Wednesday, 6 December 2023

बाबासाहेबांकडून सर्व समाजघटकांच्या उन्नतीचे कार्य: डॉ. श्रीकृष्ण महाजन

 

शिवाजी विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेत बोलताना अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन. मंचावर (डावीकडून) डॉ. नंदकुमार मोरे व डॉ. विवेक धुपदाळे.


कोल्हापूर, दि. डिसेंबर - डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य मानवी समाजाला दिशादर्शक आहे. ज्ञानाच्या आधारावर डॉ.आंबेडकरांनी केलेले कार्य संशोधनाच्या माध्यमातून पुढे येणे आवश्यक आहे. सर्वच समाजघटकांच्या उन्नतीसाठी बाबासाहेबांकडून झालेले कार्य नेत्रदीपक आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाच्या वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र सभागृहात विधी अधिविभागामार्फत आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेमध्ये डॉ.महाजन प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. मराठी अधिविभागाचे विभागप्रमुख डॉ.नंदकुमार मोरे अध्यक्षस्थानी उपस्थित होते.

डॉ.महाजन म्हणाले, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे वाचन आणि लेखन अव्याहतपणे चालू होते. त्यामधून प्राप्त झालेले ज्ञान हे त्यांनी संपूर्ण मानवी समाजाच्या कल्याणासाठी प्रगतीसाठी वापरले. त्यासाठी त्यांना अनेक हालअपेष्टा सोसाव्या लागल्या. बाबासाहेबांचे वडील रामजी आंबेडकर भारतीय ब्रिटीश सैन्यात सुभेदार पदावर कार्यरत होते. बाबासाहेबांमध्ये ज्ञानाच्या आस निर्माण करण्याचे काम वडील रामजी यांनी केले. अत्यंत गरीब परिस्थिती असतानाही त्यांनी मुलांना शिकण्यासाठी पुस्तके खरेदी करून दिली आणि शिक्षणासाठी प्रोत्साहित केले, हे फार महत्त्वाचे आहे. अथक परिश्रमाने आपल्या कुशाग्र बुध्दीमत्तेच्या जोरावर अस्पृश्य समाजामधून दहावी उत्तीर्ण होणारे बाबासाहेब पहिले विद्यार्थी होते. मुंबईमध्ये त्यांच्या अभिनंदनाची सभा घेण्यात आली होती.  त्यावेळी गुरूवर्य कृष्णाजी अर्जुन केळुस्कर यांनी स्वत: लिहिले भगवान बुद्धाचे चरित्र बाबासाहेबांना भेट दिले. त्यांच्या विचारांची प्रगल्भता वाढविण्याचे काम पुस्तकाने केले. 

डॉ. आंबेडकर यांनी लिहीलेले शोधप्रबंध आजही मार्गदर्शक असल्याचे सांगून डॉ. महाजन म्हणाले, प्राचीन भारतीय व्यापारावर आजपर्यंत कोणीही लिखाण केले नाही. ते डॉ. आंबेडकरांनी विद्यार्थीदशेत केले. ते आजही मार्गदर्शक ठरत आहे. भारतीय शेतीच्या संदर्भात त्यांचे लिखाण फार महत्त्वाचे आहे. त्यांचे मार्गदर्शन घेण्यासाठी त्यांच्या वर्गात इतर महाविद्यालयांचे विद्यार्थी उपस्थित असत. माणगांवच्या परिषदेमध्ये कोल्हापूर संस्थानचे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी डॉ.आंबेडकर हे देशाचे नेते होतील असे भाकीत केले होते. माणगाव आणि नागपूरच्या बहिष्कृतांच्या राष्ट्रीय परिषदेमुळे त्यांचे तिहासिक नेतृत्व ज्ञानाच्या आधारावर पुढे उदयास आले. शोषि आणि वंचित घटकांना त्यांचे सामाजिक न्यायाचे हक्क मिळाले पाहिजेत, यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. अस्पृश्यतेच्या विरूद्ध जागृती करण्याचे महत्वपूर्ण काम त्यांनी केले. परिणामी अस्पृश्यता पाळणाऱ्या समाजातील लोकही त्यांच्याढ्यात सहभागी झाले, हे त्यांच्या आंदोलनाचे फार मोठे यश होते. आयुष्यभर शोषितांच्या अस्तित्वासाठीची लढाई डॉ.आंबेडकरांनी निकराने लढली.  शेतकऱ्यांचा सर्वात मोठा संप झाला, तो बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली. कोकणातील सर्व शेतकरी त्या सहभागी झाले.

संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या जागतिक मानवी मुल्यांवर आधारित लोकशाहीची त्रिमिती या देशाला अर्पण केली. डॉ.आंबेडकर यांच्या कार्यतून मानवी जीवनाच्या प्रत्येक अंगाला त्यांनी स्पर्श केल्याचे दिसून येते, असेही डॉ. महाजन म्हणाले.

अध्यक्षीय मनोगतामध्ये मराठी अधिविभागाचे प्रमुख डॉ.नंदकुमार मोरे म्हणाले, डॉ.आंबेडकरांचे चरित्र वाचल्यावर आज समाजा शिकलेले लोक काय करतात, असा गंभीर प्रश्न आपणांस पडतो.  डॉ.आंबेडकरांचे चरीत्र विद्यार्थ्यांसह आपणा सर्वांसाठी खूप मार्गदर्शक आहे. सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक, धार्मिक क्षेत्रामध्ये दिलेल्या योगदानामुळे डॉ.आंबेडकर पुढील हजारो वर्षे आपल्यामध्ये ज्ञानाच्या स्वरूपात अजरामर राहणार आहेत. 

विधी अधिविभागप्रमुख डॉ.विवेक धुपदाळे यांनी स्वागत व परिचय करून दिला. राकेश शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. माजी प्राचार्य डॉ.आर नारायणा यांनी आभार मानले. यावेळी डॉ.शोभा शेट्टी, डॉ. दीपा श्रावस्ती, डॉ.अनमोल कोठाडिया, डॉ.प्रकाश कांबळे, डॉ. अरूण शिंदे,  डॉ. बी.आर. इंगवले, डॉ. श्रीपा गायकवाड यांच्यासह विधी शाखेचे विद्यार्थी, प्रशासकीय सेवक, शिक्षक उपस्थित होते.

शिवाजी विद्यापीठाच्या ६०व्या दीक्षान्त समारंभाचे

डॉ. एस.एस. मंथा प्रमुख पाहुणे; राज्यपाल रमेश बैस अध्यक्ष

 

डॉ. एस. एस. मंथा


कोल्हापूर, दि. ६ डिसेंबर: शिवाजी विद्यापीठाचा ६० वा दीक्षान्त समारंभ येत्या १८ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला असून या समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून ऑल इंडिया कौन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन (ए.आय.सी.टी.ई.) या राष्ट्रीय नियामक संस्थेचे माजी चेअरमन डॉ. एस.एस. मंथा उपस्थित राहणार आहेत. समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे राज्यपाल तथा कुलपती डॉ. रमेश बैस उपस्थित राहणार असून उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील हे प्रमुख अतिथी असतील. ही माहिती कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी आज येथे दिली.

डॉ. शंकर एस. मंथा यांनी त्यांच्या सुमारे ४० वर्षांच्या कारकीर्दीत शैक्षणिक व नागरी प्रशासन क्षेत्रातील अनेक सन्मानाची पदे भूषविली आहेत. त्यांनी मुंबईच्या व्ही.जे.टी.आय. संस्थेमध्ये रोबोटिक्स, कृत्रिम बुद्धिमत्ता व कंट्रोल थिअरी या विषयांचे प्राध्यापक म्हणून काम केले आहे. त्याखेरीज, आय.बी.एम., पॉकिप्सी (न्यूयॉर्क) या अमेरिकन कंपन्यांमध्येही त्यांनी उल्लेखनीय काम केले आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संशोधन पत्रिकांतून त्यांचे २८०हून अधिक शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. अनेक परिषदांत त्यांनी आपले शोधनिबंध सादर केले आहेत, बीजभाषणे दिली आहेत. तीन पुस्तकेही त्यांनी लिहीली आहेत. नॅशनल स्कील क्वालिफिकेशन फ्रेमवर्क (एनएसक्यूएफ) आणि ब्लेंडेड लर्निंग नियमावलीचे ते उद्गाते आहेत. कर्नाटक स्कील डेव्हलपमेंट ऑथोरिटीचे ते सदस्य आहेत आणि आंध्र प्रदेश सरकारचे सल्लागारही आहेत.

