तीन सुवर्णपदकांसह
१६ पारितोषिके प्राप्त
![]() |
| शिवाजी विद्यापीठाचे विद्यार्थी विकास विभाग संचालक डॉ. तानाजी चौगुले आणि संघ व्यवस्थापक यांच्यासमवेत इंद्रधनुष्य युवा महोत्सवातील उपविजेता संघ. |
कोल्हापूर, दि. १०
नोव्हेंबर: जळगाव
येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात झालेल्या २१ व्या
राज्य आंतरविद्यापीठ इंद्रधुनष्य युवा
महोत्सवात येथील शिवाजी
विद्यापीठाने सर्वसाधारण उपविजेतेपद पटकावले. तीन सुवर्ण, एक रौप्य अशा पदकांसह
एकूण १६ पारितोषिके विद्यापीठाने पटकावली.
महोत्सवात मुंबई
विद्यापीठ विजेते ठरले. जळगाव विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही.एल. माहेश्वरी,
जिल्हाधिकारी रोहन घुगे आणि प्रख्यात गायक, संगीतकार आदर्श शिंदे यांच्या हस्ते
काल पुरस्कार वितरण समारंभ पार पडला.
कुलपती
कार्यालयामार्फत आयोजित महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ इंद्रधनुष्य युवा महोत्सव (२०२५ – २०२६) कवयित्री बहिणाबाई
चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे दि. ५ ते ९ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत आयोजित
करण्यात आला. या महोत्सवात
राज्यभरातील २४ विद्यापीठांच्या संघांनी विविध २९ कलाप्रकारांत कलाविष्कार सादर
केले. महोत्सवात शिवाजी विद्यापीठाचा एकूण ५५ सदस्यांचा संघ
सहभागी झाला.
शिवाजी
विद्यापीठाच्या संघाने पुढीलप्रमाणे पारितोषिके पटकावली. लोकसंगीत वाद्यवृंद (प्रथम क्रमांक), वक्तृत्व (प्रथम), वादविवाद (प्रथम), कातरकाम (प्रथम), शास्त्रीय तालवाद्य (प्रथम), व्यंगचित्र (द्वितीय), नाट्यसंगीत (प्रथम), सुगम संगीत (प्रथम), सांस्कृतिक शोभायात्रा (द्वितीय), पाश्चिमात्य समूह गीत (द्वितीय), लघुपट (द्वितीय), भारतीय समूहगीत (तृतीय), शास्त्रीय गायन (तृतीय), पाश्चिमात्य एकल गायन (द्वितीय), लोकनृत्य (तृतीय), एकांकिका (तृतीय). इंद्रधुनष्य युवा महोत्सवातील सर्वसाधारण सांघिक उपविजेतेपदासाठीचा आदेश
बांदेकर पुरस्कृत चंद्रकांत यशवंत बांदेकर फिरता चषक विद्यापीठास मान्यवरांच्या हस्ते
प्रदान करण्यात आला.
शिवाजी विद्यापीठाच्या संघाला कुलगुरु डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरु डॉ. ज्योती जाधव, कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांचे प्रोत्साहन तर विद्यार्थी विकास
विभागाचे संचालक डॉ. तानाजी चौगुले, अधीक्षक सुरेखा आडके यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. सदर संघाचे तज्ज्ञ
मार्गदर्शक म्हणून बबन माने, संग्राम भालकर, प्रा. प्रमोद पाटील, शंतनू पाटील, ऋषिकेश
देशमाने, नितीन शिंदे, गणेश इंडीकर, सुमंत कुलकर्णी आणि आकाश लिंगाडे यांनी काम
पाहिले. संघासोबत डॉ. चौगले यांच्यासह संघव्यवस्थापक म्हणून प्रा. किशोर जालिंदर अदाते (शिवराज कॉलेज ऑफ आर्टस कॉमर्स अॅण्ड डी.
एस. कदम विज्ञान महाविद्यालय, गडहिंग्लज), डॉ पद्मश्री वाघमारे (डी.के.ए.एस.सी. कॉलेज इचलकरंजी), वरिष्ठ सहायक विजय इंगवले यांच्यासह तज्ज्ञ मार्गदर्शक होते.


No comments:
Post a Comment