विद्यार्थिनींसाठी साकारणार स्वतंत्र अभ्यासिका
(कै.) अॅड. रुपाली पणदूरकर |
कोल्हापूर, दि. २१ डिसेंबर: शिवाजी विद्यापीठाचे निवृत्त भूगोल अधिविभाग प्रमुख व ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ डॉ. (अॅड.) राम पणदूरकर व त्यांच्या पत्नी हेमकिरण यांनी पेन्शन बचतीतून साठविलेली पुंजी रु. ३५ लाख आपली एकमेव अपत्य दिवंगत डॉ. (अॅड.) रूपाली पणदूरकर यांच्या स्मरणार्थ कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्याकडे सुपूर्द केली. या देणगीमधून शिवाजी विद्यापीठातील 'कमवा व शिका’ विद्यार्थिनी वसतिगृह परिसरात विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र
अभ्यासिका बांधण्यात येणार आहे. नवीन वर्षात ही अभ्यासिका साकार होईल.
अॅड. रूपाली पणदूरकर यांनी सर्व शिक्षण शिवाजी विद्यापीठातून पूर्ण केले. वयाच्या अवघ्या ३० व्या वर्षी त्यांनी ‘महाराष्ट्रातील
बालगुन्हेगारीचा सामाजिक व कायदेविषयक अभ्यास’ या विषयावर शोधप्रबंध सादर
करून कायदे विषयात पीएच.डी. मिळविली होती. सतारवादनाचे शास्त्रशुद्ध शिक्षण गांधर्व महाविद्यालयातून घेऊन सार्वजनिक व्यासपीठांवरुन सतारवादनाचे कार्यक्रम केले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या "न्यायदीप" या संशोधन पत्रिकेत त्यांचे अभ्यासपूर्ण
संशोधन लेख सन्मानपूर्वक प्रसिद्ध झाले होते. त्यांनी २००१ पासून १४ वर्षे कोल्हापूर दिवाणी न्यायालयात वकीली केली.
अॅड. रुपाली यांची उद्या (दि.
२२ डिसेंबर) जयंती आहे. या जयंतीच्या पूर्वसंध्येला पणदूरकर दांपत्याने कुलगुरू
डॉ. दिगंबर शिर्के यांची त्यांच्या दालनात भेट घेऊन ३५ लाख रुपयांच्या देणगीचा
धनादेश सुपूर्द केला. कुलगुरू डॉ. शिर्के यांनी पणदूरकर दांपत्याच्या
दातृत्वाबद्दल शिवाजी विद्यापीठाच्या वतीने कृतज्ञता व्यक्त केली. या प्रसंगी
प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, व्यवस्थापन परिषद सदस्य
सिद्धार्थ शिंदे, स्वागत परुळेकर, वरदराज बापट, प्रा. एस.के. पवार, अॅड. अमोल रणसिंग उपस्थित होते.
मातापित्यांच्या दातृत्वाची पुनर्प्रचिती: कुलगुरू डॉ. शिर्के
शिवाजी विद्यापीठाचे माजी भूगोल विभाग प्रमुख डॉ. राम
पणदूरकर यांनी आपली दिवंगत कन्या अॅड. रुपाली यांच्या
स्मरणार्थ विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र अभ्यासिका निर्मितीसाठी ३५ लाख रुपयांची
देणगी दिली, ही गहिवरून टाकणारी बाब आहे. मुलीच्या माघारी समाजातील लेकीबाळींना तिच्या
स्थानी मानून त्यांच्यासाठी काही तरी भरीव उभे करण्याचे दातृत्व पणदूरकर
दांपत्याने दाखविले आहे. गत वर्षी माजी सहाय्यक कुलसचिव पंडित मारुलकर यांनीही
त्यांच्या मुलीच्या स्मृतीप्रित्यर्थ दिलेल्या देणगीतून संशोधक विद्यार्थिनींसाठी ‘अस्मिता’ वसतिगृह उभारण्यात आले आहे.
पणदूरकर दांपत्यामुळे मातापित्यांच्या दातृत्वाची पुनर्प्रचिती आली, अशी भावना
कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी यावेळी व्यक्त केली.
No comments:
Post a Comment