Wednesday, 3 January 2018

अर्थसंकल्पात रोजगाराधित उत्पादक क्षेत्रास प्राधान्य हवे: डॉ. जे. एफ. पाटील


शिवाजी विद्यापीठात आयोजित कार्यशाळेचे उद्घाटन करताना ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. जे.एफ. पाटील. शेजारी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, सुरेंद्र जैन, डॉ. व्ही.बी. ककडे.



डॉ. जे.एफ. पाटील

कोल्हापूर, दि. ३ जानेवारी: देशाचा आर्थिक विकास हा रोजगार दरावर अवलंबून असतो. सद्य काळातील रोजगाराची स्थिती विचारात घेता आगामी 2018-19 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प हा उत्पादक अशा रोजगार निर्मिती क्षेत्रास प्राधान्य देणारा असावा, असे प्रतिपादन ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ व राज्य नियोजन आयोगाचे माजी सदस्य प्रा. डॉ. जे. एफ. पाटील यांनी आज केले. 

शिवाजी विद्यापीठाचे बँक ऑफ इंडिया चेअर इन रूरल बँकिंग आणि अर्थशास्त्र अधिविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने "अर्थसंकल्प पूर्व चर्चासत्र २०१८" या विषयावर आज एकदिवसीय कार्यशाळा झाली. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून डॉ. पाटील बोलत होते. कुलसचिव प्रा. विलास नांदवडेकर अध्यक्षस्थानी तर प्रमुख पाहुणे सुरेंद्र जैन होते. कार्यशाळेचे संयोजक डॉ. व्ही.बी. ककडे, समन्वयक डॉ. एम.एस. देशमुख, मानव्यशास्त्र अधिष्ठाता डॉ. भारती पाटील, विभाग प्रमुख प्रा. डॉ. पी. एस. कांबळे आदी उपस्थित होते.

यावेळी डॉ. पाटील म्हणाले, कल्याणकारी राज्याची निर्मिती करतानाच वित्तीय तुटीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आगामी अर्थसंकल्पात सरकारला मोठी कसरत करावी लागणार आहे. आगामी अर्थसंकल्पातून वित्तीय कल्याणकारी, न्यायिक कल्याणकारी व वितरण कल्याणकारी या घटकावरती अधिक लक्ष द्यावे. याशिवाय जीएसटी अंमलबजावणीनंतर प्रत्यक्ष करांमध्ये सुधारणा, स्वयं रोजगार व रोजंदारीवर काम करणार्‍या प्रत्येक नागरिकाला कर प्रणालीमध्ये समाविष्ट करण्याचे धोरण सरकारने अर्थसंकल्पातून स्वीकारावे, असेही पाटील यावेळी म्हणाले. 

अध्यक्षीय भाषणात कुलसचिव डॉ. नांदवडेकर यांनी शिक्षण व संशोधन क्षेत्रात सरकारने अधिकाधिक भर देण्याबरोबर शिक्षण क्षेत्र करमुक्त करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. 

अधिष्ठाता डॉ. भारती पाटील यांनी महिला सबलीकरण धोरणाच्या माध्यमातून अर्थव्यस्थेतील लिंग तफावत दूर करण्यासाठी सरकारने अर्थसंकल्पात त्याप्रकारची तरतूद करावी, असे संगितले. सुरेंद्र जैन यांनी जीएसटी व उद्योग क्षेत्र यांची तुलनात्मक मांडणी केली. मनीष झंवर यांनी कृषी विकासासाठी भागीदारी शेतीची आवश्यकता स्पष्ट केली. डॉ. ए. आर. पडोशी यांनी विकास आणि रोजगार यांचा परस्परसंबंध व त्यांची सर्वसमावेशक वृद्धीतील भूमिका स्पष्ट केली. महेश शिंदे यांनी कर संरचना, शाश्वत विकास यांचा आर्थिक दृष्टिकोनातून आढावा घेतला. 

डॉ. ककडे यांनी प्रास्ताविक केले. सहायक प्राध्यापक एस. पी. पंचगल्ले यांनी सूत्रसंचालन केले तर सहायक प्राध्यापक एस. टी. कोंबडे यांनी आभार मानले. कार्यशाळेस नागरिक, अर्थशास्त्र अभ्यासक, प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शांतता, सौहार्द प्रस्थापनेसाठी मूल्यशिक्षण आवश्यक: डॉ. विलास नांदवडेकर



मूल्यशिक्षण कार्यशाळेत बोलताना कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर. व्यासपीठावर (डावीकडून) डॉ. ए.एम. गुरव, डॉ. लेसन आझादी, डॉ. शशी गायकवाड.


