कोल्हापूर, दि. ९ डिसेंबर: शिवाजी विद्यापीठाचे माजी विद्यार्थी तथा रायगडचे माजी खासदार व रयत शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी विद्यापीठाच्या लोकस्मृती विद्यार्थिनी वसतीगृह योजनेसाठी २५ लाख रूपयांची देणगी दिली आहे.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांची त्यांनी नुकतीच भेट घेतली. या भेटीत त्यांना विद्यापीठाच्या लोकस्मृती वसतीगृह योजनेची माहिती समजली. त्यावेळी त्यांनी २५ लाख रुपयांचा धनादेश विद्यापीठाच्या या अतिशय उपयुक्त व समाजाभिमुख योजनेसाठी कुलगुरू डॉ. शिर्के यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी कुलगुरू डॉ. शिर्के यांनी विद्यापीठाने प्रकाशित केलेल्या 'महान शिवाजी' या महाग्रंथाची प्रत भेट देऊन श्री. ठाकूर यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
शिवाजी विद्यापीठाने गोरगरीब, सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थिनींसाठी लोकसहभागातून वसतीगृह साकारण्याचा उपक्रम हाती घेतला आहे, तो स्तुत्य असल्याचे सांगून त्यामध्ये आपलाही खारीचा वाटा असावा, असे वाटल्याने आपण त्यात सहभागी होत असल्याची भावना श्री. ठाकूर यांनी याप्रसंगी व्यक्त केली.
शिवाजी विद्यापीठाच्या १९७२ च्या बॅचचे माजी विद्यार्थी असणाऱ्या रामशेठ ठाकूर यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेत 'कमवा आणि शिका' योजनेअंतर्गत शिक्षण घेतले. श्री. ठाकूर यांनी १९६८ ते १९७२ या कालावधीत रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा येथून १९७२ मध्ये मराठी विषयातून शिवाजी विद्यापीठाची बी.ए. पदवी प्राप्त केली आहे. एक कष्टाळू उद्योजक ते सामाजिक जाणीवांनी समृद्ध दातृत्वसंपन्न लोकनेता असा त्यांचा प्रवास राहिला आहे. सध्या ते रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजमेंट कौन्सिलचे सदस्य म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी १९९८ ते २००४ या कालावधीत कुलाबा लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून प्रतिनिधित्व केले आहे.
ठाकूर यांच्या दातृत्वाची प्रचिती: कुलगुरू डॉ. शिर्के
माजी खासदार रामशेठ ठाकूर हे शिवाजी विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांना विद्यापीठाच्या लोकस्मृती वसतीगृह योजनेची माहिती समजली. लोकसहभागातून मुलींसाठी वसतीगृह साकारत असल्याचे समजताच त्यांनी विनाविलंब २५ लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला, ही फार मोठी बाब आहे. त्यांच्या दातृत्वाबद्दल आजवर ऐकून होतो, मात्र या निमित्ताने त्याची प्रचितीच आली. त्यांचे हे दातृत्व अनेकांसाठी पथदर्शी स्वरूपाचे आहे. लोकस्मृती योजना त्यांच्यासारख्या अगणित दात्यांमुळे लवकरात लवकर साकार होईल, असा विश्वास कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी यावेळी व्यक्त केला.
No comments:
Post a Comment