Friday, 5 December 2025

‘खेलो इंडिया’मध्ये शिवाजी विद्यापीठाला ४ सुवर्णांसह २० पदके

अॅथलेटिक्स, कयाकिंगमध्ये नेत्रदीपक कामगिरी

 

सुवर्णपदक विजेती प्राची देवकाते


रौप्यपदक विजेता विकास खोडके



कयाकिंगमध्ये कांस्यपदक प्राप्त करणारा शिवाजी विद्यापीठाचा पुरूष संघ

कयाकिंगमध्ये तीन कांस्यपदके प्राप्त करणारा विद्यापीठाचा महिला संघ



कोल्हापूर, दि. ५ डिसेंबर: जयपूर (राजस्थान) येथे सुरू असलेल्या पाचव्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्समध्ये शिवाजी विद्यापीठाच्या क्रीडापटूंनी चार सुवर्णपदकांसह एकूण वीस पदके प्राप्त केली. यामध्ये तीन रौप्य आणि १३ कांस्य पदकांचा समावेश आहे. कयाकिंगमध्ये विद्यापीठाच्या खेळाडूंनी नेत्रदीपक कामगिरी करीत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

अॅथलेटिक्समध्ये विद्यापीठाच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरीचे प्रदर्शन केले. १०० मीटरमध्ये सुवर्णपदक मिळवून ऋषी प्रसाद देसाई याने दमदार सुरवात केली, तर प्राची देवकाते हिने ३००० मीटर स्टीपलचेसमध्ये सुवर्णपदक मिळवून स्पर्धेची अखेरही सुवर्णमयी केली.
अॅथलेटिक्समध्ये ११० मीटर अडथळा शर्यतीत विकास आनंदा खोडके याने १४.५१ सेकंदाची वेळ नोंदवत रौप्य पदक प्राप्त केले. तर, ८०० मीटर धावण्यात रिया पाटीलने कांस्यपदक प्राप्त केले.
कयाकिंग व कनोईंग प्रकारात विद्यापीठाच्या खेळाडूंनी पाच कांस्यपदके मिळविली. कनोईंगमध्ये वैयक्तिक गटात १००० मीटर सी-वन प्रकारात प्रिया मारुती चव्हाण हिने कांस्यपदक पटकावले.

कयाकिंगमध्ये विद्यापीठाच्या चमूने चार कांस्यपदके पटकावली. कयाकिंग के-फोर १००० मीटर महिला संघाने कांस्यपदक पटकावले. या संघात आरती जाधव, निकिता मगदूम, सुहाना जमादार आणि प्रणाली कोपर्डे होत्या. याच संघाने के-फोर २०० मीटर महिला गटातही कांस्यपदक मिळवले. के-फोर ५०० मीटर महिला गटात कांस्यपदक पटकावणाऱ्या विद्यापीठाच्या संघात ऋतुजा पाटील, आरती जाधव, निकिता मगदूम व सुहाना जमादार होत्या. के-फोर २०० मीटर पुरुष गटात कांस्यपदक मिळवून देणाऱ्या संघात करण घुणके, स्वानंद अक्कीवाटे, अमेय भुयेकर आणि श्रीसमर्थ सासणे होते.

Wednesday, 3 December 2025

मराठी साहित्यातून प्रतिसरकारच्या इतिहासाचे प्रभावी चित्रण: संपत मोरे

शिवाजी विद्यापीठात आयोजित विशेष व्याख्यानात बोलताना संपत मोरे. मंचावर (डावीकडून) डॉ. रणधीर शिंदे, डॉ. प्रकाश पवार, अशोक पवार आणि डॉ. नंदकुमार मोरे.


कोल्हापूर, दि. ३ डिसेंबर: मराठी साहित्यातून प्रतिसरकारच्या  इतिहासाचे प्रभावी चित्रण करण्यात आले आहे. ते नव्या पिढीसमोर मांडण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन अभ्यासक संपत मोरे यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाच्या जी.डी.(बापू) लाड अध्यासनाच्या वतीने जी.डी. (बापू) लाड यांच्या जयंतीनिमित्त प्रतिसरकारची चळवळ आणि मराठी साहित्यया विषयावरील विशेष व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ राजकीय विश्लेषक डॉ. प्रकाश पवार होते.

प्रतिसरकारच्‍या चळवळीचे विविध पैलू उलगडून सांगताना संपत मोरे म्हणाले, भारतीय स्वातंत्र्य अनेकांच्या त्यागातून साकारले आहे. स्वातंत्र्य चळवळीत प्रतिसरकारचे मोठे योगदान आहे. प्रतिसरकारचा जाज्ज्वल्य इतिहास मराठी साहित्यातून प्रतिबिंबित झाला आहे. मराठी साहित्यातून क्रांतिसिंह नाना पाटील, जी.डी.(बापू) लाड, नागनाथअण्णा नायकवडी यांच्यासारख्या अनेक स्वातंत्र्यसैनिकांच्या जीवनातील प्रसंग साहित्यातून चित्रित झाले आहेत. ना. सी. फडके, .दि. माडगूळकर, व्यंकटेश माडगूळकर, वामन होवाळ, रा. तु. पाटील यांच्या साहित्यातील तसेच कथा, शाहिरी काव्य, कादंबरी, आत्मचरित्र यामधून आलेले प्रतिसरकार चळवळीचे चित्रण अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. याची दखल नव्या पिढीने घेतली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

डॉ. प्रकाश पवार अध्यक्षीय मनोगतात म्हणाले की, गांधीच्या विचारसरणीचा नवा अन्वयार्थ प्रतिसरकारच्या चळवळीने लावला. या चळवळीने सामाजिक सुधारणांचा प्रसार आणि प्रचार करण्याचा प्रयत्नही केला. त्याबरोबरच सांस्कृतिक परंपरेशी असणारे नाते प्रतिसरकारने कधीही तुटू दिले नाही.

अध्यासनाचे समन्वयक डॉ. रणधीर शिंदे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. नंदकुमार मोरे यांनी परिचय करून दिला. प्रांजली क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले, डॉ. सुखदेव एकल यांनी आभार मानले. कार्यक्रमाला अशोक पवार, डॉ. प्रभंजन माने, डॉ. नवनाथ गुंड, प्रा. सी.एल. रोकडे, मतिन शेख, प्राचार्य आर.एस.डुबल, प्रा. प्रताप लाड तसेच इतिहास विभाग, राज्यशास्त्र विभाग, मराठी विभागातील संशोधक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.