Dr. A.M. Gurav

विद्यापीठात मूल्यशिक्षण कार्यशाळा उत्साहात

कोल्हापूर, दि. ३ जानेवारी: समाजात शांतता आणि सौहार्दाच्या प्रस्थापनेसाठी सार्वत्रिक स्तरावर मूल्यशिक्षणाची नितांत गरज आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाचे कौशल्य व उद्योजकता विकास केंद्र व बहाई अकादमी, पाचगणी यांच्या संयुक्त विद्यमाने संलग्नित महाविद्यालयांतील शिक्षकांसाठी मूल्यशिक्षणविषयक एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली. त्या कार्यशाळेचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र सभागृहात कार्यशाळा झाली. यावेळी बहाई अकादमीचे डॉ. लेसन आझादी व डॉ. शशी गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
कुलसचिव डॉ. नांदवडेकर यांनी आपल्या भाषणात सद्यस्थितीतील मूल्यशिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, महात्मा गांधी यांची मूल्यशिक्षणावर नितांत श्रद्धा होती. भारतीय समाजात मानवी मूल्यांच्या प्रस्थापनेसाठी ते आग्रही होते. आज प्रत्येकजण कोणत्याही मूल्यांपेक्षा पैसा या मूल्याच्या अधिक पाठी लागल्याचे दिसत आहे. पण, अखेरीस जीवनात शांती हवी असेल, तर नैतिकता आणि मानवी मूल्यांचेच स्थान सर्वोच्च आहे. हे मूल्यशिक्षण एका दिवसात निर्माण होणारी बाब नाही. शिक्षण व्यवस्थेत प्राथमिक स्तरापासून विद्यार्थ्यांमध्ये मूल्यांची रुजवात करण्यासाठी प्रयत्न आवश्यक आहे. मूल्याधिष्ठित शिक्षणातूनच मूल्याधिष्ठित समाजव्यवस्थेची निर्मिती करता येणे शक्य आहे.
केंद्राचे समन्वयक डॉ. ए.एम. गुरव म्हणाले, जीवनाला सकारात्मक दिशा देण्याचे काम मूल्ये करतात. जीवनाच्या विविध टप्प्यांवर मनुष्य विविध प्रकारच्या पर्यावरणातून वाटचाल करतो. हे सारे पर्यावरण त्याच्यातील मूल्यव्यवस्थेला आकार देण्याचे काम करते. नैतिक, सामाजिक, भौतिक, वैश्विक अशी वैविध्यपूर्ण मूल्ये मानवात सामाजिक जाण आणि भान निर्माण करतात. जीवनाचे स्वरुप पालटून टाकण्याचे काम मूल्ये करतात. जीवनात योग्य आणि समाजोपयोगी कामे करणे म्हणजेच मूल्ये होत. या मूल्यांच्या अंगिकारातूनच जीवनात आनंद व समाधानाची निर्मिती होत असते.
यावेळी डॉ. आझादी आणि डॉ. गायकवाड यांनी मूल्यशिक्षणाच्या संदर्भात बहाई अकादमी करीत असलेल्या कार्याविषयी उपस्थितांना अवगत केले. डॉ. एस.डी. कोरे यांनी आभार मानले.

विद्यापीठीय अभ्यासक्रमाची मूल्याधिष्ठित मांडणी गरजेची: डॉ.अजित थिटे




Dr. Ajit Thite

कोल्हापूर, दि. ३ जानेवारी: उच्चशिक्षणाच्या क्षेत्रातील विशेषतः विद्यापीठीय अभ्यासक्रमांची मूल्याधिष्ठित मांडणी करणे आवश्यक आहे. शिक्षणशास्त्रज्ञांनी त्या दृष्टीने उच्चशिक्षणाची धोऱणे विकसित करण्यास प्राधान्य देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन पुण्याच्या सेंटर फॅार डेव्हलपमेंट ऑफ लीडरशिप इन एज्युकेशनचे संचालक डॉ. अजित थिटे यांनी केले.

शिवाजी विद्यापीठाचा शिक्षणशास्त्र अधिविभाग, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (आयक्यूएसी) आणि बहाई अकादमी, पांचगणी यांच्या संयुक्त विद्यमाने इनकल्केटींग व्हॅल्यू सिस्टिम इन स्टुडंटस् पेडॉगॉजिकल प्रॅक्टीसेस इन हायर एज्युकेशन या विषयावर एकदिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा काल पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आयक्यूएसीचे संचालक डॉ. आर.के. कामत होते.

