Friday, 29 December 2023

संशोधकीय दृष्टीकोन रुजविण्यामध्ये ‘अन्वेषण’ उपयुक्त: डॉ. अमरेंद्र पाणी

 निकालात महाराष्ट्रातील विद्यापीठांची आघाडी

शिवाजी विद्यापीठात आयोजित दोेनदिवसीय अन्वेषण संशोधन महोत्सवाच्या समारोप समारंभात बोलताना भारतीय विद्यापीठ महासंघाचे डॉ. अमरेंद्र पाणी. मंचावर (डावीकडून) डॉ. प्रकाश गायकवाड, डॉ. कविता ओझा, कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, डॉ. उषा राय नेगी, कुलसचिव डॉ. विलास शिंदे.

शिवाजी विद्यापीठात आयोजित दोेनदिवसीय अन्वेषण संशोधन महोत्सवातील विविध गटांतील विजेत्यांसमवेत  भारतीय विद्यापीठ महासंघाचे डॉ. अमरेंद्र पाणी, कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, डॉ. उषा राय नेगी, डॉ. प्रकाश गायकवाड, डॉ. कविता ओझा आदी. 


कोल्हापूर, दि. २९ डिसेंबर: देशभरातील तरुणाईमध्ये संशोधकीय दृष्टीकोन आणि सृजनशीलता यांना चालना देण्यामध्ये अन्वेषण संशोधन महोत्सव अत्यंत उपयुक्त ठरतो आहे, हे या स्पर्धेला वर्षागणिक वाढत्या प्रतिसादामधून स्पष्ट झाले आहे, असे प्रतिपादन भारतीय विद्यापीठ महासंघाचे (एआययू) सहसंचालक व संशोधन विभागाचे प्रमुख डॉ. अमरेंद्र पाणी यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठात एआययू, संगणकशास्त्र अधिविभाग आणि विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोनदिवसीय अन्वेषण विद्यार्थी संशोधन महोत्सव-२०२३च्या समारोप समारंभात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते, तर एआययूच्या सहाय्यक संचालक डॉ. उषा राय नेगी आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील प्रमुख उपस्थित होते. या कार्यक्रमात विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिकेही प्रदान करण्यात आली. निकालामध्ये महाराष्ट्रातील विद्यापीठांनी आघाडी नोंदविली.

डॉ. पाणी म्हणाले, अन्वेषण संशोधन महोत्सव हा देशभरातील संशोधक तरुणाईमध्ये एक लोकप्रिय मंच म्हणून पुढे येत आहे. २००७ पूर्वी महाराष्ट्रातील आविष्कार संशोधन स्पर्धा वगळता देशात एकही संशोधन, नवसंशोधन वा नवोन्मेषाला प्रोत्साहन देणारी स्पर्धा नव्हती. ही उणीव दूर करण्यासाठी भारतीय विद्यापीठ महासंघाने अन्वेषण संशोधन महोत्सव देशभरात आयोजित करण्यास सुरवात केली. याला देशातील तरुण संशोधकांचा प्रचंड प्रतिसाद लाभत असून त्याद्वारे दर्जेदार संशोधने साकार झालेली आहेत. या स्पर्धेची व्याप्ती आता आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत वाढविण्यात येत असून त्यामध्ये अशा राष्ट्रीय संशोधन स्पर्धा ज्यात आंतरराष्ट्रीय संशोधक विद्यार्थी सहभागी होतील, अशा आंतरराष्ट्रीय स्पर्धा ज्यात राष्ट्रीय संशोधक सहभागी होतील आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संशोधक तरुणाईला एकल पद्धतीनेही सहभागी होता येईल, अशा तीन प्रकारे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. शिवाजी विद्यापीठाने या स्पर्धेचे यजमानपद अत्यंत यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल त्यांनी कुलगुरू डॉ. शिर्के यांच्यासह विद्यापीठ परिवाराला धन्यवाद दिले.

अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, एखाद्या विषयावर संशोधन करीत असताना आपण अनेक प्रश्नांची उत्तरे सहजरित्या देतो. मात्र, सर्वसामान्यांच्या ज्या साध्यासोप्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला तितक्या सहजपणे देता येत नाहीत, त्या प्रश्नांना भिडून त्यांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न तरुण संशोधकांनी भावी आयुष्यात करावा. अस्वस्थ करणाऱ्या प्रश्नांपासून पळून न जाता, त्यांना सामोरे जा. विकास ही अत्यंत व्यापक संकल्पना आहे. प्रत्येक संशोधकाने स्वतःच्या संशोधनापुरती विकासाची व्याख्या शोधावी आणि तो विकास साध्य करण्यासाठी कार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांनी, अन्वेषण महोत्सवात सादर केलेल्या नाविन्यपूर्ण संकल्पनांचे समाजोपयोगी तंत्रज्ञानात व अल्पखर्चिक व्यावसायिक उपयोजनात रुपांतरण करण्यासाठी युवा संशोधकांनी प्रयत्न करावा, असे सांगितले.

यावेळी मंचावर कुलसचिव डॉ. विलास शिंदे, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. प्रकाश गायकवाड उपस्थित होते. सुरवातीला समन्वयक डॉ. कविता ओझा यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. अहवाल वाचन डॉ. कबीर खराडे यांनी केले. राजेंद्र अतिग्रे यांनी निकाल वाचन केले. तृप्ती भापकर यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. विजयकुमार कुंभार यांनी आभार मानले. कार्यक्रमास विषयतज्ज्ञ, संघ प्रमुख, देशभरातून आलेले परीक्षक, समन्वयक संघातील शिक्षक, प्रशासकीय सेवक, पश्चिमा विभागातील पाच राज्यांतून आलेले संशोधक विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सदर महोत्सवात पदवी स्तरापासून ते पीएचडी संशोधकांपर्यंतच्या अभिनव संकल्पनांवर आधारित संशोधन प्रकल्पांचा समावेश राहिला. पश्चिम विभागामधील महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, गुजरात व राजस्थान या पाच राज्यांतील ११ विद्यापीठांच्या एकूण १०८ संशोधक विद्यार्थ्यांनी महोत्सवात सहभाग घेतला. त्यांनी एकूण ६४ संशोधन प्रकल्प सादर केले. या पश्चिम विभागीय अन्वेषण संशोधन स्पर्धेचा अंतिम निकाल विभागनिहाय गुणानुक्रमे असा-

सामाजिक विज्ञान व मानव्यशास्त्रे: प्रथमेश पंडित खेडकर (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे), गौरव पांडे, ऋतुजा जगतकर, स्नेहा कुमारी, गिन्नी केवलरमाणी (मुंबई विद्यापीठ, मुंबई), हर्षाली राठोड, शिवानी नरसीकर, प्रेम बिडवे (एम.जी.एम. विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर).

आरोग्य विज्ञान व संलग्न क्षेत्रे: सोपान नांगरे, (कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव), मानस मोरेश्वर महाले (मुंबई विद्यापीठ, मुंबई), अनुष्का शिंदे, श्रेया लोहकरे, निखिल मराठे (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे).

मूलभूत विज्ञान व उपयोजित विज्ञान: सर्गुण तुषार बासराणी (डी.वाय. पाटील विद्यापीठ, कोल्हापूर), अवंती पुराणिक, श्रावणी निघोत, प्रज्ञा मगदूम (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे), सुरजीत घनश्याम अडगळे (शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर).

अभियांत्रिकी व तंत्रज्ञान: लीना चौधरी (डी.वाय. पाटील विद्यापीठ, कोल्हापूर), टोनी थॉमस, जस्टिना चतुर्वेदी, राझी शेख (डॉ. होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटी, मुंबई), दीपकुमार पटेल, मानन पटेल, झील पटेल, हिलाय पटेल (गणपत युनिव्हर्सिटी, गुजरात).

कृषी व संलग्न क्षेत्रे: ओम मनोज यादव (मुंबई विद्यापीठ, मुंबई), शंकर मोरे, साईनाथ सूर्यवंशी (स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड), भाविक चौधरी, ध्रुव सोनी, मितकुमार पटेल, साहील अमीन (गणपत युनिव्हर्सिटी, गुजरात).

आंतरविद्याशाखीय संशोधन: नामदेव ठोंबरे (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे), संकेत पवार, दीपांशु शर्मा (एमजीएम विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर), तेजस पाटील (कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव).

 

 

No comments:

Post a Comment