एसएनडीटी महिला विद्यापीठाचे प्र-कुलगुरू आणि के.एल. विद्यापीठाचे कुलपती म्हणून त्यांनी काम केले आहे. सध्या ते महाप्रीत स्टार्टअप नॉलेज सेंटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एडव्हान्स्ड स्टडीज्, बेंगलोर या संस्थेत अॅडजंक्ट प्राध्यापक, नॅशनल सायबर सेफ्टी अँड सिक्युरिटी स्टॅंडर्ड्स (एनसीएसएसएस) संस्थेच्या तांत्रिक समितीचे चेअरमन आणि महाराष्ट्र शासनासाठी माहिती तंत्रज्ञान तज्ज्ञ म्हणून काम पाहात आहेत.

दरम्यान, या दीक्षान्त समारंभात प्रदान करण्यात येणाऱ्या पदवी प्रमाणपत्रांची संख्या ही ४९,४३८ इतकी आहे. पदवी ग्रहण करणाऱ्या स्नातकांत मुलींची संख्या २७,४७५ इतकी लक्षणीय आहे.

Friday, 1 December 2023

शिवाजी विद्यापीठात साकारणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे कुस्ती संकुल

गोव्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले भूमीपूजन

शिवाजी विद्यापीठाच्या कुस्ती संकुलाचे भूमीपूजन करताना गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत. सोबत महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांच्यासह मान्यवर.
 
शिवाजी विद्यापीठाच्या कुस्ती संकुलाच्या कोनशिलेचे अनावरण करताना गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील. सोबत कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांच्यासह मान्यवर.


कोल्हापूर, दि. डिसेंबरशिवाजी विद्यापीठा उभारण्यात येणाऱ्या कुस्ती संकुल इमारतीचे भूमीपूजन आज गोव्याचे मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांच्या हस्ते आणि महाराष्ट्राचे उच्च तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा समारंभ झाला.

शिवाजी विद्यापीठाच्या क्रीडा अधिविभागाजवळील एन.सी.सी. भवनच्या मागील बाजूस आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कुस्ती संकुलाची भव्य इमारत उभी राहणार आहे. पहिल्या टप्प्यात या इमारतीचे ८७७.८५ चौरस मीटर इतक्या क्षेत्रफळाचे बांधकाम करण्यात येणार आहे. या संकुला आंतरराष्ट्रीय दर्जाचे दोन मॅट बसविण्यात येणार आहे. या संकुलाचे भूमीपूजन व कोनशिला अनावरण मुख्यमंत्री डॉ. सावंत आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. पाटील यांच्या उपस्थितीत आज करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी संकुलाचा आराखडा पाहून समाधान व्यक्त केले, तसेच संकुल उभारणीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी कुलसचिव डॉ.विलास शिंदे, परीक्षा मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.अजितसिंह जाधव, वित्त लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, अधिष्ठाता डॉ.श्रीकृष्ण महाजन, डॉ.महादेव देशमुख, क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ.प्रकाश गायकवाड, ज्ञानस्रो केंद्राचे संचालक डॉ.धनंजय सुतार, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ.तानाजी चौगुले, डॉ.गिरीष कुलकर्णी, उपकुलसचिव रणजीत यादव, डॉ. वैभव ढेरे यांच्यासह व्यवस्थापन परिषद, अधिसभा, विद्या परिषद आदी विविध अधिकार मंडळाचे सन्माननीय सदस्य उपस्थित होते.

-----

युवा पिढीच नवा भारत घडवेल: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

शिवाजी विद्यापीठात उलगडले स्वयंपूर्ण गोव्याचे गमक

शिवाजी विद्यापीठात आयोजित 'आत्मनिर्भर भारत आणि युवकांचे योगदान' या विषयावरील विशेष व्याख्यानात बोलताना गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत.

