कोल्हापूर, दि. ११ सप्टेंबर: सागर बगाडे यांनी परीघाबाहेरील वंचित विद्यार्थ्यांसाठी चाकोरीबाहेर जाऊन महत्त्वाचे
शैक्षणिक, सांस्कृतिक कार्य केले. त्याची पोचपावती त्यांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक
पुरस्काराद्वारे मिळाली आहे, असे गौरवोद्गार शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.
दिगंबर शिर्के यांनी आज येथे काढले.
कोल्हापूर येथील
कलाशिक्षक सागर बगाडे यांना नुकताच नवी दिल्ली येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
यांच्या हस्ते आदर्श शिक्षक म्हणून राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
त्यानिमित्त आज शिवाजी विद्यापीठ परिवाराच्या वतीने श्री. बगाडे यांचा सत्कार
करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील प्रमुख उपस्थित
होते.
कुलगुरू डॉ. शिर्के
म्हणाले, कोल्हापूरच्या शिक्षकाला राष्ट्रीय पुरस्कार मिळून सोळा वर्षे लोटली.
त्यानंतर हा पुरस्कार बगाडे यांना मिळाला. तथापि, देशात कलाशिक्षकाला हा पुरस्कार
प्राप्त होण्याचा हा दुर्मिळ प्रसंग आहे, म्हणूनच तो महत्त्वाचा आहे. बगाडे यांनी
कोल्हापूरच्या सामाजिक, सांस्कृतिक वर्तुळात वावरत असताना केवळ कलाशिक्षक म्हणून न
वावरता जबाबदार नागरिकाची भूमिका निभावली. सातत्याने परीघाबाहेरील वंचित विद्यार्थ्यांचा
विचार केला. ते एक जाणिवासमृद्ध शिक्षक तर आहेतच, शिवाय त्यांची सामाजिक बांधिलकी
उच्च कोटीची आहे. करवीरनगरीचे कलानगरी हे नामाभिधान सार्थ ठरविताना त्यावर या
पुरस्काराच्या रुपाने राजधानी दिल्लीची मोहोर उमटविण्यात बगाडे यशस्वी झाले आहेत. शिवाजी
विद्यापीठाच्या विविध उपक्रमांशी ते जोडलेले आहेतच. यापुढील काळातही त्यांच्या
शैक्षणिक, सांस्कृतिक उपक्रमांना विद्यापीठाचे सर्वोतोपरी सहकार्य राहील, अशी
ग्वाही त्यांनी या प्रसंगी दिली.
सत्काराला उत्तर देताना
सागर बगाडे म्हणाले, आयुष्यामध्ये कोणतेही काम पुरस्कारासाठी केले नाही. या
पुरस्काराचा अर्जही माझ्या विद्यार्थ्यांनी भरला. आता हा पुरस्कार मिळाल्यामुळे
जबाबदारीची जाणीव अधिक तीव्र झाली आहे. येथून पुढील काळातही निरपेक्ष भावनेने आणि
स्वान्तसुखाय काम करीत राहायचे आहे. भावी काळात काही शैक्षणिक प्रकल्पांवर काम
करणार आहे. त्याला शिवाजी विद्यापीठाचे पाठबळ लाभावे, तसेच विद्यापीठाने शालेय
विद्यार्थ्यांसाठी संस्कृती संवर्धन निवासी शिबिरे घेण्याबाबत विचार करावा, असेही
त्यांनी सुचविले.
यावेळी कुलगुरू डॉ.
शिर्के यांच्या हस्ते श्री. बगाडे यांचा शाल, श्रीफळ, ग्रंथभेट आणि अभिनंदन पत्र
देऊन सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे त्यांच्या पाठीशी उभे राहणारे न्यू
एज्युकेशन सोसायटीचे प्रभाकर हेरवाडे आणि प्राचार्य सूर्यकांत चव्हाण यांचाही
ग्रंथभेट देऊन गौरव करण्यात आला. यावेळी मानव्यशास्त्र विद्याशाखा अधिष्ठाता डॉ.
महादेव देशमुख, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, वित्त व
लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. तानाजी चौगुले,
मास कम्युनिकेशन विभागाचे प्रमुख डॉ. शिवाजी जाधव, उपकुलसचिव डॉ. वैभव ढेरे
उपस्थित होते. जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर यांनी सूत्रसंचालन केले, तर
कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी आभार मानले.
मास कम्युनिकेशनच्या विद्यार्थ्यांनी घेतली मुलाखत
राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेते सागर बगाडे यांची त्यांच्या वाटचालीविषयी आणि कार्याविषयी शिवाजी विद्यापीठाच्या एम.ए. मास कम्युनिकेशनच्या विद्यार्थ्यांनी विशेष मुलाखत घेतली आहे. ती सर्वांना https://youtu.be/GZY4aRwZh2o?si=yvX9kDAeKTU_YNRS या लिंकवर जाऊन पाहता येईल.
No comments:
Post a Comment