शिवाजी विद्यापीठात स्त्री
मुक्ती परिषदेला मोठा प्रतिसाद
![]() |
| शिवाजी विद्यापीठात आयोजित स्त्री मुक्ती परिषदेत बीजभाषण करताना शारदा साठे. मंचावर (डावीकडून) रेश्मा खाडे, छाया राजे, डॉ. भारती पाटील आणि अमोल केरकर. |
![]() |
| शिवाजी विद्यापीठात आयोजित स्त्री मुक्ती परिषदेत बीजभाषण करताना शारदा साठे. मंचावर (डावीकडून) डॉ. भारती पाटील आणि अमोल केरकर. |
कोल्हापूर, दि. २९ नोव्हेंबर: शोषणविरहित आणि
मानवतापूर्ण जगासाठी स्त्रीवादी चळवळीची आजच्या काळातही मोठी आवश्यकता आहे, असे
प्रतिपादन मुंबईच्या स्त्री मुक्ती संघटनेच्या विश्वस्त शारदा साठे यांनी आज येथे
केले.
शिवाजी विद्यापीठाचे शारदाबाई गोविंदराव पवार
अध्यासन आणि महाराष्ट्र स्त्री मुक्ती संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने स्त्री
मुक्ती चळवळीला ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आयोजित एकदिवसीय कोल्हापूर जिल्हा
स्त्री मुक्ती परिषदेच्या उद्घाटन समारंभात बीजभाषक म्हणून त्या बोलत होत्या.
शारदा साठे म्हणाल्या, स्त्रियांच्या चळवळीमध्ये
झालेले विस्कळीकरण आणि त्यांचे मोठ्या प्रमाणात झालेले ‘एनजीओ’करण यामुळं स्त्री
चळवळ नकारात्मक अर्थाने प्रभावित झाली. मात्र, स्त्रियांच्या
संदर्भात विविध स्तरांवरील सुरक्षा तपासणीच्या निमित्ताने पुन्हा चळवळीमध्ये जी
गतिमानता आली, तिला स्त्रियांचा जो प्रतिसाद लाभला, त्यामुळे एक नवी उभारी प्राप्त
झाली. नव्या बदलत्या परिप्रेक्ष्यामध्ये स्त्रीमुक्ती चळवळीचे पुनर्गठण करण्याच्या
दिशेने यापुढील वाटचाल करावी लागणार आहे. हिंसामुक्त, शांततामय वातावरणात
जगण्याच्या अधिकारासाठी स्त्रीवादी चळवळ महत्त्वाची भूमिका बजावेल. या निमित्ताने
एकवटलेली स्त्रियांची ताकद आता नवीन सुंदर, समन्वयाच्या जगाच्या नवनिर्माणासाठी
वापरावयाची आहे. चळवळीच्या कार्याचे विकृतीकरण टाळावयाचे असल्यास तिचे योग्य
दस्तावेजीकरण करण्याची आवश्यकताही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी कोल्हापूर जिल्हा स्त्री मुक्ती
परिषदेच्या समन्वयक छाया राजे म्हणाल्या, स्त्रीमुक्ती चळवळीने राज्यात ‘एकला चलो रे’ पासून ‘मिल के चलो रे’ असा खूप चांगला
समन्वयाचा सांघिक प्रवास केला आहे. स्त्रियांच्या हक्कांसाठी वेगवेगळ्या स्तरांवर
कार्यरत संघटनांना एकत्र आणण्यात गेल्या ५० वर्षांच्या वाटचालीत आलेले यश
महत्त्वाचे आहे. आता पुढील ५० वर्षांच्या वाटचालीची दिशाही आपण संघटितपणानेच
ठरविली पाहिजे.
कार्यक्रमाच्या सुरवातीला माता सावित्रीबाई फुले,
शारदाबाई पवार यांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले. अध्यासनाच्या समन्वयक डॉ.
भारती पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. रेश्मा खाडे यांनी सूत्रसंचालन
केले, तर प्रीती सरदेसाई यांनी आभार मानले. यावेळी मंचावर संघटनेच्या श्रीमती अमोल
केरकर उपस्थित होत्या. कार्यक्रमास तनुजा शिपूरकर, सीमा पाटील यांच्यासह विविध
संस्था, संघटनांच्या पदाधिकारी, महिला सदस्य, शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थिनी
मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्त्रीवादी
चळवळीविषयी विविध सत्रांत चर्चा
उद्घाटन सत्रानंतर विविध सत्रे पार पडली. ‘स्त्री-पुरूष
समानतेच्या दिशेने’ या विषयावरील सत्रात माजी प्र-कुलगुरू डॉ. माया
पंडित, डॉ. भारती पाटील यांनी सहभाग घेतला. मुंबईच्या अमोल केरकर अध्यक्षस्थानी
होत्या. ‘पुरूषभान’ या विषयावरील
सत्रात मिलींद चव्हाण (पुणे) आणि प्रसाद कुलकर्णी यांनी सहभाग घेतला. ‘हिंसाचार- मानसिक,
सामाजिक’ या विषयावरील सत्रात तनुजा शिपूरकर, मयुरी
आळवेकर, सुनीता पाटील यांनी सहभाग घेतला. तर, शोभा कोकीतकर (मुंबई) अध्यक्षस्थानी
होत्या. सुधाकर भदरगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ‘स्त्रिया व
अंधश्रद्धा’ या विषयावरील विशेष सत्रात कोल्हापूर अंधश्रद्धा
निर्मूलन समितीच्या वतीने ‘ऐसे कैसे झाले भोंदू?’ या विषयावर नाटिका,
बतावणीचे सादरीकरण करण्यात आले.


No comments:
Post a Comment