शिवाजी विद्यापीठात आयोजित 'आत्मनिर्भर भारत आणि युवकांचे योगदान' या विषयावरील विशेष व्याख्यानात बोलताना गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत. समोर उपस्थितांमध्ये महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांच्यासह श्रोतृवृंद.


शिवाजी विद्यापीठात आयोजित विशेष व्याख्यानप्रसंगी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. मंचावर (डावीकडून) प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील व कुलसचिव डॉ. विलास शिंदे.

शिवाजी विद्यापीठात आयोजित विशेष व्याख्यानप्रसंगी मनोगत व्यक्त करताना प्रमुख पाहुणे व राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील.



कोल्हापूर, दि. १ डिसेंबर: आगामी २५ वर्षांत सर्वच क्षेत्रांत भरीव योगदान देऊन युवा पिढीच नवा भारत घडवेल. त्या दृष्टीने आत्मनिर्भर भारत ही संकल्पना ऊर्जास्रोत म्हणून काम करेल, असा विश्वास गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज येथे व्यक्त केला.

शिवाजी विद्यापीठात आज मुख्यमंत्री डॉ. सावंत यांचे आत्मनिर्भर भारत आणि युवकांचे योगदान या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित केले होते. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, तर अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते.

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सुरवातीलाच शिवाजी विद्यापीठाचा सन १९९१ ते १९९६ या कालावधीतील माजी विद्यार्थी असल्याचा आपल्याला अभिमान असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे आज या विशेष व्याख्यानासाठी विद्यापीठाने आमंत्रित केले, हाही आपल्या आयुष्यातील भाग्याचा क्षण असल्याचे सांगितले. यानंतर आपल्या भाषणात त्यांनी गोव्याचे मुख्यमंत्री या नात्याने आपल्या राज्यात आत्मनिर्भर योजनेच्या अनुषंगाने स्वयंपूर्ण गोवा ही योजना यशस्वीपणे राबविण्यासाठी केलेल्या परिश्रमांची माहिती दिली. ते म्हणाले, केंद्र सरकारने जाहीर केलेल्या आत्मनिर्भर भारत योजनेने सर्व घटकांना प्रेरणा देण्याचे काम केले. गोवा हे कृषी व कृषीपूरक उत्पादने, फुले, फळे, दूध व दुग्धजन्य पदार्थ, चिकन, अंडी इत्यादींसह अनेक बाबतीत परावलंबी होते. त्यामुळे गोव्यास सर्वंकष पद्धतीने स्वयंपूर्ण बनविण्याचे ठरविले. त्यानुसार सर्वप्रथम राज्यातील साधनसंपत्तीच्या उपलब्धतेची तसेच आयात-निर्यातीची, सामाजिक-आर्थिक परिस्थितीची ताजी माहिती संकलित केली. ही माहिती घेतल्यानंतरच २ ऑक्टोबर २०२० रोजी स्वयंपूर्ण गोवा या योजनेचे उद्घाटन केले. राज्यातील प्रत्येक कुटुंबाला वीज, पाणी, शौचालय आदी सुविधांची उपलब्धता करण्याबरोबरच दिव्यांगांसह सर्व नागरिकांना सामाजिक सुरक्षा, आरोग्यसुविधा, कृषीसंपदा संवर्धनासाठी साधनसुविधा अशा बाबींवर काम करण्यास सुरवात केली. त्यासाठी स्वयंपूर्ण मित्र ही संकल्पना राबविली. राज्यात कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांना त्यांच्या त्यांच्या गावच्या कल्याणाची जबाबदारी सोपविण्यात आली आणि दर आठवड्याच्या अखेरच्या दोन दिवशी तेथे प्रबोधनाचे व आवश्यक सुविधा उपलब्धतेची जबाबदारी सोपविली. या सर्व प्रक्रिया मुख्यमंत्री कार्यालयाच्या निगराणीखाली सुरू होत्या. त्यामुळे राज्यातील प्रत्येक घरी पाणी, वीज आणि शौचालय पोहोचले. दुर्गम भागात सौरउर्जेद्वारे वीज दिली. त्याखेरीज प्रत्येक व्यक्तीस हेल्थ कार्ड, इन्शुरन्स कार्ड, किसान कार्ड, गॅस हमी अशा योजनाही यशस्वीपणे नागरिकांपर्यंत पोहोचविल्या. अंत्योदय तत्त्वावर राबविलेल्या या योजनांमुळे राज्य दूध, दुग्धजन्य पदार्थ, फलोत्पादन, फुलोत्पादन या क्षेत्रांत स्वयंपूर्ण तर झालेच, पण अन्य राज्यांतही निर्यात करू लागले. या योजना राबवित असताना शाश्वत विकासाचे लक्ष्य साध्य करण्याकडेही लक्ष पुरविण्यात आले.

