कोल्हापूर, दि. १२ नोव्हेंबर: शिवाजी विद्यापीठाच्या
संघाने राज्यस्तरीय इंद्रधनुष्य युवा महोत्सवात सलग तिसऱ्यांदा उपविजेतेपद प्राप्त
करून हॅटट्रिक साधली, ही कौतुकाची आणि अभिमानाची बाब आहे. येथून पुढील काळातही
कामगिरी उंचावत विजेतेपदाला गवसणी घालण्याच्या दृष्टीने परिश्रम घ्यावेत, असे
आवाहन प्रभारी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी आज येथे केले.
जळगाव येथील कवयित्री
बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ५ ते ९ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत झालेल्या
२१ व्या राज्य आंतरविद्यापीठ इंद्रधुनष्य युवा महोत्सवात शिवाजी विद्यापीठाच्या
संघाने तीन सुवर्ण, एक रौप्य अशा
पदकांसह एकूण १६ पारितोषिके प्राप्त करण्याची कामगिरी करत सर्वसाधारण उपविजेतेपद
पटकावले. या संघाने आज विद्यापीठात कुलगुरू डॉ. गोसावी यांची सदिच्छा भेट घेतली
आणि त्यांना आपली पारितोषिके व पुरस्कार सादर केले.
कुलगुरू डॉ. गोसावी
यांनी संघातील सर्वच सहभागी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला आणि शिवाजी
विद्यापीठाचा लौकिक सांस्कृतिक क्षेत्रात उंचावल्याबद्दल त्यांच्यावर कौतुकाचा
वर्षाव केला. यावेळी कुलगुरूंनी विविध कलाप्रकारांत सादरीकरण करणाऱ्या
विद्यार्थ्यांकडून त्यांचे अनुभव जाणून घेतले. त्याचप्रमाणे त्यांच्या
प्रशिक्षकांच्या भावनाही जाणून घेतल्या.
प्रभारी प्र-कुलगुरू
डॉ. ज्योती जाधव यांनी विद्यार्थ्यांनी यशापयशाच्या पलिकडे जाऊन आपल्या
सादरीकरणाकडे लक्ष केंद्रित केले. त्यामुळे त्यांचे यश हिऱ्यासारखे लख्ख उजळले,
अशी भावना व्यक्त केली. कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनीही संघातील सहभागी
विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
विद्यार्थी विकास
विभागाचे संचालक डॉ. तानाजी चौगुले यांनी यावेळी औपचारिक स्वागत व प्रास्ताविक केले.
शिवाजी विद्यापीठाने लोकसंगीत वाद्यवृंद, वक्तृत्व, वादविवाद, कातरकाम, शास्त्रीय
तालवाद्य, व्यंगचित्र,
नाट्यसंगीत, सुगम संगीत, सांस्कृतिक शोभायात्रा, पाश्चिमात्य
समूह गीत या प्रकारांमध्ये आपला ठसा उमटविल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी अधीक्षक सुरेखा
आडके, तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून बबन माने, संग्राम भालकर, प्रा. प्रमोद पाटील, शंतनू पाटील, ऋषिकेश देशमाने, नितीन शिंदे, गणेश इंडीकर, सुमंत
कुलकर्णी, आकाश लिंगाडे, वरिष्ठ सहायक विजय इंगवले उपस्थित होते.

No comments:
Post a Comment