Sunday 17 December 2023

विद्यापीठाच्या ग्रंथ महोत्सवाला वाचकांचा प्रतिसाद

 वाचकाला त्याचेच पुस्तक मिळाले आठ वर्षांनी परत

ग्रंथ महोत्सवात पुस्तक पाहण्यात गुंग झालेले वाचक


कोल्हापूर, दि. १७ डिसेंबर: शिवाजी विद्यापीठाच्या ६० व्या दीक्षान्त समारंभाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय ग्रंथ महोत्सवाला वाचकांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. उद्या, दीक्षान्त समारंभादिवशी विद्यार्थी तसेच महाविद्यालयांचा पुस्तक खरेदीला अधिक प्रतिसाद लाभेल, अशी अपेक्षा सहभागी प्रकाशकांनी व्यक्त केली. एका वाचकाला त्याचेच पुस्तक आठ वर्षांनी परत मिळाल्याची दुर्मिळ घटनाही या महोत्सवात घडून आली.

विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभानिमित्त ग्रंथमहोत्सव आयोजित करण्याची परंपरा जोपासण्यात आली आहे. त्यामध्ये राज्यभरातून दर्जेदार प्रकाशक आणि विक्रेते सहभागी होतात. यंदा हा महोत्सव तीन दिवसांचा आयोजित केला आहे. त्यामध्ये एकूण २२ प्रकाशक व ग्रंथविक्रेते सहभागी झाले आहेत. आज रविवार, सुटीचा दिवस असल्याने तुलनेत गर्दी कमी असली तरी चोखंदळ वाचकांनी त्याचा लाभ घेत कुटुंबियांसह ग्रंथमहोत्सवाला भेट दिली आणि पुस्तकखरेदी केली. विद्यापीठातील अधिविभागांचे शिक्षक, विद्यार्थी आणि प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी यांनीही महोत्सवाला भेट देऊन पुस्तक खरेदी केली.

महोत्सवात सहभागी झालेल्या भाग्यश्री प्रकाशनाच्या भाग्यश्री कासोटे म्हणाल्या की, सुटीचा दिवस असल्याने आज चोखंदळ वाचकांनी आपल्या कुटुंबियांसह प्रदर्शनाला भेट देऊन पुस्तक खरेदी केली. उद्या दीक्षान्त समारंभाच्या दिवशी हजारो विद्यार्थी, त्यांचे पालक, शिक्षक, महाविद्यालयीन कर्मचारी, ग्रंथपाल आदी मंडळी विद्यापीठात येणार असल्याने पुस्तकविक्रीस चांगला प्रतिसाद लाभेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

व्हॅलेंटाईन गिफ्ट आठ वर्षांनी मिळाले परत

डॉ. नितीन रणदिवे यांना त्यांचेच पुस्तक पुन्हा भेट देताना यशवंत बुक स्टॉलचे नेताजी कदम


विद्यापीठाच्या ग्रंथमहोत्सवात आज एक अनोखा व दुर्मिळ प्रसंग अनुभवास आला. विद्यापीठाच्या दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. नितीन रणदिवे हे ग्रंथ महोत्सवात खरेदीसाठी पुस्तकांची पाहणी करीत होते. येथील यशवंत बुक स्टॉलमध्ये दुर्मिळ आणि नामवंत लेखकांची पुस्तके ५०% सवलतीत देण्यात येत आहेत. तेथे विविध पुस्तके चाळत असताना ज्येष्ठ विचारवंत आ.ह.साळुंखे यांचे सर्वोत्तम भूमिपुत्र: आक्षेप- डॉ.आंबेडकरांची विचारधारा आणि लेखकाची भूमिकाहे पुस्तक नजरेस पडले. ते त्यांनी कुतुहलाने हातात घेऊन चाळले असता त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. त्याचे कारण असे की, त्यांच्या पत्नी विजया यांनी २०१५च्या व्हॅलेंटाईन डे ला त्यांना हे पुस्तक भेट दिले होते. त्यावर त्यांनी नितीन यांचे नाव लिहून स्वाक्षरी केली होती. त्यांच्याकडून कोणी तरी हे पुस्तक वाचण्यासाठी म्हणून घेऊन गेले होते, मात्र परत न करता रद्दीत घातले होते. तेच पुस्तक यशवंत बुक स्टॉलवर आठ वर्षांनी परत मिळाल्याचा आनंद डॉ. रणदिवे यांनी व्यक्त केला मात्र पुस्तक नेणाऱ्याच्या कृतीबद्दल त्यांना विषादही वाटला. ही बाब समजताच यशवंत बुक स्टॉलच्या नेताजी कदम यांनी त्यांच्याकडून कोणतीही किंमत न आकारता ते त्यांना पुन्हा भेट दिले. अशा प्रकारे डॉ. रणदिवे यांना त्यांची व्हॅलेंटाईन गिफ्ट विद्यापीठाच्या ग्रंथमहोत्सवामुळे आठ वर्षांनी परत मिळाली.

No comments:

Post a Comment