कोल्हापूर, दि.0८ डिसेंबर - भारतीय बँका आणि डाक घरे हे आर्थिक समावेशन योजनांद्वारे समाजाचा विकास करण्याची मोठी जबाबदारी पार पाडत आहेत. त्याच बरोबर समाजाच्या विकासामध्येही यांचे मोठे योगदान आहे, असे प्रतिपादन बँक ऑफ इंडियाचे क्षेत्रीय व्यवस्थापक राजीव कुमार सिंग यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन सभागृहामध्ये आयोजित डॉ.प्रताप खोत आणि डॉ.केदार मारूलकर लिखित 'कोल्हापूर जिल्हयातील पोस्ट ऑफिसेसच्या माध्यमातून आर्थिक समावेशन' या पुस्तकाचे प्रकाशन समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून क्षेत्रीय व्यवस्थापक राजीव कुमार सिंग बोलत होते.याप्रसंगी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
राजीव कुमार सिंग पुढे म्हणाले, शिवाजी विद्यापीठाच्या माध्यमातून संलग्नित महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना आणि सर्व सामान्य लोकांना आर्थिक साक्षर करणे ही आजच्या काळाची गरज निर्माण झालेली आहे.समाजाच्या उत्कर्षासाठी विद्यापीठ आणि वित्तीय संस्था एकत्र येवून कार्य करणे आवश्यक आहे.भारतीय डाक घरांमध्ये बैंकिंग सुविधा उपलब्ध होण्यासाठी अमुलाग्र बदल घडून येत आहे.ग्राहकोपयोगी विविध सुविधांही उपलब्ध करून देण्यात येत आहेत.डाक घरांमध्ये होवू घोतलेला हा बदल देशाच्या प्रगतीच्या दृष्टीने फार महत्वपूर्ण आहे.
कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के अध्यक्षीय मनोगतामध्ये म्हणाले, देशाच्या विकासामध्ये डाक घरांचे मोठे योगदान आहे. विद्यापीठ आणि महाविद्यालयातील प्राध्यापकांकडून संशोधन प्रबंधांचे रूपांतर पुस्तक प्रकाशामध्ये होणे ही बाब समाज हिताच्यादृष्टीने विद्यापीठासाठी भूषणावह आहे.कोल्हापूर जिल्हयामध्ये शहरी आणि ग्रामीण व दूर्गम भागांमध्ये पोहचलेल्या डाक घरांची संख्या जवळपास 563 इतकी आहे आणि त्यामध्ये सेवा देणारे एक हजारहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत.ग्रामीण आणि दूर्गमभागामध्ये सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचून संदेशवहन, पत्रव्यवहार आणि अर्थ पुरवठा करणारी ही एक सामाजिक अर्थ वाहिनीच आहे.आवर्ती ठेव, बचत खाते, टाईम डिपॉझीट, मासिक उत्पन्न बचत योजना, ज्येष्ठ नागरीक बचत योजना, पीपीएफ, किसान विकास पत्र, सुकन्या समृध्दी योजना, पीएलआय, ग्रामीण पोस्टल लाईफ इन्शुरन्स प्रामुख्याने या योजनांचा समावेश डाक घरांमार्फत पुरविण्यात येत असलेल्या योजनामध्ये होतो. पत्रव्यवहार, ऑनलाईन बैंकींग, पैसे हस्तांतरण, स्टॅम्प, मोबाईल बैंकींग, बिझनेस सर्व्हीसेस, क्युआर कार्ड, रिटेल सर्व्हीसेस, सोशल सिक्युरीटी स्किम, कोअर बैंकींग, आधार एनेबल पेमेंट सिस्टीम, आधार अपडेशन, डोअर स्टेप सर्व्हीसेस या सेवांद्वारे सर्वसामान्य लोकांचा विश्वास संपादन करण्यामध्ये डाक घरे अग्रेसर झालेली आहेत.डाक घर सेवक हे वित्तीय सल्लागार म्हणूनही कामे पहातात. ज्या ठिकाणी बैंकांना पोहचण्यामध्ये काही मर्यादा येतात त्या ठिकाणी हमखास डाक घरे कार्यरत आहेत.त्यामुळे डाक घरांना नाविण्यपूर्ण योजनांमार्फत सेवासुविधा पूरविणे शक्त होत आहे.अद्यापही, काही प्रमाणात सामान्य जनतेपर्यंत विविध योजना पोहचण्यासाठी डाक घरांनी विशेष प्रयत्न करणे आवश्यक आहे त्यासाठी हे पुस्तक निश्चित उपयुक्त ठरेल, अशी अशा आहे.
यावेळी प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद पाटील आणि वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ.श्रीकृष्ण महाजन यांनी मनोगत व्यक्त केले.पुस्तकाचे लेखक डॉ.प्रताप खोत हे विद्यापीठाच्या यशवंतराव चव्हाण रूरल डेव्हल्पमेंट (एमबीए प्रोग्राम) येथे सहा.प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.
डॉ.प्रताप खोत यांचे मार्गदर्शक आणि पुस्तकाचे लेखक डॉ.केदार मारूलकर यांनी प्रस्तावना केली.डॉ.प्रताप खोत यांनी आभार मानले.
ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ.जे.एफ.पाटील हे डॉ.मारूलकरांचे मार्गदर्शक होते. डॉ.पाटील यांच्या मार्गदर्शनाखालीच डॉ.मारूलकर यांनी पीएचडीचे शोध प्रबंध सादर करून त्याचे पुस्तक प्रकाशित केले होते. आज, (दि ०७ डिसेंबर) डॉ.पाटील यांचे प्रथम पुण्यस्मरण दिवशीच डॉ.प्रताप खोत यांनी डॉ.मारूलकरांच्या मार्गदर्शनाखाली सादर केलेल्या पीएचडी शोध प्रबंधाचे पुस्तक प्रकाशन करण्यात आले.
यावेळी बैंक ऑफ इंडिया चेअरचे समन्वयक डॉ.राजन पडवळ, डॉ.दिपा इंगवले, डॉ.कविता वड्राळे, डॉ. संतोष सुतार, डॉ. वैशाली भोसले, डॉ. अमोल कांबळे, डॉ. तेजपाल मोहारेकर, डॉ. तेजस्वीनी मोहारेकर, डॉ. शोभा चाळके, डॉ. पल्लवी कोडक यांचेसह विविध अधिविभागांचे शिक्षक उपस्थित होते.
-----
No comments:
Post a Comment