शिवाजी विद्यापीठामध्ये मराठा इतिहासावरील राष्ट्रीय परिषद संपन्न
कोल्हापूर,
दि. २३ डिसेंबर: इतिहासाच्या अभ्यासक व
संशोधकांनी इतिहासाची वस्तुनिष्ठ व परखड मांडणी करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन
ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर यांनी काल येथे केले.
महाराष्ट्र
शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग, पुरातत्त्व आणि वस्तुसंग्रहालय संचालनालय आणि
शिवाजी विद्यापीठाचे छत्रपती शाहू महाराज मराठा इतिहास अभ्यास केंद्र यांच्या
संयुक्त विद्यमाने
शिवराज्याभिषेक दिन व स्वराज्य स्थापना दिन यांच्या ३५० व्या वर्धापन वर्षानिमित्त
‘मराठा इतिहास संशोधनाचा कक्षाविस्तार’ या विषयावरील तीन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचा
समारोप विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र सभागृहात झाला. त्यावेळी डॉ. चौसाळकर बोलत
होते.
डॉ.
चौसाळकर म्हणाले, सद्यस्थितीत इतिहास ही ज्ञानशाखा धोक्याच्या विळख्यात सापडली
आहे. अस्मितादर्शी राजकारणासाठी इतिहासाचा गैरवापर करण्यात येत आहे. यापासून अभ्यासक,
संशोधकांसह समाजानेही सावध व सजग असायला हवे. वस्तुनिष्ठ इतिहास लोकांसमोर
आणण्यासाठी प्रयत्नरत राहण्याबरोबरच प्रसंगी परखड भूमिका घेतली जाणेही आवश्यक आहे.
खोटा इतिहास पसरविण्यासाठी समाजमाध्यमांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो आहे.
हेही रोखले जायला हवे. अनेक तोतया इतिहासकार आपल्या स्वार्थासाठी इतिहासाचा वापर करून
घेत आहेत. त्यांनाही रोखण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
समारोप
समारंभास पुण्याचे डॉ. सी.आर. दास, डॉ. चंद्रकांत अभंग, जम्मू विद्यापीठाचे डॉ.
जिगर मोहम्मद, अलिगढ विद्यापीठाचे डॉ. इश्रत आलम, डॉ. वर्षा शिरगांवकर, डॉ. उदय
सुर्वे आदी उपस्थित होते.
या
तीन दिवसीय राष्ट्रीय परिषदेसाठी देशभरातून विविध विद्यापीठांतील अनेक तज्ज्ञ,
अभ्यासक उपस्थित राहिले आणि त्यांनी मराठा इतिहासाच्या अनुषंगाने शोधनिबंध सादर
केले. मराठा इतिहासाची साधने, इतिहास लेखन, मराठा इतिहासातील आर्थिक पैलू,
सामाजिक- सांस्कृतिक इतिहास, पुरातत्त्व, कला आणि स्थापत्य, मराठा युरोपियनांचे
आपापसातील संबंध, लष्करी इतिहास अशा विविध विषयांवरील दर्जेदार शोधनिबंधांचा त्यात
समावेश होता. या परिषेदेच्या औचित्याने मराठाकालीन कागदपत्रांवर नव्याने प्रकाश
टाकण्यात आला.
यावेळी
परिषदेस उपस्थित पाहुण्यांसाठी मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.
शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शनही शिवाजी विद्यापीठ संग्रहालय संकुल येथे भरवण्यात
आले होते. या प्रदर्शनाला विद्यार्थ्यांचा व नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. परिषदेसाठी
शिवाजी विद्यापीठांतर्गत महाविद्यालयांतील शिक्षक व संशोधक विद्यार्थ्यांचीही
लक्षणीय उपस्थिती लाभली.
परिषद
यशस्वी होण्यासाठी समन्वयक डॉ. नीलांबरी जगताप, कोल्हापूर वस्तुसंग्रहालयाचे
सहाय्यक संवर्धक उदय सुर्वे आणि इतिहास अधिविभाग प्रमुख डॉ. अवनीश पाटील यांनी परिश्रम
घेतले.
No comments:
Post a Comment