Thursday 28 December 2023

नागरी बँकांच्या कार्यक्षमतेत सर्वांगीण वाढ आवश्यक: डॉ. महादेव देशमुख

 शिवाजी विद्यापीठात शाखा व्यवस्थापकांसाठी विशेष उद्बोधन उपक्रम


 
शिवाजी विद्यापीठात नागरी सहकारी बँकांच्या शाखा व्यवस्थापकांसाठी आयोजित मॅनेजमेंट डेव्हलपमेंट प्रोग्राममध्ये बोलताना अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख. समोर उपस्थित शाखा व्यवस्थापक.



कोल्हापूर, दि. २८ डिसेंबर: सहकार क्षेत्रातील नागरी सहकारी बँकांचे योगदान खेडोपाड्यापासून नागरी समूहापर्यंतच्या लोकांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी उल्लेखनीय आहे, पण आजची बँकिंग क्षेत्रातली स्पर्धा पाहता नागरी सहकारी बँकांच्या कार्यक्षमतेमध्ये सर्वच बाजूंनी लक्षणीय वाढ होणे गरजेचे आहे. असे झाले तरच नागरी सहकारी बँका या समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी अधिक उत्तुंग काम करू शकतील, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख यांनी काल येथे केले. शिवाजी विद्यापीठात आयोजित दोन दिवसीय मॅनेजमेंट डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या उद्घाटनाप्रसंगी अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते.

शिवाजी विद्यापीठाचे बँक ऑफ इंडिया चेअर, गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार सहकार प्रशिक्षण केंद्र आणि कोल्हापूर जिल्हा नागरी बँक सहकारी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने नागरी सहकारी बँकांच्या शाखा व्यवस्थापकांसाठी सदरचा मॅनेजमेंट डेव्हलपमेंट प्रोग्रॅम आयोजित करण्यात आला.

बँक ऑफ इंडिया चेअरचे प्राध्यापक डॉ. राजन पडवळ यांनी स्वागत केले. या दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे पहिले पुष्पही त्यांनी गुंफले. "मॉडर्न मॅनेजरियल ऍप्रोच" या विषयावर त्यांनी अवगत केले. कुंभी कासारी सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रेय राऊत यांनी उपस्थितांना आरबीआय गाईडलाईन्स व डिपॉझिट्सचे महत्त्व तसेच ऍप्राईजल ऑफ लोन प्रोपोजल याबद्दल सविस्तर माहिती दिली. दुपारच्या सत्रा पंचगंगा नागरी सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक फडणीस यांनी ब्रांच मॅनेजरच्या जबाबदाऱ्या व व्यवस्थापकीय मंडळाकडून त्यांच्याकडून असलेल्या अपेक्षा आणि कस्टमर सर्विस याबद्दल मार्गदर्शन केले. कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय शिरगावे यांनी ऑडिट्सचे विविध प्रकार आणि शाखेचा व्यवसाय कसा वृद्धिंगत करावा, याबद्दल सविस्तर माहिती दिली.

दुसऱ्या दिवशी सायबर कॉलेजच्या कौन्सिलर उर्मिला चव्हाण यांनी उपस्थितांना ब्रांच संभाळत असताना मोटिवेशनचे महत्त्व आणि संवाद कौशल्य याविषयी अवगत केले. यावेळी कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी बँकांच्या असोसिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल नागराळे यांनी प्रास्ताविक केले. डॉक्टर राजन पडवळ यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment