Tuesday, 25 November 2025

संरक्षण क्षेत्रात भारत अत्याधुनिक तंत्रज्ञानाने आत्मनिर्भर: काशीनाथ देवधर

शिवाजी विद्यापीठात आयोजित विशेष व्याख्यानात बोलताना डीआरडीओचे निवृत्त समूह संचालक काशीनाथ देवधर

शिवाजी विद्यापीठात आयोजित विशेष व्याख्यानात बोलताना डीआरडीओचे निवृत्त समूह संचालक काशीनाथ देवधर

शिवाजी विद्यापीठात आयोजित विशेष व्याख्यानात बोलताना डीआरडीओचे निवृत्त समूह संचालक काशीनाथ देवधर. मंचावर (डावीकडून) डॉ. हर्षवर्धन पंडित, डॉ. प्रमोद पाटील, प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, डॉ. अजित कोळेकर आणि डॉ. दीप्ती कुऱ्हे

(व्याख्यानाची लघुचित्रफीत)


कोल्हापूर, दि. २५ नोव्हेंबर: संरक्षण क्षेत्रामध्ये भारत अत्याधुनिक स्वदेशी तंत्रज्ञानाने आत्मनिर्भर झाला असून आता तो आयातदार राहिलेला नसून मोठ्या प्रमाणात निर्यातदार देश बनलेला आहे, असे प्रतिपादन पुण्याच्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे निवृत्त समूह संचालक काशीनाथ देवधर यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाचे इन्स्टिट्यूशन्स इनोव्हेशन कौन्सिल, स्कूल ऑफ नॅनोसायन्स अँड बायोटेक्नॉलॉजी आणि स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने मीट द सायंटिस्ट या उपक्रमांतर्गत ऑपरेशन सिंदूर आणि आत्मनिर्भर भारत या विषयावर आयोजित विशेष व्याख्यानात श्री. देवधर बोलत होते. विद्यापीठाच्या प्रभारी प्र—ुलगुरू डॉ. ज्योती जाधव अध्यक्षस्थानी होत्या.

श्री. देवधर यांनी आपल्या भाषणात भारताच्या संरक्षण क्षेत्रातील वाटचालीचा सविस्तर आढावा घेताना त्यामध्ये संरक्षण संशोधन व विकास संस्थेचे योगदान विषद केले. ते म्हणाले, काही वर्षांपूर्वीपर्यंत भारत हा संऱक्षण क्षेत्राशी निगडित सामग्री आयात करणारा देश होता. मात्र, आता चित्र पालटले असून आज देशात संरक्षणविषयक एक लाख २७ हजार कोटी रुपये मूल्याचे उत्पादन होते. त्यामध्ये २३ हजार ६२२ कोटी रुपयांच्या निर्यातीचाही समावेश आहे. पुढील पाच वर्षांत हे उत्पादन ३ लाख कोटी रुपयांवर जाईल. निर्यातही त्याच प्रमाणात वाढेल. भूमी, वायू, जल, आकाश आणि अवकाश अशा सर्व ठिकाणी वापरावयाच्या अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचे उत्पादन भारत करीत असून या प्रगतीने जगाचे डोळे दिपवले असल्याचे त्यांनी सांगितले.

ऑपरेशन सिंदूर हे भारताने थांबविलेले नसून जोवर दहशतवादी कृत्ये सुरू राहतील, तोवर या मोहिमेअंतर्गत पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्याच्या भूमिकेत देश असल्याचे देवधर यांनी सांगितले. यापुढे भारतावरील कोणताही दहशतवादी हल्ला हा युद्धाची कृती समजली जाईल आणि दहशतवादी आणि दङशतीला प्रोत्साहन वा आश्रय देणारे राष्ट्र यामध्ये भेद न करता कठोर प्रत्युत्तर दिले जाईल, असा सज्जड इशारा पाकिस्तानला दिल्याचेही त्यांनी सांगितले.

अध्यक्षीय मनोगतात प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव म्हणाल्या, देवधर यांनी डीआरडीओसारख्या संस्थेमध्ये अतिशय जबाबदारीच्या पदांवर संशोधक म्हणून आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे. तेथील कामाचे अनुभव त्यांनी अतिशय उत्कृष्ट व सोप्या पद्धतीने विद्यार्थ्यांना सांगितली. त्यांच्या या व्याख्यानामुळे विद्यार्थ्यांच्या मनात देशाभिमानाची ठिणगी निश्चितपणे प्रज्वलित होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

यावेळी डॉ. प्रमोद जे. पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. हर्षवर्धन पंडित यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. दीप्ती कुऱ्हे यांनी आभार मानले. कार्यक्रमास स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीचे संचालक डॉ. अजित कोळेकर, क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक डॉ. शरद बनसोडे, आजीवन अध्ययन केंद्राचे संचालक डॉ. रामचंद्र पवार, शासकीय पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन सोनजे, डॉ. प्रवीणकुमार पाटील यांच्यासह शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment