Friday, 14 November 2025

ग्रामीण महिलांना सक्षमीकरणाच्या संधी प्रदान करण्यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील: प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव

शिवाजी विद्यापीठात ‘स्वरोजगारातून सक्षमीकरण’ कार्यशाळेला प्रारंभ

शिवाजी विद्यापीठात सुरू झालेल्या दोनदिवसीय कार्यशाळेस उपस्थित महिलांसमवेत प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव आणि प्रशिक्षक, शिक्षक आदी.


कोल्हापूर, दि. १४ नोव्हेंबर: ग्रामीण भागातील महिलांमध्ये विविध कष्टाची आणि कौशल्याची कामे करण्याची प्रचंड क्षमता असते. त्यांना सक्षमीकरणाच्या योग्य संधी प्रदान करण्याची आवश्यकता असते. त्या दृष्टीने शिवाजी विद्यापीठ प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाच्या प्रबारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाची यशवंतराव चव्हाण ग्रामीण विकास प्रशाळा, बेटी बचाओ अभियान आणि कोल्हापूर जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्वरोजगारातून सक्षमीकरण’ या दोन दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.

ग्रामीण भागातील महिलांना स्वरोजगाराच्या माध्यमातून आर्थिक सक्षमीकरणाबाबत मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. रोटरी क्लब ऑफ एक्झिक्युटिव्ह्, इचलकरंजी यांच्या सहयोगाने विविध प्रशिक्षण सत्रांचे आयोजन केले आहे.

कार्यशाळेत जिल्हा परिषदेचे जिल्हा अभियान व्यवस्थापक दयानंद पाटील, इचलकरंजी रोटरीचे सहाय्यक गव्हर्नर गिरीश कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. प्रशाळेचे संचालक डॉ. नितीन माळी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. उर्मिला दशवंत यांनी आभार मानले. कार्यक्रमाला विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. तानाजी चौगुले, बेटी बचाओ अभियान समन्वयक डॉ. प्रतिभा देसाई, रोटरीचे अध्यक्ष संतोष साधळे, सचिव मयूर पाटील आणि प्रोजेक्ट चेअरमन शीतल उपाध्ये यांच्यासह जिल्ह्यातील विविध स्वयंसहायता बचत गटाच्या महिला, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.

 

 

No comments:

Post a Comment