Saturday 16 December 2023

ग्रंथदिंडी, ग्रंथमहोत्सवाने विद्यापीठाच्या ६०व्या दीक्षान्त सोहळ्यास प्रारंभ

 

शिवाजी विद्यापीठाच्या ६०व्या दीक्षान्त समारंभानिमित्त आयोजित ग्रंथदिंडीस पालखीपूजनाने कमला महाविद्यालयात प्रारंभ करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के.


शिवाजी विद्यापीठाच्या ६०व्या दीक्षान्त समारंभानिमित्त आयोजित ग्रंथदिंडीने कोल्हापूर शहरात वाचनसंस्कृतीचा जागर केला.

शिवाजी विद्यापीठाच्या ६०व्या दीक्षान्त समारंभानिमित्त आयोजित ग्रंथदिंडीने कोल्हापूर शहरात वाचनसंस्कृतीचा जागर केला.

शिवाजी विद्यापीठाच्या ६०व्या दीक्षान्त समारंभानिमित्त आयोजित ग्रंथदिंडी

शिवाजी विद्यापीठाच्या ६०व्या दीक्षान्त समारंभानिमित्त आयोजित ग्रंथदिंडी विद्यापीठाच्या प्रांगणात दाखल झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या ढोल व ताशा पथकांनी फेर धरून जोरदार सादरीकरण केले.

शिवाजी विद्यापीठाच्या ६०व्या दीक्षान्त समारंभानिमित्त आयोजित ग्रंथमहोत्सवाचे दीपप्रज्वलनाने उद्घाटन करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. सोबत प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, डॉ. महादेव देशमुख, डॉ. रामचंद्र पवार, डॉ. जगदीश सपकाळे, डॉ. धनंजय सुतार, डॉ. श्रीकृष्ण महाजन, डॉ. प्रकाश बिलावर आदी.

शिवाजी विद्यापीठाच्या ६०व्या दीक्षान्त समारंभानिमित्त आयोजित ग्रंथमहोत्सवातील स्टॉलवर मांडलेल्या ग्रंथांची पाहणी करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. सोबत प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे आदी.


शिवाजी विद्यापीठाच्या ६०व्या दीक्षान्त समारंभानिमित्त आयोजित ग्रंथमहोत्सवातील विद्यापीठाच्या स्टॉलची पाहणी करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. सोबत प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन व डॉ. धनंजय सुतार.

शिवाजी विद्यापीठाच्या ६०व्या दीक्षान्त समारंभानिमित्त आयोजित ग्रंथमहोत्सवातील एमबीएच्या विद्यार्थ्यांनी मांडलेल्या स्टॉलची पाहणी करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. सोबत प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे आदी.

(शिवाजी विद्यापीठाच्या ग्रंथमहोत्सवाच्या उद्घाटनाचा व्हिडिओ)


कोल्हापूर, दि. १६ डिसेंबर: शिवाजी विद्यापीठाचा हीरकमहोत्सवी अर्थात ६० वा दीक्षान्त समारंभ येत्या सोमवारी (दि. १८) साजरा होत आहे. या सोहळ्याची सुरवात आज सकाळी ग्रंथदिंडीसह ग्रंथमहोत्सवाच्या उद्घाटनाने झाली.

शिवाजी विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभाच्या निमित्ताने आयोजित करण्यात येणारी ग्रंथदिंडी आणि ग्रंथमहोत्सव हे शहरवासियांसह विद्यार्थी-विद्यार्थिनींच्याही आकर्षणाचा केंद्रबिंदू असतात. यंदाही ग्रंथदिंडीमधील ७०० हून अधिक जणांच्या सहभागाने हीच बाब अधोरेखित केली.

आज सकाळी कमला महाविद्यालय येथे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते ग्रंथपालखीचे पूजन करण्यात आले. पालखीमध्ये भारताचे संविधान, सार्थ श्री ज्ञानेश्वरी, संत नामदेव गाथा यांसह राजा शिवछत्रपती, राजर्षी शाहू स्मरणिका, आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे ग्रंथ ठेवण्यात आले होते. तेथून टाळमृदंगाच्या गजरात दिंडीला प्रारंभ झाला. वाचनसंस्कृतीचा जागर करीत आणि प्रबोधनपर घोषणा देत दिंडी राजारामपुरीतून आईचा पुतळा आणि सायबर संस्थेमार्गे विद्यापीठाच्या प्रांगणात प्रविष्ट झाली. प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला प्रदक्षिणा घालून व अभिवादन करून पालखी अखेरीस राजमाता जिजाईसाहेब बहुउद्देशीय सभागृहात आणण्यात येऊन तेथे स्थापित करण्यात आली. पालखी मार्गावर सहभागी विद्यार्थी-विद्यार्थिनींचा उत्साह ओसंडून वाहात होता.