डॉ. थिटे म्हणाले, उच्चशिक्षणाच्या अभ्यासक्रमांमध्ये मूल्यवर्धन अत्यावश्यक आहे. येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मूल्यांबाबतची जाणीवजागृती आवश्यक आहे. कारण येथून पुढे देशाचे नागरिक म्हणून वावरताना त्या मूल्यव्यवस्थेचे रक्षण करण्याची जबाबदारी त्यांच्याच खांद्यावर असणार आहे. त्या दृष्टीने उच्चशिक्षण संस्थांनी आपले व्हीजन, मिशन आणि गोल यांमध्ये आमुलाग्र बदल करणे आणि त्यांमध्ये मूल्यांचा निर्देश करणे काळाची गरज आहे.

दुपारच्या सत्रामध्ये पाचगणीच्या बहाई अकादमीचे संचालक डॉ. लेसन आझादी यांनी मूल्यांवर आधारित अध्यापन, शास्त्रीय कार्यनिती स्पष्ट केल्या आणि त्या संदर्भात गट-कृती राबविल्या.

शिक्षणशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ. पी.एस. पाटणकर, डॉ. कामत, व डॉ. आझादी यांनी कार्यशाळेचे संयोजन केले. संचालक म्हणून डॉ. जी.एस. पाटील यांनी तर समन्वयक म्हणून  डॉ. चेतना सोनकांबळे व डॉ. व्ही.एस. खंडागळे यांनी काम पहिले. कार्यशाळेला महाविद्यालयीन तसेच विद्यापीठ अधिविभागातील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tuesday, 2 January 2018

मनुष्यकेंद्री विचारसरणी हा महर्षी शिंदे यांच्या कार्याचा गाभा: प्रा. पुष्पा भावे


शिवाजी विद्यापीठात 'महर्षी विठ्ठल रामजी शिंदे:  एक दर्शन- भाग २' या ग्रंथाचे प्रकाशन करताना भारती अभिमत विद्यापीठाचे (पुणे) कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे, प्रा. पुष्पा भावे. छायाचित्रात (डावीकडून) डॉ. राजन गवस, डॉ. एन.डी. पाटील, रमेश चव्हाण, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, सौ. सुजाता पवार, डॉ. गो.मा. पवार, अशोक शिंदे व डॉ. रणधीर शिंदे.
प्रा. पुष्पा भावे



