधील प्रयोजन शिवाजी विद्यापीठाच्या प्राणिशास्त्र अधिविभागातील संशोधकांनी सिद्ध केले आहे. ट्रायडॅक्स प्रोकम्बन्स (Tridax procumbens) अर्थात दगडी पाला या तशा दुर्लक्षित वनस्पतीच्या फुलांवर मकरंद खाण्यासाठी आलेल्या ४२ प्रजातीच्या फुलपाखरांची नोंद डॉ. सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आरती पाटील या संशोधक विद्यार्थिनीने केली आहे. विशेष म्हणजे या सर्व नोंदी शिवाजी विद्यापीठाच्या परिसरामध्येच केलेल्या आहेत. त्यांचा हा शोधनिबंध जर्नल ऑफ थ्रेटन्ड टॅक्सा या आंतरराष्ट्रीय संशोधन पत्रिकेमध्ये काल (दि. २६) प्रकाशित झाला आहे.

डॉ. गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आरती पाटील यांनी दगडी पाला या प्रजातीवर मकरंद टिपण्यासाठी वर्षभरात येणाऱ्या फुलपाखरांच्या प्रजातींची अत्यंत शिस्तबद्ध निरीक्षणे करून नोंदी घेतल्या. फुलपाखरांची कोणती प्रजाती, कोणत्या कालावधीत, कोणत्या वेळी या फुलावर येते, त्यावेळचे हवामान, तापमान, आर्द्रता यांच्याही नोंदी घेतल्या. या संशोधनानुसार तृणकणी या भारतातल्या सर्वात लहान फुलपाखरासह ग्रास ज्वेल, कॉमन शॉट सिल्व्हरलाईन (रूपरेखा), पिकॉक पॅन्सी (मयूर भिरभिरी), पेंटेड लेडी (ऊर्वशी), ग्रेट एग फ्लाय, (मोठा चांदवा), पायोनिअर व्हाईट (गौरांग), कॉमन गुल (कवडशा), कॉमन क्रो (हबशी), कॉमन लेपर्ड (चित्ता) या आणि इतर अशा एकूण ४२ फुलपाखरांच्या प्रजातींची नोंद या संशोधनाअंतर्गत करण्यात आली आहे. निसर्गामध्ये उपलब्ध असलेल्या प्रत्येक लक्षित-दुर्लक्षित प्रजातीचे तिचे स्वतःचे असे एक अस्तित्व आणि प्रयोजन असते. या विधानाची प्रचिती देणारे हे संशोधन आहे. हे संशोधन अ स्टडी ऑन दि असोसिएशन बिटविन ट्रायडॅक्स डेझी ट्रायडॅक्स प्रोकम्बन्स एल. अँन्ड बटरफ्लाईज अॅट शिवाजी युनिव्हर्सिटी कॅम्पस (महाराष्ट्र, इंडिया) या शीर्षकाखाली सदर संशोधन पत्रिकेमध्ये प्रकाशित झाले आहे.

या संदर्भात बोलताना डॉ. सुनील गायकवाड म्हणाले की, या संशोधनामुळे दगडी पाला आणि तत्सम दुर्लक्षित वनस्पतींचे फुलपाखरांच्या तसेच जैवविविधता संवर्धनातील महत्व अधोरेखित झाले आहे. यापूर्वी दगडी पाला आणि फुलपाखरू यांच्या परपस्परसंबंधांबाबत प्रकाशित झालेल्या शोधनिबंधांत नोंद केलेल्या फुलपाखरांच्या प्रजातींपेक्षाही अधिक प्रजाती सदरच्या अभ्यासांतर्गत नोंदवल्या गेल्या आहेत. या सर्व नोंदी शिवाजी विद्यापीठाच्या परिसरात घेण्यात आल्या आहेत. त्यामुळे विद्यापीठ परिसराचेही जैवविविधता संवर्धनातील महत्त्व ठळकपणे सामोरे आले आहे.

जर्नल ऑफ थ्रेटन्ड टॅक्सायाविषयी...

जर्नल ऑफ थ्रेटन्ड टॅक्सा  (JoTT) हे आंतरराष्ट्रीय नियतकालिक जैवविविधता संवर्धन आणि प्राण्यांचे वर्गीकरण यावरील शोधनिबंध प्रसिद्ध करते. दुर्मिळ व अस्तित्व धोक्यात आलेल्या प्रजातींच्या अनुषंगाने असलेले संशोधन यात प्राधान्याने प्रकाशित केले जाते. या नियतकालिकाचा समावेश स्कोपस, वेब ऑफ सायन्स, यूजीसी केअर लिस्ट अशा नामांकित इंडेक्सिंग एजन्सीमध्ये आहे. त्याचे नॅस रेटिंग ५.५६ इतके असून एच इंडेक्स १५ आहे.





आंतरराष्ट्रीय शोधपत्रिकेत प्रसिद्ध झालेली ४२ फुलपाखरांच्या प्रजातीची छायाचित्रे









No comments:

Post a Comment