Tuesday, 23 December 2025

शिवाजी विद्यापीठाच्या ६२व्या दीक्षान्त सोहळ्यास ग्रंथदिंडी, ग्रंथ महोत्सवाने प्रारंभ

महाराष्ट्राची लोकधारा सांस्कृतिक कार्यक्रमाचे उत्कृष्ट सादरीकरण

शिवाजी विद्यापीठाच्या ६२ व्या दीक्षान्त समारंभानिमित्त काढण्यात आलेल्या ग्रंथदिंडीस पालखीपुजनाने प्रारंभ करताना प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव.

शिवाजी विद्यापीठाच्या ६२ व्या दीक्षान्त समारंभानिमित्त आयोजित ग्रंथदिंडी प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आली. यावेळी दिंडीत सहभागी विद्यापीठाचे वरिष्ठ अधिकारी.

शिवाजी विद्यापीठाच्या ६२ व्या दीक्षान्त समारंभानिमित्त आयोजित ग्रंथदिंडी प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आली. यावेळी दिंडीत सहभागी विद्यापीठाचे वरिष्ठ अधिकारी.


शिवाजी विद्यापीठाच्या ६२ व्या दीक्षान्त समारंभानिमित्त आयोजित ग्रंथमहोत्सवाचे प्रतिमापूजनाने उद्घाटन करताना प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव. सोबत (डावीकडून) डॉ. सुहासिनी पाटील, डॉ. अजितसिंह जाधव, डॉ. धनंजय सुतार, डॉ. विलास शिंदे, डॉ. तानाजी चौगुले, डॉ. शरद बनसोडे आणि डॉ. श्रीकृष्ण महाजन.

शिवाजी विद्यापीठाच्या ६२ व्या दीक्षान्त समारंभानिमित्त आयोजित ग्रंथमहोत्सवामध्ये पुस्तकांची पाहणी करताना प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव. सोबत डॉ. सुहासिनी पाटील,डॉ. श्रीकृष्ण महाजन, डॉ. अजितसिंह जाधव, डॉ. महादेव देशमुख, डॉ. प्रमोद पांडव, डॉ. विलास शिंदे, डॉ. तानाजी चौगुले, डॉ. शरद बनसोडे, .

शिवाजी विद्यापीठात आयोजित ग्रंथमहोत्सवातील वन्यजीव विभागाच्या स्टॉलची पाहणी करताना प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव आणि वरिष्ठ अधिकारी

शिवाजी विद्यापीठात ६२ व्या दीक्षान्त समारंभानिमित्त आयोजित ग्रंथमहोत्सवातील पुस्तकांची उत्सुकतेने पाहणी करताना विद्यार्थिनी.

शिवाजी विद्यापीठाच्या ६२ व्या दीक्षान्त समारंभानिमित्त आयोजित सांस्कृतिक महोत्सवात शेतकरी नृत्य सादर करताना विद्यार्थी-विद्यार्थिनी

शिवाजी विद्यापीठाच्या ६२ व्या दीक्षान्त समारंभानिमित्त आयोजित सांस्कृतिक महोत्सवात शिवराज्याभिषेकाचे नेत्रदीपक सादरीकरण करण्यात आले.

शिवाजी विद्यापीठाच्या ६२ व्या दीक्षान्त समारंभानिमित्त आयोजित सांस्कृतिक महोत्सवात शिवराज्याभिषेकाचे नेत्रदीपक सादरीकरण करण्यात आले.


कोल्हापूर, दि. २३ डिसेंबर: शिवाजी विद्यापीठाच्या ६२ व्या दीक्षान्त समारंभास आजपासून ग्रंथदिंडी, ग्रंथमहोत्सव आणि महाराष्ट्राची लोकधारासांस्कृतिक कार्यक्रम अशा भरगच्च उपक्रमांनी सुरवात झाली. उद्या सकाळी ११ वाजता राजमाता जिजाऊसाहेब सभागृहात मुख्य दीक्षान्त समारंभ होणार आहे.

शिवाजी विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभाच्या निमित्ताने आयोजित करण्यात येणारी ग्रंथदिंडी आणि ग्रंथमहोत्सव हे शहरवासियांसह विद्यार्थी-विद्यार्थिनींच्याही आकर्षणाचा केंद्रबिंदू असतात. यंदाही ग्रंथदिंडीमधील शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह नागरिकांच्या उत्साही सहभागाने ही बाब अधोरेखित केली.

