Friday, 20 September 2024

महिलांना सुरक्षित पर्यावरण प्रदान करण्याची जबाबदारी सर्वांचीच: संजय शिंदे

शिवाजी विद्यापीठात एकदिवसीय विभागस्तरीय कार्यशाळा

महाराष्ट्र शासन आणि शिवाजी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने 'महिला सुरक्षितता व शिष्यवृत्ती' या विषयावरील विभागस्तरीय कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभात बोलताना कोल्हापूरचे अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे. मंचावर (डावीकडून) डॉ. विलास शिंदे, डॉ. अशोक उबाळे, कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, डॉ. तानाजी चौगुले आणि ए.पी.आय. स्वाती यादव.


महाराष्ट्र शासन आणि शिवाजी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने 'महिला सुरक्षितता व शिष्यवृत्ती' या विषयावरील विभागस्तरीय कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. मंचावर (डावीकडून) डॉ. विलास शिंदे, डॉ. अशोक उबाळे, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, डॉ. तानाजी चौगुले आणि ए.पी.आय. स्वाती यादव.


कार्यशाळेस उपस्थित विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, संस्थाचालक व प्रतिनिधी.




(कार्यशाळेची लघु-ध्वनीचित्रफीत)

कोल्हापूर, दि. २० सप्टेंबर: महिलांना सुरक्षित सामाजिक पर्यावरण उपलब्ध करून देणे ही सर्वच समाजघटकांची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन कोल्हापूरचे अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी आज येथे केले.

महाराष्ट्र शासनाचा उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि शिवाजी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने महिला सुरक्षितता व शिष्यवृत्ती या विषयावर आज एकदिवसीय विभागस्तरीय कार्यशाळेचे आयोजन विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सिनेट सभागृहात करण्यात आले. कार्यशाळेचे प्रमुख पाहुणे म्हणून श्री. शिंदे बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते, तर प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील आणि विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. अशोक उबाळे, कुलसचिव डॉ. विलास शिंदे प्रमुख उपस्थित होते.

संजय शिंदे म्हणाले, आजची कार्यशाळा ही शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत महिला आणि विद्यार्थिनी यांच्या अनुषंगाने आयोजित केली असली तरी त्यापलिकडेही समाजातील सर्वच स्त्रियांप्रती आपला दृष्टीकोन हा संवेदनशील असला पाहिजे, या जाणीवनिर्मितीची त्यामागे अपेक्षा आहे. महिला सुरक्षा धोरणाच्या अंमलबजावणीच्या बाबतीत शासन आणि पोलीस प्रशासन गंभीर आहे. तथापि, बदनामीला घाबरून सुमारे ८० टक्के तक्रारी दाखल होत नाहीत. समाज एकजुटीने महिलांच्या पाठीशी उभा राहिला, तर हे चित्र बदलणे सहजशक्य आहे. शासनाव्यतिरिक्त विद्यापीठ अनुदान आयोगानेही महिला सुरक्षेच्या अनुषंगाने निर्देश जारी केले आहेत. या सर्वांची आपल्या सामाजिक-भौगोलिक आवश्यकतांनुसार योग्य अंमलबजावणी करून आपल्या शिक्षण संस्था परिसरातील महिला, विद्यार्थिनींच्या सुरक्षेची काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, विद्यार्थिनींच्या पालकांचा विद्यापीठे, महाविद्यालये आदी शिक्षणसंस्थांवर विश्वास असतो. या परिसरात, तेथील वसतिगृहांत आपल्या पाल्याची योग्य काळजी घेतली जाईल, असे त्यांना वाटते. त्यामुळे आपल्याकडे शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थिनीच्या बाबतीत आपण सर्वच जण पालक आहोत, ही भावना घेऊन त्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेणे आपले कर्तव्य आहे. मुलींकडून प्राप्त होणाऱ्या गंभीर स्वरुपाच्या निनावी तक्रारींचीही संवेदनशीलतेने तपासणी करून तथ्य आढळल्यास वेळीच योग्य ती कार्यवाही करावी. परिसर सुरक्षिततेसाठी सीसीटीव्हीसारख्या तंत्रज्ञानाचा वापर करायला हवाच, पण त्याबरोबरच त्यांचे सातत्याने निरीक्षण आणि त्याद्वारे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त व नियंत्रण राखणे या बाबीही महत्त्वाच्या आहेत. महिला शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थिनींसाठी मूलभूत सोयीसुविधा केल्याच पाहिजेत. स्वच्छतागृहे, तेथील सुविधा, सुरक्षा यांचीही चोख दक्षता घ्यावी. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्याकडे कार्यरत महिला, विद्यार्थिनींशी सुसंवाद प्रस्थापित करावा, जेणे करून त्यांच्यावरील दबाव, तणाव यांचे वेळीच व्यवस्थापन करणेही शक्य होईल.

कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते रोपास पाणी वाहून करण्यात आले. प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, तसेच कार्यशाळेच्या आयोजनामागील भूमिका विषद केली. विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. तानाजी चौगुले यांनी आभार मानले.

यानंतर दिवसभरात विविध सत्रांमध्ये महिला सुरक्षेच्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती यादव, संकटसमयी मदत घेण्याच्या अनुषंगाने निर्भया पथक प्रमुख पोलीस निरीक्षक क्रांती पाटील, महिला सुरक्षाविषयक कायद्यांच्या अनुषंगाने अॅड. आसावरी कुलकर्णी, विशाखा मार्गदर्शक तत्त्वांच्या अनुषंगाने डॉ. भारती पाटील आणि राजर्षी शाहू शिष्यवृत्तीच्या अनुषंगाने डॉ. अशोक उबाळे यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेस विद्यापीठ कार्यक्षेत्रातील संलग्नित महाविद्यालयांचे प्राचार्य, शिक्षक, संस्थाचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment