शिवाजी विद्यापीठात प्रभाकरपंत कोरगांवकर व्याख्यानमालेत बोलताना श्री. विवेक सावंत. शेजारी मानव्यशास्त्र विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख. |
कोल्हापूर, दि. २५ सप्टेंबर : ग्रामीण भागामध्ये कृषी क्षेत्राबरोबरच सेवा क्षेत्राचा
विस्तार घडवून आणणे आवश्यक आहे.याचा उपयोग संपूर्ण जगाला सेवा देण्याच्या
कामामध्ये होवू शकतो, असे प्रतिपादन महाराष्ट्र नॉलेज
कार्पोरेशन लिमिटेड, पुणे येथील मुख्य सल्लागार विवेक सावंत
यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रूरल डेव्हलपमेंट
अधिविभागामार्फत प्रभाकरपंत कोरगांवकर व्याख्यानमालेअंतर्गत 'डिजिटल मेगाट्रेंडस्-ग्रामीण
भारताच्या नवीन आशा' या विषयावर मानव्यशास्त्र सभागृहामध्ये
आयोजित व्याख्यानामध्ये प्रमुख वक्ते म्हणून श्री.सावंत बोलत होते. याप्रसंगी,
मानव्यशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ.महादेव देशमुख
अध्यक्षस्थानी उपस्थित होते.
श्री.सावंत पुढे म्हणाले, ग्रामीण भागाचा खरा विकास करावयाचा असेल तर ग्रामीण
भागातील लोकांना इंटरनेटच्या माध्यमातून डिजीटल साक्षर करून ग्रामीण विकासाचा पाया
रचला जावू शकतो.ग्रामीण भागामध्ये नवीन भाषा निर्माण करण्यासाठी नव्या
मानसिकतेच्या फौजेची गरज आहे. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये 'टेलिग्राम'
या माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना
स्वातंत्र्य चळवळीमध्ये संघटीत करण्याचे कार्य महात्मा गांधीजी करीत होते. संगणकीकरणामुळे
असंख्य गोष्टींचे डिजीटलायझेशन करणे शक्य झालेले आहे. ज्या ठिकाणी माहितीवर
प्रक्रीया होवून नवीन माहिती निर्माण होते त्याला डिजीटलायझेशन म्हणतात. जेथे शक्य
आहे तेथे ऑटोमेशन होणे गरजेचे आहे, असे सध्या जगाला वाटत
आहे. त्यामुळे सध्या तुम्ही या
प्रवाहामध्ये आहात. विविध अशा मेगा ट्रेंड्समुळे
अनेक गोष्टी सुलभ होत आहेत.एखाद्या रस्त्यावरून जात असताना त्या ठिकाणची दुकाने,
त्यामधील वस्तु हे सर्व तुमच्या मोबाईलमध्ये तात्काळ दिसणे शक्य
होणार आहे. व्हिज्युअलायझेशनमध्ये तुम्ही त्या ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थित नसतानाही
उपस्थित राहून कार्यरत असल्याप्रमाणे भासणार आहे. व्हिज्युअल रिॲलिटी वास्तविक
वास्तवापेक्षा जास्त वास्तविक असते. आताच्या मुलांना व्हिज्युअल रिॲलिटीचे मोठे
आकर्षण आहे. यामध्ये प्रत्यक्ष
वास्तवापेक्षा प्रत्यकारी वास्तव तुमच्यापुढे निर्माण होतो. शासकीय कार्यालये,
मॉल्स्, डाक घरे, ग्रंथालये,
बाजार, थिएटर, बॅंका,
वर्तमानपत्रे, म्युझिक प्लेअर, वॉलेट, कॅलेंडर, घड्याळ,
टेलिव्हीजन, खेळ, नकाशे,
कॅमेरा, पेन, वही हे
सगळे मोबीलायझेशनमध्ये समाविष्ट आहेत. डी-इंटरमेडीएशन, थ्रीडी
प्रिंटींग, मास पर्सनलायझेशन, सेल्फ
ऑर्गनाझेशन, डिमटेरियलायझेशन, नॉलेज ऑफ
प्रोडक्टस्, ॲफीकेशन, कॉनफिकेशन,
डाटा इकॉलॉजी, क्लाऊड इकॉलॉजी, सेन्सर इकॉलॉजी, सर्व्हीलन्स् इकॉलॉजी, ग्लास इकॉलॉजी, डीटीजल आर्टीफॅक्ट इकॉलॉजी या मेगा
ट्रेंडसबद्दल प्रेझेंटेशनद्वारे श्री. सावंत यांनी माहितीसह स्पष्टीकरण केले.