आज सकाळी कमला महाविद्यालय येथे शिवाजी विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांच्या हस्ते ग्रंथपालखीचे पूजन करण्यात आले. पालखीमध्ये भारताचे संविधान, सार्थ श्री ज्ञानेश्वरी यांसह आधुनिक विज्ञानाविषयीचे ग्रंथ ठेवण्यात आले होते. तेथून टाळमृदंगाच्या गजरात दिंडीला प्रारंभ झाला. वाचनसंस्कृतीचा जागर करीत आणि प्रबोधनपर घोषणा देत दिंडी राजारामपुरीतून आईचा पुतळा आणि सायबर संस्थेमार्गे दिंडी विद्यापीठाच्या प्रांगणात प्रविष्ट झाली. प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला प्रदक्षिणा घालून व अभिवादन करून पालखी अखेरीस राजमाता जिजाऊसाहेब बहुउद्देशीय सभागृहात आणण्यात येऊन तेथे स्थापित करण्यात आली. पालखी मार्गावर सहभागी विद्यार्थी-विद्यार्थिनींचा उत्साह ओसंडून वाहात होता.

ग्रंथदिंडीमध्ये कुलसचिव, डॉ. विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञान स्रोत केंद्राचे संचालक डॉ. धनंजय सुतार, मानव्यशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता, डॉ. राजाराम गुरव, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ. वर्षा मैंदर्गी, आंतरविद्याशाखीय विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. अजय साळी, इनोव्हेशन, इनक्युबेशन व लिंकेजेस केंद्राचे संचालक डॉ. सागर डेळेकर, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. तानाजी चौगले, क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे, ग्रंथालय व माहितीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. सचिनकुमार पाटील, उप-ग्रंथपाल डॉ. प्रकाश बिलावर, उपकुलसचिव डॉ. वैभव ढेरे, डॉ. प्रमोद पांडव, संगणक केंद्र संचालक अभिजीत रेडेकर, सहाय्यक ग्रंथपाल डॉ. शिवराज थोरात, कमला महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. तेजस्विनी मुडेकर, डॉ. सुजय पाटील यांच्यासह बॅ. खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्रातील कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी, राष्ट्रीय सेवा योजनेचे विविध महाविद्यालयांतील समन्वयक आणि स्वयंसेवक मोठ्या संख्येने सहभागी झाले. ग्रंथदिंडीमध्ये विविध महाविद्यालयांतील ग्रंथपालही सहभागी झाले.

विद्यार्थ्यांचे आवेशपूर्ण लेझीमवादन

यंदाच्या ग्रंथदिंडीमध्ये शहरातील महाविद्यालयांमधील राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांचा सहभाग लक्षणीय होता. त्याचप्रमाणे राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थिनींचे संचलनही लक्षवेधक ठरले. मात्र शहराचे लक्ष वेधून घेतले ते विद्यार्थ्यांच्या लेझीम, ढोल आणि झांज पथकांनी. अत्यंत आवेशपूर्ण अशा पद्धतीने ढोल, ताशा आणि झांज वादन करीत ग्रंथदिंडीमध्ये या मुलांनी चैतन्य आणले. प्र-कुलगुरू डॉ. जाधव यांनी या मुलांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.

वैविध्यपूर्ण विषयांवरील ग्रंथांची वाचकांना पर्वणी

ग्रंथदिंडीनंतर सकाळी ११ वाजता विद्यापीठाच्या अनेक्स इमारत परिसरात प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांच्या हस्ते ग्रंथमहोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. ग्रंथालयशास्त्राचे जनक डॉ. एस.आर. रंगनाथन आणि बॅ. बाळासाहेब खर्डेकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार घालून व दीपप्रज्वलन करून हे उद्घाटन झाले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते विद्यापीठ प्रकाशन विभागाच्या स्टॉलचे उद्घाटन करण्यात आले. स्थानिकांसह बाहेरगावचेही १९ प्रकाशक व ग्रंथविक्रेते महोत्सवात सहभागी झाले आहेत. त्यांच्या माध्यमातून विविध विषयांवरील हजारो ग्रंथ वाचकांना पाहणी व खरेदीसाठी उपलब्ध आहेत. ग्रंथप्रेमी व वाचनवेड्या व्यक्तींसाठी हे प्रदर्शन म्हणजे एक पर्वणीच आहे. या सर्व स्टॉलची प्र-कुलगुरूंसह अधिकाऱ्यांनी फिरून पाहणी केली आणि सहभागींना शुभेच्छा व धन्यवाद दिले.