स्वयंपूर्ण गोवा या मोहिमेमध्ये युवा पिढीचे योगदान मिळविण्यासाठी आणि त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचीही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी माहिती दिली. ते म्हणाले, कौशल्य विकास योजनेच्या माध्यमातून युवक-युवतींना स्कीलींग-रिस्कीलींग-अपस्कीलींग या पद्धतीने कौशल्य प्रशिक्षण देण्यावर भर दिला. कार्यानुभव आणि रोजगाराची संधी यांच्या माध्यमातून दहावी ते पदवी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दरमहा आठ हजार ते पंधरा हजार रुपयांदरम्यान काही ना काही मानधन मिळत राहील, याची व्यवस्था केली. गावागावांतून विविध प्रकारची उत्पादने, हस्तकला सामग्री, सॅनिटरी पॅड बनविणे, सुतारकाम आदी अनेक पद्धतीने उत्पादनवाढीला प्रोत्साहन दिले. या उत्पादनांना केवळ राज्यातीलच नव्हे, तर बाहेरील बाजारही उपलब्ध व्हावेत, म्हणून ई-बाझार पोर्टल निर्माण केले. त्याद्वारे गोवन उत्पादने देशभर जाऊ लागली. त्याखेरीज मुख्यमंत्री म्हणून मी हॅलो गोंयकार या कार्यक्रमाद्वारे नागरिकांशी दर शुक्रवारी संध्याकाळी ७ ते ८ या वेळेत दूरदर्शनवरुन थेट संवाद साधतो. त्यामध्ये दहा ते बारा नागरिकांचे प्रश्न स्वीकारतो आणि पुढील कार्यक्रमात त्यांचे निरसन केल्याचेही सांगतो. त्याखेरीज प्रत्येक मंत्र्यानेही दर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी आपापल्या विभागाविषयी लोकांशी संवाद साधून त्यांना विविध योजनांची माहिती देण्याबरोबरच त्यांच्या समस्या सोडविण्याच्या दृष्टीनेही प्रयत्न करण्यात येतात. गोव्याच्या या उपक्रमांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये प्रशंसा केली. निती आयोगानेही स्वयंपूर्ण गोवा उपक्रमाविषयी गौरवोद्गार काढले. विविध राज्यांच्या शिष्टमंडळांनी भेट देऊन पाहणी केली. एकूणच, सुशासन, आर्थिक वृद्धी, वित्तीय समावेशन, सामाजिक सुरक्षा, समाधानाचा निर्देशांक, पायाभूत सुविधा विकास आणि पर्यावरण संवर्धन या सर्वच निकषांवर गोवा राज्य देशात अव्वल कामगिरी करीत आहे.

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी मनोहर पर्रीकर यांची उणीव भरून काढल्याचे गौरवोद्गार काढून महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, गोवा हे ४५० गावांचे राज्य आहे, तेथे योजना राबविणे आणि त्यांची यशस्वी अंमलबजावणी करणे तुलनेत सोपे आहे. मात्र, महाराष्ट्रासारख्या हजारो खेडी व साडेबारा कोटी लोकसंख्या असलेल्या राज्यामध्ये योजना खालपर्यंत झिरपत नेणे जिकीरीचे आहे. तथापि, राज्यात राबविलेल्या जलयुक्त शिवार, ३३ कोटी वृक्षलागवड, शेतकरी विमा योजना, स्टँड अप इंडिया, स्टार्टअप इंडिया आदी योजनांनी निश्चितपणे सकारात्मक परिणाम दर्शविला आहे. शिक्षणाच्या संदर्भात बोलावयाचे झाल्यास संरक्षणविषयक संशोधन व उत्पादन निर्मितीला दिलेल्या प्रोत्साहनामुळे देशात एक लाख कोटी रुपयांची उत्पादने निर्माण करण्यात आली. त्यापैकी १५ हजार कोटींची निर्यात आपण करू शकलो. यामुळे आर्थिक बचतीबरोबरच संरक्षण क्षेत्रातील संशोधनाविषयी गोपनीयताही सांभाळता आली. इथॅनॉल निर्मितीला दिलेल्या प्रोत्साहनामुळे व २० टक्के इंधनात मिसळण्यास दिलेल्या परवानगीमुळे आपली कच्च्या तेलाची आयात ८ लाख कोटींवरुन सहा लाख कोटींवर आली. दोन लाख कोटींची बचत झाली. अशा पद्धतीने काम झाल्यास सन २०३० पर्यंत देशाला एक थेंबही कच्चे तेल आयात करण्याची गरज उरणार नाही, असा दावा त्यांनी केला.

नव्या शैक्षणिक धोरणामुळे स्थानिक उद्योग-व्यवसायांच्या गरजेनुरुप शिक्षण व संशोधनाला प्रोत्साहन मिळेल, असे सांगून मंत्री श्री. पाटील म्हणाले, नवसंशोधन, पेटंट आणि त्यावरील रॉयल्टी असा संशोधनाचा प्रवास व्हावा, जेणे करून देशांतर्गत दर्जेदार उत्पादने निर्माण होतील व देशाचा दबदबा सर्वदूर पसरेल. सध्या राज्यातील २०० महाविद्यालये आणि ४२ विद्यापीठे स्वायत्त आहेत. समूह विद्यापीठांच्या स्थापनेकडेही कल वाढतो आहे. मातृभाषेतून शिक्षणामुळे घोकंपट्टीच्या पलिकडे विषयाचे आकलन विद्यार्थ्यांना होऊ लागले आहे. या साऱ्याच बाबी देशाच्या आत्मनिर्भरतेला चालना देणाऱ्या आहेत.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे भाषण हे अभ्यासपूर्ण व्याख्यानाचा एक अस्सल नमुना असल्याचे सांगून अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के म्हणाले, मूळचे डॉक्टर असलेल्या मुख्यमंत्र्यांनी राज्याची नाडी तपासून दिलेली योग्य मात्रा गोव्याला लागू पडली. त्यांच्या व्याख्यानातून त्यांनी गोव्यामध्ये अत्यंत शास्त्रीय पद्धतीने योजना राबविल्याचे दिसते. आधी योग्य सर्वेक्षणाद्वारे माहिती संकलन, त्यानंतर सर्वंकष विश्लेषण, योजनेची योग्य अंमलबजावणी आणि निरीक्षण अशा पद्धतीने आत्मनिर्भर भारत योजना राबविल्यानेच ती यशस्वी होऊ शकली. त्यामुळेच पर्यटनापलिकडे गोवा राज्याच्या स्वयंपूर्णतेचा आदर्श देशभरात निर्माण होऊ शकला, असे कौतुकोद्गारही त्यांनी काढले.

सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते रोपास पाणी वाहून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. संगीत व नाट्यशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठ गीत व राष्ट्रगीत सादर केले. नंदिनी पाटील यांनी सूत्रसंचालन केले, तर कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी आभार मानले. यावेळी परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी जाधव, अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, डॉ. महादेव देशमुख, डॉ. सरिता ठकार यांच्यासह व्यवस्थापन परिषद, अधिसभा व विद्यापरिषदेचे सन्माननीय सदस्य, विविध मंडळांचे संचालक, अधिविभागांचे प्रमुख, शिक्षक, अधिकारी व कर्मचारी तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.