श्री. सावंत पुढे म्हणाले, डिजीटल पब्लीक इन्फ्रास्ट्रक्चरामध्ये आपल्या देशाने
केलेले कार्य अनेक देशांना करणे शक्य झालेले नाही. या माध्यमातून ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था
बदलण्यासाठी खूप मोठे योगदान देणे शक्य होणार आहे. तसेच, ग्रामीण
क्षेत्राच्या विकासाबरोबरच तेथील माणसे त्याच ठिकाणी राहून रोजगार निर्मिती करू
शकणार आहेत. यासाठी संसाधने समृध्द करणे गरजेचे आहे. सेवा क्षेत्राचा विस्तार करून
प्रगती करणे शक्य आहे. यासाठी आजच्या तरूण पिढीने पुढाकार घेणे अत्यंत आवश्यक आहे.
देशाच्या ग्रामीण भागामध्ये अतिशय बुध्दीमान मुले आहेत.त्यांना छोटया छोटया
गोष्टींच्या माध्यमातून मदत करणे गरजे आहे.त्यांना ज्ञानाधारीत जीवनशैली
देण्यामध्ये यशस्वी होणे आवश्यक आहे. जीवनामध्ये स्थिरता येण्यासाठी आजचा युवक
मेगाट्रेंड आत्मसात करणे आवश्यक आहे. युपीआयच्या वापरामधून भारत देशाने फार मोठी क्रांती
केलेली आहे. आजही, अनेक देशांना क्युआर कोडचा वापर करणे शक्य
झालेले नाही. ग्रामीण भागातील लोकांनी स्थानिक गरजा समजावून घेवून
पर्यावरणशास्त्राच्या माध्यमातून सोडविण्यासाठी नव्याने अभ्यास करण्याची गरज निर्माण
झालेली आहे. जेएएम-युपीआय-युएलआय या त्रिसूत्रीचा योग्य उपयोग करून घेतला तर देशात
आमुलाग्र बदल होवू शकतो. यामुळे मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागामध्ये रोजगार
निर्मिती होवून जीडीपीचा रेशो वाढत जाईल. ग्रामीण भागामध्ये राहून सारे विश्व हेच
आपले गांव म्हणून रोजगार निर्मिती करणे शक्य आहे. या सर्व मेगाट्रेंडचा योग्य वापर
करून समाज सशक्त बनविण्यासाठी शोध घेणे आवश्यक आहे.
मानव्यशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ.महादेव देशमुख अध्यक्षस्थानावरून
बोलताना म्हणाले, डिजीटलायझेशनच्या माध्यमातून ज्ञानाचा उपयोग करून विकसित भारत कसा निर्माण
करता येईल हे पाहिले पाहिजे. आता, ग्रामीण भागातील
अर्थव्यवस्था, त्यांचे दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी
डिजीटलायझेशनचा वापर करण्याची संधी उपलब्ध झालेली आहे. यासाठी तरूण वर्गाने
पुढाकार घेणे आवश्यक आहे.
यावेळी यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रूरल डेव्हलपमेंटचे प्रमुख डॉ.नितीन
माळी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. ऊर्मिला
दशवंत यांनी केले. डॉ.कविता वड्राळे यांनी आभार मानले. कार्यक्रमास आंतरभारती
शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष पल्लवीताई कोरगांवकर, आशिष कोरगांवकर यांच्यासह मराठी अधिविभागप्रमुख
डॉ.रणधीर शिंदे यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment