Wednesday, 6 December 2023

बाबासाहेबांकडून सर्व समाजघटकांच्या उन्नतीचे कार्य: डॉ. श्रीकृष्ण महाजन

 

शिवाजी विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेत बोलताना अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन. मंचावर (डावीकडून) डॉ. नंदकुमार मोरे व डॉ. विवेक धुपदाळे.


कोल्हापूर, दि. डिसेंबर - डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य मानवी समाजाला दिशादर्शक आहे. ज्ञानाच्या आधारावर डॉ.आंबेडकरांनी केलेले कार्य संशोधनाच्या माध्यमातून पुढे येणे आवश्यक आहे. सर्वच समाजघटकांच्या उन्नतीसाठी बाबासाहेबांकडून झालेले कार्य नेत्रदीपक आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाच्या वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र सभागृहात विधी अधिविभागामार्फत आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेमध्ये डॉ.महाजन प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. मराठी अधिविभागाचे विभागप्रमुख डॉ.नंदकुमार मोरे अध्यक्षस्थानी उपस्थित होते.

डॉ.महाजन म्हणाले, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे वाचन आणि लेखन अव्याहतपणे चालू होते. त्यामधून प्राप्त झालेले ज्ञान हे त्यांनी संपूर्ण मानवी समाजाच्या कल्याणासाठी प्रगतीसाठी वापरले. त्यासाठी त्यांना अनेक हालअपेष्टा सोसाव्या लागल्या. बाबासाहेबांचे वडील रामजी आंबेडकर भारतीय ब्रिटीश सैन्यात सुभेदार पदावर कार्यरत होते. बाबासाहेबांमध्ये ज्ञानाच्या आस निर्माण करण्याचे काम वडील रामजी यांनी केले. अत्यंत गरीब परिस्थिती असतानाही त्यांनी मुलांना शिकण्यासाठी पुस्तके खरेदी करून दिली आणि शिक्षणासाठी प्रोत्साहित केले, हे फार महत्त्वाचे आहे. अथक परिश्रमाने आपल्या कुशाग्र बुध्दीमत्तेच्या जोरावर अस्पृश्य समाजामधून दहावी उत्तीर्ण होणारे बाबासाहेब पहिले विद्यार्थी होते. मुंबईमध्ये त्यांच्या अभिनंदनाची सभा घेण्यात आली होती.  त्यावेळी गुरूवर्य कृष्णाजी अर्जुन केळुस्कर यांनी स्वत: लिहिले भगवान बुद्धाचे चरित्र बाबासाहेबांना भेट दिले. त्यांच्या विचारांची प्रगल्भता वाढविण्याचे काम पुस्तकाने केले. 

डॉ. आंबेडकर यांनी लिहीलेले शोधप्रबंध आजही मार्गदर्शक असल्याचे सांगून डॉ. महाजन म्हणाले, प्राचीन भारतीय व्यापारावर आजपर्यंत कोणीही लिखाण केले नाही. ते डॉ. आंबेडकरांनी विद्यार्थीदशेत केले. ते आजही मार्गदर्शक ठरत आहे. भारतीय शेतीच्या संदर्भात त्यांचे लिखाण फार महत्त्वाचे आहे. त्यांचे मार्गदर्शन घेण्यासाठी त्यांच्या वर्गात इतर महाविद्यालयांचे विद्यार्थी उपस्थित असत. माणगांवच्या परिषदेमध्ये कोल्हापूर संस्थानचे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी डॉ.आंबेडकर हे देशाचे नेते होतील असे भाकीत केले होते. माणगाव आणि नागपूरच्या बहिष्कृतांच्या राष्ट्रीय परिषदेमुळे त्यांचे तिहासिक नेतृत्व ज्ञानाच्या आधारावर पुढे उदयास आले. शोषि आणि वंचित घटकांना त्यांचे सामाजिक न्यायाचे हक्क मिळाले पाहिजेत, यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. अस्पृश्यतेच्या विरूद्ध जागृती करण्याचे महत्वपूर्ण काम त्यांनी केले. परिणामी अस्पृश्यता पाळणाऱ्या समाजातील लोकही त्यांच्याढ्यात सहभागी झाले, हे त्यांच्या आंदोलनाचे फार मोठे यश होते. आयुष्यभर शोषितांच्या अस्तित्वासाठीची लढाई डॉ.आंबेडकरांनी निकराने लढली.  शेतकऱ्यांचा सर्वात मोठा संप झाला, तो बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली. कोकणातील सर्व शेतकरी त्या सहभागी झाले.

संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या जागतिक मानवी मुल्यांवर आधारित लोकशाहीची त्रिमिती या देशाला अर्पण केली. डॉ.आंबेडकर यांच्या कार्यतून मानवी जीवनाच्या प्रत्येक अंगाला त्यांनी स्पर्श केल्याचे दिसून येते, असेही डॉ. महाजन म्हणाले.

अध्यक्षीय मनोगतामध्ये मराठी अधिविभागाचे प्रमुख डॉ.नंदकुमार मोरे म्हणाले, डॉ.आंबेडकरांचे चरित्र वाचल्यावर आज समाजा शिकलेले लोक काय करतात, असा गंभीर प्रश्न आपणांस पडतो.  डॉ.आंबेडकरांचे चरीत्र विद्यार्थ्यांसह आपणा सर्वांसाठी खूप मार्गदर्शक आहे. सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक, धार्मिक क्षेत्रामध्ये दिलेल्या योगदानामुळे डॉ.आंबेडकर पुढील हजारो वर्षे आपल्यामध्ये ज्ञानाच्या स्वरूपात अजरामर राहणार आहेत. 

विधी अधिविभागप्रमुख डॉ.विवेक धुपदाळे यांनी स्वागत व परिचय करून दिला. राकेश शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. माजी प्राचार्य डॉ.आर नारायणा यांनी आभार मानले. यावेळी डॉ.शोभा शेट्टी, डॉ. दीपा श्रावस्ती, डॉ.अनमोल कोठाडिया, डॉ.प्रकाश कांबळे, डॉ. अरूण शिंदे,  डॉ. बी.आर. इंगवले, डॉ. श्रीपा गायकवाड यांच्यासह विधी शाखेचे विद्यार्थी, प्रशासकीय सेवक, शिक्षक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment