‘कुटुंब रंगलंय
काव्यात’सह विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम
![]() |
| शिवाजी विद्यापीठाच्या ६२ व्या दीक्षान्त समारंभानिमित्त आयोजित दोनदिवसीय ग्रंथमहोत्सवासाठी मंडप व अन्य सुविधा उभारणीचे काम पूर्ण झाले आहे. |
कोल्हापूर, दि. २२ डिसेंबर: शिवाजी विद्यापीठाच्या ६२ व्या दीक्षान्त समारंभ सोहळ्याला उद्या (दि. २३) ग्रंथदिंडीने प्रारंभ होत असून ग्रंथमहोत्सवाचे उद्घाटन आणि सांस्कृतिक कार्यक्रमही होणार आहेत. विश्वविक्रमी कविता सादरकर्ते विसूभाऊ बापट यांचा ‘कुटुंब रंगलंय काव्यात’ हा प्रयोग सादर होईल. ग्रंथमहोत्सवासाठीची तयारी पूर्ण झाली असून बुधवारी (दि. २४) सकाळी होणाऱ्या दीक्षान्त समारंभाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. ही माहिती समन्वयक तथा बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राचे संचालक डॉ. धनंजय सुतार आणि विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. तानाजी चौगुले यांनी दिली.
शिवाजी विद्यापीठाच्या ६२ व्या दीक्षान्त समारंभानिमित्त
दरवर्षीप्रमाणे उद्या (दि. २३) सकाळी ७.३० वाजता कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्या
हस्ते कमला महाविद्यालयात ग्रंथदिंडीचे उद्घाटन होईल. तेथून जनता बझार,
राजारामपुरी मुख्य मार्ग, आईचा पुतळा, सायबर चौक, शिवाजी विद्यापीठ गेट क्र. ६ या
मार्गे दिंडी राजमाता जिजाऊसाहेब सभागृहात दीक्षान्त सभामंडपात येईल आणि तेथे
दिंडीचे विसर्जन होईल.
त्यानंतर सकाळी १० वाजता कुलगुरू डॉ. गोसावी
यांच्या हस्ते विद्यापीठाच्या अनेक्स इमारत परिसरात आयोजित ग्रंथमहोत्सवाचे
उद्घाटन होईल. यंदा ग्रंथमहोत्सवात नामवंत प्रकाशक, विक्रेते यांचे एकूण ४० स्टॉल
असून त्यापैकी पुस्तकांचे १९ तर, खाद्यपदार्थ व अन्य वस्तू, पदार्थांचे १० स्टॉल
असतील. ग्रंथमहोत्सवात यंदा प्रथमच वन्यजीव संवर्धन विभागाचेही २ स्टॉल असणार
आहेत. ग्रंथमहोत्सव २३ व २४ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत सुरू
राहतील. ग्रंथमहोत्सवासाठी मंडप उभारणीसह सर्व कामे पूर्ण झाली आहेत.
त्यानंतर दुपारी १२ ते २ या वेळेत राजमाता
जिजाऊसाहेब सभागृहात शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या कलाकार
विद्यार्थ्यांकडून ‘महाराष्ट्राची लोकधारा’ हा विशेष सांस्कृतिक
कार्यक्रम सादर होईल. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता प्रख्यात कवी विसूभाऊ बापट यांचे
विश्वविक्रमी ‘कुटुंब रंगलंय काव्यात’ हे सुप्रसिद्ध
एकपात्री काव्य सादरीकरण होईल. हा कार्यक्रम सर्वांना विनामूल्य खुला राहील. या
सर्व कार्यक्रमांचा विद्यार्थ्यांसह सर्वच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित
राहून लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


No comments:
Post a Comment