Wednesday, 13 December 2023

‘वसुंधरा’कडून पर्यावरणपूरक उपक्रमांना गती: वीरेंद्र चित्राव

 विद्यापीठात १३व्या किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन

शिवाजी विद्यापीठात आयोजित १३व्या किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. मंचावर (डावीकडून) वीरेंद्र चित्राव, धीरज जाधव, सी.जी. रानडे, शरद आजगेकर, डॉ. रसिया पडळकर, डॉ. आसावरी जाधव.


शिवाजी विद्यापीठात आयोजित १३व्या किर्लोस्कर वसुंधरा चित्रपट महोत्सवांतर्गत मांडण्यात आलेल्या पर्यावरणविषयक प्रदर्शनाची पाहणी करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. सोबत वीरेंद्र चित्राव, डॉ. रसिया पडळकर, धीरज जाधव, सी.जी. रानडे, शरद आजगेकर व डॉ. आसावरी जाधव. 



कोल्हापूर, दि. १३ डिसेंबर: वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाने कोल्हापूरसह राज्यभरात पर्यावरणपूरक उपक्रमांना गती देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे, असे गौरवोद्गार महोत्सवाचे संचालक वीरेंद्र चित्राव यांनी आज येथे केले. शिवाजी विद्यापीठ आणि किर्लोस्कर उद्योग समूह यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या १३ वा वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आज विद्यापीठाच्या वि.स. खांडेकर भाषा भवनात उद्घाटन झाले. या समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते.

यावेळी मंचावर किर्लोस्कर उद्योग समूहाचे व्हाईस प्रेसिडेंट सी. जी. रानडे, मनुष्यबळ विकास विभागाचे प्रमुख धीरज जाधव, पर्यावरण शास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ. आसावरी जाधव, समन्वयक शरद आजगेकर डॉ. रसिया पडळकर उपस्थित होते.

श्री. चित्राव म्हणाले, वसुंधरा महोत्सवाने कोल्हापूर परिसरात पर्यावरणविषयक जाणिवांचा प्रसार करण्याची भूमिका बजावली. महोत्सवात सादर होणाऱ्या विविध चित्रकृतींच्या माध्यमातून जगभरातले प्रयोग स्थानिकांपर्यंत पोहोचले. त्यामधून प्रेरणा घेऊन अनेक तरुण पर्यावरण चळवळीत कार्यरत झाले. या महोत्सवाच्या माध्यमातून आजवर कोल्हापूरमध्ये राबविण्यात आलेले पर्यावरणपूरक उपक्रम राज्यात सर्वत्र गौरवले गेले आहेत. आता या महोत्सवाशी शिवाजी विद्यापीठ जोडले गेल्यामुळे भविष्यात विद्यापीठाच्या सहकार्याने ते जास्तीत जास्त युवा पिढीपर्यंत पोहोचवण्यात यश येईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. चित्राव यांनी महोत्सवाच्या 'सकस अन्न, समृद्ध निसर्ग, आणि आरोग्यपूर्ण समाज' या संकल्पनेची माहिती दिली.

वसुंधरा महोत्सवाचे उदघाटन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते झाले. आपल्या अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. शिर्के यांनी विद्यापीठाच्या शाश्वत धोरणासंदर्भात मांडणी केली. विद्यापीठ राबवित असलेल्या जल संधारण, ऊर्जा बचत आणि हरित परिसर या उपक्रमांसह भविष्यातीलही पर्यावरणपूरक योजना योजना सांगितल्या. किर्लोस्कर आणि शिवाजी विद्यापीठ या दो समविचारी संस्था एकत्र आल्यामुळे आता पर्यावरणपूरक बाबी समाजातील तळागाळापर्यंत पोचवता येतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. उद्योग आणि विद्यापीठ यांच्या संयुक्त प्रयत्नातून पर्यावरणाच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकताही त्यांनी व्यक्त केली.

यावेळी श्री. रानडे यांनी किर्लोस्कर उद्योग समूहाच्या हरित उपक्रमांची, तर धीरज जाधव यांनी समूहाच्या सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमांची माहिती दिली. डॉ. आसावरी जाधव यांनी प्रस्ताविकात पर्यावरण शास्त्र विभागाच्या उपक्रमांची माहिती दिली.

महोत्सवात फोटोग्राफी स्पर्धा, चित्र - शिल्प प्रदर्शन, पर्यावरणपूरक सेवा प्रदर्शन असे विविध उपक्रम आयोजित केले आहेत. पुढील दोन दिवसांत (१४ १५ डिसेंबर) नवीन चित्रपट, चर्चासत्र व प्रदर्शनाचा आस्वाद रसिकांना घेता येणार आहे.

No comments:

Post a Comment