ग्रंथदिंडीमध्ये कुलसचिव, डॉ. विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञान स्रोत केंद्राचे संचालक डॉ. धनंजय सुतार, वाणिज्य व व्यवस्थापन अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, मानव्यशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. तानाजी चौगले, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. पी.टी.गायकवाड, निरंतर शिक्षण विभागाचे संचालक डॉ. रामचंद्र पवार, ग्रंथालय व माहितीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. सचिनकुमार पाटील, उप-ग्रंथपाल डॉ. प्रकाश बिलावर, सहाय्यक ग्रंथपाल डॉ. शिवराज थोरात, कमला महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. तेजस्विनी मुडेकर, डॉ. सुजय पाटील यांच्यासह बॅ. खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्रातील कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी, राष्ट्रीय सेवा योजनेचे विविध महाविद्यालयांतील समन्वयक आणि स्वयंसेवक मोठ्या संख्येने सहभागी झाले. ग्रंथदिंडीमध्ये डॉ. आर.पी. आढाव, डॉ. पांडुरंग पाटील, डॉ. वसंत भागवत, तानाजी कांबळे, अमित गुरव, कैलास पवार, रवींद्र मांगले, उर्मिला कदम, श्रीमती. कुंभार, स्वाती डिग्रे, नीता पाटील हे विविध महाविद्यालयांतील ग्रंथपालही सहभागी झाले.

वैविध्यपूर्ण विषयांवरील ग्रंथांची वाचकांना पर्वणी

ग्रंथदिंडीनंतर सकाळी साडेदहा वाजता विद्यापीठाच्या आमराई परिसरात कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते ग्रंथमहोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. ग्रंथालयशास्त्राचे जनक डॉ. एस.आर. रंगनाथन आणि बॅ. बाळासाहेब खर्डेकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार घालून व दीपप्रज्वलन करून हे उद्घाटन झाले. त्यानंतर प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या हस्ते विद्यापीठ प्रकाशन विभागाच्या स्टॉलचे उद्घाटन करण्यात आले. स्थानिकांसह राज्यभरातील २२ प्रकाशक व ग्रंथविक्रेते महोत्सवात सहभागी झाले आहेत. त्यांच्या माध्यमातून विविध विषयांवरील हजारो ग्रंथ वाचकांना पाहणी व खरेदीसाठी उपलब्ध आहेत. त्यामुळे ग्रंथप्रेमी व वाचनवेड्या व्यक्तींसाठी हे प्रदर्शन म्हणजे एक पर्वणीच आहे.

या सर्व स्टॉलची कुलगुरूंसह अधिकाऱ्यांनी फिरून पाहणी केली आणि सहभागींना शुभेच्छा व धन्यवाद दिले. याखेरीज हँडीहेल्प या संस्थेने दिव्यांगांनी बनविलेल्या वस्तूंच्या विक्रीचा स्टॉल मांडला आहे. या ठिकाणी अन्नपदार्थ विक्रीचे ७ स्टॉल आहेत. एम.बी.ए. अधिविभागाच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींचेही त्यात ३ स्टॉल आहेत. तसेच स्टार्टअप उपक्रमास वाहिलेलेही काही स्टॉल आहेत. या विद्यार्थ्यांना कुलगुरू डॉ. शिर्के यांनी, केवळ पदार्थ विक्री करण्याचे उद्दिष्ट बाळगू नका, तर आपले स्वतःचे बिझनेस मॉडेल कसे विकसित कराल, त्याचे सादरीकरण तयार करण्याची सूचना केली.

सदर ग्रंथमहोत्सवात उद्या (दि. १७) सकाळी ११ वाजता संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाच्या वतीने राजर्षी शाहू (सिनेट) सभागृहात स्वररंग या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे. या कार्यक्रमासह तीन दिवस चालू असणाऱ्या या ग्रंथमहोत्सवाचा रसिक वाचकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. सुतार यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment