Saturday, 15 November 2025

गवळी, डिसोजा यांची कविता मानवी मूल्यांची बूज राखणारी: डॉ. माया पंडित

शिवाजी विद्यापीठात काळसेकर पुरस्कारांचे वितरण

शिवाजी विद्यापीठाच्या काळसेकर पुरस्कार वितरण समारंभात बोलताना ज्येष्ठ साहित्यिक, अनुवादक डॉ. माया पंडित. मंचावर डॉ. रणधीर शिंदे, आदित्य काळसेकर व कवी अरुणचंद्र गवळी

शिवाजी विद्यापीठाचे काळसेकर पुरस्कार कवी अरुणचंद्र गवळी आणि फेलिक्स डिसोजा यांना डॉ. माया पंडित आणि कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या प्रसंगी (डावीकडून) आदित्य काळसेकर, डॉ. रणधीर शिंदे, श्री. गवळी, डॉ. पंडित, श्री. डिसोजा, डॉ. शिंदे आणि परीक्षक कवी अजय कांडर.


(काळसेकर पुरस्कार प्रदान समारंभाची लघुचित्रफीत)



कोल्हापूर, दि. १५ नोव्हेंबर: कवी अरुणचंद्र गवळी आणि फेलिक्स डिसोजा यांची कविता मानवी मूल्यांची बूज राखणारी आहे. अशा कवींना पुरस्कार देऊन शिवाजी विद्यापीठाने त्यांचा केलेला सन्मान ही स्वागतार्ह बाब आहे, असे प्रतिपादन साहित्यिक, अनुवादक डॉ. माया पंडित यांनी केले. 

शिवाजी विद्यापीठाच्या मराठी अधिविभागाच्या वतीने आज ज्येष्ठ कवी अरुणचंद्र गवळी (पुणे) आणि युवा कवी फेलिक्स डिसोजा (वसई) यांना अनुक्रमे सतीश काळसेकर काव्य पुरस्कार आणि ऋत्विज काळसेकर काव्य पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. गणित अधिविभाग सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास शिंदे होते.

डॉ. माया पंडित यांनी आपल्या भाषणामध्ये गवळी आणि डिसोजा यांच्या कवितेचे विस्तृत मूल्यमापन केले. त्या म्हणाल्या, गवळी यांची कविता ही वास्तवाची चिरफाड करून चहूबाजूंनी त्याचे तुकडे भिरकावून टाकणारी आणि वास्तवाचे विरूप उघडेवाघडे करून दाखवणारी आहे. माणसाचे गांडूळासारखे जगणे आणि त्या जगण्यातील क्षुल्लकपणा हे माणूसपणावरच प्रश्नचिन्ह उभे करणारे आहे. त्या विरुपतेचे दर्शन गवळींची कविता घडवते. गवळी आपल्या कवितेतून सातत्याने होरपळून निघालेल्या जगामध्ये मानवी संवेदनांना आवाहन करताना दिसतात. आजारग्रस्त जगामध्ये हिरवे झाड माणसांच्या वाट्याला यावे, यासाठी आग्रह धरतात. फेलिक्स डिसोजा यांच्या कवितेमध्ये कथात्म अंगाने अनेक प्रकारची निवेदने, दर्शने सामोरी येत राहतात. त्याचप्रमाणे संस्कृती आणि मूल्यांच्या संघर्षाची कथा आणि व्यथा ते उलगडण्याचा प्रयत्न करतात. नव्वदोत्तरी काळातील मूलभूत बदलांचे प्रतिबिंब उमटलेली अभिनिवेशविरहित कविता हे त्यांच्या कवितेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे, असेही त्या म्हणाल्या.

यावेळी अरुणचंद्र गवळी म्हणाले, सतीश काळशेकर यांच्यामुळेच माझा पहिला कवितासंग्रह प्रकाशित झाला. एका चांगल्या मित्राच्या स्मृतीप्रित्यर्थ हा पुरस्कार स्वीकारत असताना मनामध्ये अव्यक्त भावनांचा कल्लोळ माजला आहे. मानवी सभ्यतेवर हल्ले, द्वेष आणि विखार याविरुद्ध आवाज उठवण्याची क्षमता कवीमध्येच असते. संकटाला हार न जाणारी आणि पर्यायी समतावादी व्यवस्थेची उभारणी करण्याची प्रेरणा कवीने आणि त्याच्या कवितेने देत राहिले पाहिजे. 

फेलिक्स डिसोजा म्हणाले, या पुरस्कारामुळे काळसेकरांचा आशीर्वादाचा हात पाठीवर असल्याचा भास मला होतो आहे. माझी कविता म्हणजे भाषेच्या किनाऱ्यावर थांबून स्वतःलाच शोधण्याचा एक प्रयत्न आहे. सध्याचा स्थित्यंतराचा काळ धक्का देणारा आहे. यामध्ये सुरू असलेल्या मूल्यांच्या घुसळणीचा वेध घेण्यासाठी कवीने अखंड चिकित्सक बुद्धीने काम करीत राहिले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 

अध्यक्षीय मनोगतात कुलसचिव डॉ. विलास शिंदे म्हणाले, या दोन्ही कवींची कविता ही विषमतेवर नेमकेपणाने बोट ठेवणारी आहे. त्यांची कविता ही गाणे न वाटता सर्वसामान्यांचे जगणे वाटते, हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. अत्यंत विचारप्रवण करणारी ही कविता असून नव्वदोत्तरी कालखंडातली महत्त्वाची अभिव्यक्ती म्हणून त्याकडे आपण पाहायला हवे.

यावेळी परीक्षक कवी अजय कांडर यांनीही गवळी आणि डिसोजा यांची पुरस्कारासाठी निवड करण्यामागील भूमिका तपशीलवार स्पष्ट केली. गणेश विसपुते यांनी निळकंठ कदम यांची सतीश काळसेकरांविषयीची कविता सादर केली. आदित्य काळसेकर यांनी शिवाजी विद्यापीठाशी काळसेकर कुटुंबीयांचा जडलेला ऋणानुबंध कायम जपण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही दिली. 

मराठी अधिविभागाचे प्रमुख डॉ. रणधीर शिंदे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रांजली क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले, तर सुखदेव एकल यांनी आभार मानले. कार्यक्रमास उदय नारकर, सायमन मार्टिन, प्राचार्य डॉ. अनिल गवळी, चंद्रकांत बाबर, जयसिंग पाटील, काळसेकर कुटुंबिय यांच्यासह संशोधक, शिक्षक, विद्यार्थी- विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment