Wednesday, 20 December 2023

शिवराज्याभिषेक ही महाराष्ट्राच्या इतिहासातील तेजस्वी घटना: डॉ. जयसिंगराव पवार

 शिवाजी विद्यापीठात तीन दिवसीय मराठा इतिहास संशोधन परिषदेस प्रारंभ

शिवाजी विद्यापीठात आयोजित मराठा इतिहास संशोधन राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन समारंभात बीजभाषण करताना ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार. मंचावर (डावीकडून) डॉ. नीलांबरी जगताप, डॉ. अवनीश पाटील, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, श्रीमंत शाहू छत्रपती महाराज व उपसंचालक हेमंत दळवी.

शिवाजी विद्यापीठात आयोजित मराठा इतिहास संशोधन राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन समारंभात बीजभाषण करताना ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार. मंचावर (डावीकडून) कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, श्रीमंत शाहू छत्रपती महाराज व उपसंचालक हेमंत दळवी.


कोल्हापूर, दि. २० डिसेंबर: शिवराज्याभिषेक ही महाराष्ट्राच्या इतिहासातील तेजस्वी घटना आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी आज येथे केले.

शिवराज्याभिषेक दिन व स्वराज्य स्थापना दिन यांच्या ३५० व्या वर्धापन वर्षानिमित्त मराठा इतिहास संशोधनाचा कक्षाविस्तार या विषयावरील तीन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन आज विद्यापीठात श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते झाले. या समारंभात शिवराज्याभिषेक या विषयावर बीजभाषण करताना डॉ. पवार बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते, तर प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील आणि पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाचे उपसंचालक हेमंत दळवी यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. पवार म्हणाले, कृष्णाजी सभासद यांनी बखरीमध्ये नोंदविल्यानुसार, चोहो दिशांना सर्वत्र मुस्लीम शाह्यांचे राज्य असताना छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव मराठे राजे झाले, ही काही सामान्य बाब नव्हती. महाराष्ट्रात राज्याभिषेकाची कोणतीही पूर्वपिठिका नसताना महाराजांना ही संकल्पना सुचणे ही देखील एक क्रांतीकारक घटना होती. त्यातून त्यांचे द्रष्टेपण अधोरेखित होते. राज्याभिषेकाची संकल्पना गागाभट्टाची मानणे गैर आहे. गागाभट्टाने महाराष्ट्रातील राज्याभिषेकाच्या विरोधकांना शांत करण्याचे महत्त्वाचे काम केले आणि दुसरे म्हणजे श्री शिवराज्याभिषेक प्रयोगः ही पुस्तिका निर्माण केली. हे त्याचे योगदान मात्र नाकारता येणार नाही.

शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ही त्यांनी घडवून आणलेली मनो-राजकीय (Psycho-political) क्रांती असल्याचे सांगून डॉ. पवार पुढे म्हणाले, मराठ्यांत पिढ्यानपिढ्या रुजलेली गुलामीची मानसिकता दूर करून भूमीपुत्र म्हणून जबाबदारीची भूमिका बजावण्यासाठी त्यांनी सज्ज व्हावे, अशी महाराजांची भावना आणि अपेक्षा होती. मराठ्यांनी महाराजांची ही भावना सार्थ ठरविल्याचे पुढे सिद्ध झाले. संभाजी महाराजांच्या माघारी मराठा स्वराज्य संपल्यातच जमा झाल्याचे वातावरण असताना मराठ्यांनी औरंगजेबासारख्या पातशहाला २६ वर्षे झुंजत ठेवले. ही साधी गोष्ट नव्हती. मराठ्यांनी फिनिक्सप्रमाणे भरारी मारत आपले लढवय्येपण सिद्ध केले. महाराजांनी घडविलेल्या या क्रांतीमधून मराठ्यांना नवी ओळख प्रदान करणारे, नव्या आकांक्षा रुजविणारे आणि देशाच्या भवितव्याला दिशा देणारे नवे युग जन्माला आले.

यावेळी श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी मराठा इतिहासाचा वेध घेणाऱ्या या परिषदेला उद्घाटनपर शुभेच्छा दिल्या.

अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, शिवराज्याभिषेक दिनाचा ३५० वा वर्धापन साजरा करण्यासाठी विद्यापीठ अनेकविध उपक्रम राबवित आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष सहभागी होऊन योगदान द्यावे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विविध पैलूंविषयी संशोधन करण्यासाठी फेलोशीप देण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. त्याचा लाभ इतिहासाच्या संशोधक विद्यार्थ्यांनी जरुर घ्यावा. त्याचप्रमाणे मराठ्यांच्या केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर महाराष्ट्राबाहेरील इतिहासाबाबतही संशोधन करण्याची गरज आहे. त्या दृष्टीने सदरची राष्ट्रीय परिषद उपयुक्त भूमिका पार पाडेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. या परिषदेच्या निमित्ताने आयोजित शिवकालीन शस्त्रप्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

कार्यक्रमाच्या सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस श्रीमंत शाहू महाराज यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी डॉ. नीलांबरी जगताप यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. स्नेहल पाटील यांनी सूत्रसंचालन केले, तर इतिहास अधिविभाग प्रमुख डॉ. अवनीश पाटील यांनी आभार मानले.

परिषदेत विविध विषयांवर होणार चर्चा

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाचे पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालय आणि शिवाजी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या परिषदेत मराठा इतिहासाचा सामाजिक-आर्थिक, सामाजिक-सांस्कृतिक, संदर्भसाधने व स्रोत, पुरातत्त्व, कला व स्थापत्य, लष्करी इतिहास, मराठा व युरोपियन अशा अनेक अंगांनी संशोधकीय वेध घेण्यात येणार आहे. त्यामध्ये देशभरातील मान्यवर इतिहास संशोधक उपस्थित राहून सहभागी होणार आहेत. २२ डिसेंबर रोजी ४.३० वाजता डॉ. अशोक चौसाळकर, पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाचे संचालक तेजस गर्गे, इतिहास अधिविभाग प्रमुख डॉ. अवनीश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत परिषदेचा समारोप होईल. या परिषदेच्या निमित्ताने युको बँकेशेजारील शिवाजी विद्यापीठ संग्रहालय संकुलामध्ये शिवकालीन शस्त्रास्त्रांचे विशेष प्रदर्शन आयोजित केले आहे.

No comments:

Post a Comment