याखेरीज येथे खाद्यपदार्थ व पेय विक्रीचे १० स्टॉल आहेत. डॉ. श्रीकृष्ण महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली वाणिज्य व व्यवस्थापन, एम.बी.ए. आदी अधिविभागांच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी विविध स्टॉल लावले आहेत. दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्र, एसयूके-आरडीएफ कंपनी यांसह स्टार्टअप उपक्रमाला वाहिलेल्या स्टॉलचाही त्यात समावेश आहे. या विद्यार्थ्यांना प्र-कुलगुरू डॉ. जाधव यांनी, पदार्थ किंवा साहित्य विक्रीच्या पलिकडे जाऊन संपूर्ण बिझनेस मॉडेलचा अभ्यास करण्याच्या दृष्टीने या उपक्रमाकडे पाहावे, असे सांगितले.

वन्यजीव विभागाच्या स्टॉलचे आकर्षण

महोत्सवात यंदा प्रथमच महाराष्ट्र शासनाचा वन्यजीव विभाग सहभागी झाला आहे. वने आणि वन्यजीवांशी संबंधिक पुस्तके, माहितीपुस्तके, वेगवेगळी आकर्षक आभूषणे, टी शर्ट, सॅक, बॅग इत्यादी वस्तू त्यांनी विक्रीसाठी ठेवलेल्या आहेत. या स्टॉलविषयी विद्यार्थ्यांमध्ये विशेष कुतूहल होते. त्याखेरीज काही महिला बचत गट, महिला यांनीही विविध वस्तूंचे स्टॉल लावले आहेत. तसेच, ग्रंथ आमुचे साथी असा उद्घोष करणारा सेल्फी पॉईंटही उभारला आहे.

सांस्कृतिक कार्यक्रमाची पर्वणी

राष्ट्रीय सांस्कृतिक आदान-प्रदान उपक्रमांतर्गत शिवाजी विद्यापीठाचा संघ नुकताच जम्मू येथील जम्मू विद्यापीठामध्ये जाऊन आला. तेथे महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमासह शिवराज्याभिषेक, मर्दानी खेळांचे प्रदर्शन करून त्यांनी तेथील लोकांची मने जिंकली. याच कार्यक्रमाचे आज विद्यार्थी विकास विभागातर्फे राजमाता जिजाऊसाहेब सभागृहात फेर सादरीकरण करण्यात आले. प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी गणेशवंदनेने सुरवात करीत वासुदेव, शेतकरी, खंडोबा, धनगरी नृत्य, मंगळागौर, भारुड, लेझीम, सासनकाठी, भारतीय लोककला वाद्यवृंद, लावणी, पोतराज, गंधार, कोळीगीत, महाराष्ट्र लोककला वाद्यवृंद, पोवाडा, लाठीकाठी आणि अखेरीस राज्याभिषेक या कलाप्रकारांचे उत्कृष्ट सादरीकरण केले. या संघातील विद्यार्थ्यांना प्र-कुलगुरू डॉ. जाधव यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गुणगौरव करण्यात आला.

विद्यापीठ रंगलं काव्यात’!

शिवाजी विद्यापीठाच्या ६२ व्या दीक्षान्त समारंभाची पूर्वसंध्या विश्वविक्रमी कविता सादरकर्ते विसुभाऊ बापट यांच्या कुटुंब रंगलंय काव्यात या एकपात्री काव्यनाट्यानुभवाने रंगली. या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी विद्यापीठासह विद्यापीठाबाहेरूनही अनेक रसिक उपस्थित राहिले. सुमारे दोन तासांच्या या कार्यक्रमात बापट यांनी आपल्या सादरीकरणाने रसिकांना भावनांच्या हिंदोळ्यावर खेळवताना खऱ्या अर्थाने खिळवून ठेवले. तत्पूर्वी, सुरवातीला प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांनी ग्रंथ व स्मृतिचिन्ह भेट देऊन बापट यांचे स्वागत केले. यावेळी कुलसचिव डॉ. विलास शिंदे उपस्थित होते.

शिवाजी विद्यापीठात सादरीकरण करताना विसुभाऊ बापट

शिवाजी विद्यापीठात विसुभाऊ बापट यांचे स्वागत करताना प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव. शेजारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे


No comments:

Post a Comment