तंजावर मराठी राज्याच्या सर्वंकष
अभ्यासाला मिळणार चालना
| तमिळ विद्यापीठ, तंजावर |
कोल्हापूर, दि. १६ डिसेंबर: तंजावर मराठी
राज्याचा इतिहास, भाषा, साहित्य आणि संस्कृती यांचा अभ्यास व संशोधनाला चालना
देण्यासाठी शिवाजी विद्यापीठातर्फे तंजावर येथे येत्या २२ ते २४ डिसेंबर २०२५ या
कालावधीत राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती मराठी
अधिविभागाचे डॉ. नंदकुमार मोरे आणि इतिहास अधिविभाग प्रमुख डॉ. अवनीश पाटील यांनी
दिली आहे.
शिवाजी विद्यापीठ आणि तंजावरचे तमिळ विद्यापीठ
यांच्यामध्ये झालेल्या सामंजस्य करारानुसार इतिहास व मराठी अधिविभाग यांच्यासह
कोल्हापूरचे महावीर महाविद्यालय, अर्जुननगरचे देवचंद महाविद्यालय, शिवाजी
विद्यापीठ मराठी शिक्षक संघ आणि शिवाजी विद्यापीठ इतिहास परिषद यांच्या संयुक्त
विद्यमाने हे चर्चासत्र होत आहे. तमिळ विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात होणाऱ्या या
चर्चासत्राचे उद्घाटन तंजावरचे श्रीमंत शिवाजीराजे भोसले यांच्या हस्ते २२ डिसेंबर
रोजी सकाळी १० वाजता होईल. तंजावरचे अभ्यासक, संशोधक डॉ. विवेकानंद गोपाळ यावेळी
बीजभाषण करतील.
यानंतरच्या तीन दिवसांत चर्चासत्रात अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर अभ्यासक व संशोधक मांडणी करतील. त्यांची नावे आणि कंसात विषय याप्रमाणे असे:- डॉ. समीर जाधव, मुंबई (तंजावरचे मराठी नाटक), डॉ. राकेश साळुंखे, सातारा (तमिळनाडूतील अप्रकाशित हस्तलिखिते), बी. रामचंद्र, तंजावर (सरस्वती महाल ग्रंथालयातील अप्रकाशित हस्तलिखिते), डॉ. धनंजय होनमाने, कुंडल (तंजावरची मराठी कीर्तन परंपरा), डॉ. एम. बावानी, तंजावर (तमिळनाडूतील मराठा शिलालेख), डॉ. एस. कविथा, तंजावर (तमिळ साहित्याच्या विकासात मराठ्यांचे योगदान), डॉ. व्ही. सेल्वकुमार, तंजावर (तमिळनाडूमध्ये मराठ्यांचे आगमन आणि योगदान), डॉ. टी. कन्नन, तंजावर (मराठ्यांनी तयार केलेली ऐतिहासिक कागदपत्रे), श्री. मणिमारन, तंजावर (मराठा काळातील ताडपत्रावरील हस्तलिखिते), डॉ. अरुण शिंदे (मध्ययुगीन तंजावरी मराठी साहित्य), डॉ. प्रकाश दुकळे (तंजावरची स्वयंवर काव्ये), डॉ. अशोक शिंदे (आद्य नाटककार शाहाराजे भोसले), डॉ. तेजस चव्हाण, दिल्ली (तंजावरचे मराठी साहित्य), डॉ. सुभाष पाटील, सांगली (तंजावरचे आद्य वाङ्मयसेवक), डॉ. सुखदेव एकल, कोल्हापूर (तंजावर नाटकाचे लेखनतंत्र), डॉ. अशोक तवर, सातारा (तंजावरच्या कलाक्षेत्रातील प्रगती), डॉ. धोंडीराम दमामे, ईश्वरपूर (तंजोर चित्रकला शैली), प्रा. परसू गावडे, बेळगाव (तंजावरच्या नाटकातील प्रयोगशीलता), प्रा. प्रतीभा पाटणे, खंडाळा (तंजावरची संस्कृती), डॉ. तानाजी हवालदार, शिराळा (मराठा काळातील तंजावरमधील महसूल व्यवस्था), डॉ. सतीश चौगुले, वाळवा (तंजावरची मराठेकालीन प्रशासन व्यवस्था), डॉ. संतोष जेटीथोर (रेव्हरंड ख्रिश्चन फ्रेडरिक श्वार्ट्झ यांचे तंजावरमधील कार्य), डॉ. अवनीश पाटील (तंजावर मराठ्यांचा इतिहास), डॉ. संघमित्रा सरवदे (मराठा-तंजावर संबंध), डॉ. सुवर्णा पाटील (मराठी व तमिळ भाषेचा अनुबंध), डॉ. मनोहर कोळसेकर (तंजावरचे राजे सरफोजी द्वितिय), डॉ. ऊर्मिला क्षीरसागर (तंजावरचे राजे व नाट्यकला). याखेरीज, सहभागी संशोधक व शिक्षक सरस्वती महाल ग्रंथालयाला भेट देतील. तंजावरचे श्रीमंत आबाजीराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत २४ डिसेंबरला दुपारी ४ वाजता चर्चासत्राचा समारोप होईल.
No comments:
Post a Comment