महर्षी वि.रा. शिंदे: एक दर्शन- भाग २ ग्रंथाचे विद्यापीठात प्रकाशन

कोल्हापूर, दि. २ जानेवारी: मनुष्यकेंद्री विचारसरणी हा महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या कार्यपद्धतीचा गाभा आहे. आज आपण ज्या विघटित स्वरुपात राहतो आहोत, त्यावेळी महर्षींचे हे विचारच आपल्याला नवी वाट दाखवतील, असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व विचारवंत प्रा. पुष्पा भावे यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे अध्यासनातर्फे महर्षींच्या स्मृतिदिनानिमित्त रा.ना. चव्हाण लिखित महर्षी विठ्ठल रामजी शिंदे: एक दर्शन, भाग-२ या ग्रंथाचा प्रकाशन समारंभ आज सकाळी विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात झाला. त्यावेळी त्या बोलत होत्या. समारंभाच्या अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के होते, तर पुण्याच्या भारती अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
Prof. Pushpa Bhave
प्रा. पुष्पा भावे म्हणाल्या, महर्षी शिंदे यांचे कार्य आणि विचार आजच्या स्थितीत अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यांना देशामध्ये जे सामाजिक बदल अभिप्रेत होते, त्या दिशेने त्यांनी काम केले. ते आपल्या उद्दिष्टप्राप्तीच्या दिशेने कार्यरत राहिले. लोकांना एकत्र करून, चर्चा करून त्यांचे प्रश्न सोडविण्याची त्यांची भूमिका असे. अशा सुसंवादातून ते बदल घडवू पाहात होते. महर्षींची ही पद्धत आपण अंगिकारणे अत्यावश्यक आहे.
महर्षी शिंदे यांनी अन्य कोणत्याही बाबीपेक्षा नेहमी विवेकाचा आवाज ऐकण्यास प्राधान्य दिल्याचे सांगून प्रा. भावे म्हणाल्या, शिंदे यांचा प्रवास हा कोणत्याही विशिष्ट विचारसरणीनुसार अथवा धर्मानुसार नव्हे, तर त्यांनी स्वतः ठरविलेल्या तत्त्वांनुसार झाला. भाषाशास्त्रासह धर्मशास्त्राचा तौलनिक अभ्यास त्यांनी केला, तथापि, एक धर्म पद्धती त्यांना अमान्य होती. ब्राह्मो समाज, प्रार्थना समाज अथवा ख्रिस्ती धर्म या प्रत्येक धर्मामधील चांगली मूल्ये त्यांनी उचलली आणि ती राबविण्यावर भर दिला. त्या आधारे प्रत्येक चळवळीमध्ये सहभागी होऊन कार्य करण्याचा, बदल घडविण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला;, मात्र, त्यांचे स्थान आपल्याला इतिहासात निश्चित करता आले नाही, हे आपले दुर्दैव असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
महर्षी शिंदे हे महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यामधला दुवा असल्याचे सांगून प्रा. भावे म्हणाल्या, बाबासाहेबांच्या कार्यासाठी आवश्यक पार्श्वभूमी, पूर्वतयारी करण्याचे कार्य महर्षींनी केले. अस्पृश्यता निवारणाचे कार्य महाराष्ट्रासह देशभरात पसरविण्याचेकाम आंबेडकर यांच्यापूर्वी महर्षींनी केले. त्यानंतर ते शेतकऱ्यांच्या कार्याकडे वळले. अस्पृश्य, स्त्रिया, शेतकरी यांचे येणाऱ्या स्वातंत्र्यात नेमके स्थान कोणते व कसे असेल, याविषयी त्यांना चिंता होती. वाईसारख्या सनातनी ठिकाणाची आपल्या समाजसुधारणावादी चळवळीसाठी निवड करणे, यातून महर्षींची या कार्याबद्दलची कळकळ आणि निष्ठाच दिसून येते. त्याचप्रमाणे समाज सुधारणेचे कार्य करीत असताना आपल्या समकालीनांबरोबर विवेकी वादविवाद करायलाही त्यांनी मागेपुढे पाहिले नाही, असेही त्या म्हणाल्या.
यावेळी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे म्हणाले, महर्षी शिंदे हे काळाच्या पुढे पाहणारे द्रष्टे विचारवंत होते. विचारांची स्पष्टता, निर्मळ सहृदयता या गुणांसह मानवी मूल्यांच्या प्रस्थापनेसाठी त्यांनी कार्य केले. त्यांच्याविषयीच्या ग्रंथातून समाज इतिहासाचा एक आदर्श वस्तुपाठ प्रदर्शित झाला आहे. आज जगभरात नैतिक, भौतिक मूल्यांचा ऱ्हास होत असताना त्यातून मूल्यव्यवस्था प्रस्थापनेच्या दृष्टीने महर्षी शिंदे यांच्यावरील हा ग्रंथ पथदर्शक ठरेल.
Dr. D.T. Shirke
अध्यक्षीय भाषणात प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के म्हणाले, पुष्पाताईंनी आपल्या व्याख्यानातून महर्षी शिंदे अध्यासनाच्या कार्याला अत्यंत दिशादर्शक असे मार्गदर्शन केले आहे. अध्यासनाच्या वतीने पुढील वर्षभर महर्षींचे विचार व कार्य याविषयी विविध उपक्रमांचे नियोजन करण्यात यावे, त्याचप्रमाणे त्यांच्या ७५व्या स्मृतिदिनी वाईमध्येही एखादे चिंतन शिबीर आयोजित करण्याबाबत विचार करावा, असे आवाहन त्यांनी या प्रसंगी केले.
यावेळी डॉ. गो.मा. पवार यांच्यासह ग्रंथाचे संपादक रमेश चव्हाण, महर्षींचे नातू निवृत्त एअर कमोडोर अशोक शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांच्या हस्ते ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले.
मराठी अधिविभाग प्रमुख डॉ. राजन गवस यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. अध्यासनाचे समन्वयक डॉ. रणधीर शिंदे यांनी परिचय करून दिला, तर डॉ. नंदकुमार मोरे यांनी आभार मानले.
कार्यक्रमास कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, ज्येष्ठ नेते डॉ. एन.डी. पाटील, प्राचार्य डॉ. अभयकुमार साळुंखे, महर्षी शिंदे यांच्या नात सौ. सुजाता पवार, पणतू राहुल पवार, आनंद भावे, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, डॉ. अशोक चौसाळकर, डॉ. जे.एफ. पाटील, डॉ. व्यंकाप्पा भोसले, डॉ. अरुण शिंदे, रमेश शिपूरकर, डॉ. टी.एस. पाटील, रमेश कोलवालकर यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.