कोल्हापूर, दि.
१३ डिसेंबर: शिवाजी
विद्यापीठात आज भरविण्यात आलेल्या विद्यापीठस्तरीय आविष्कार संशोधन स्पर्धा
महोत्सवामध्ये विद्यार्थी व संशोधकांमधील सृजनशीलतेबरोबरच सामाजिक जाणिवांची प्रचिती
आली. सद्यस्थितीत मानवी समुदायाला भेडसावणाऱ्या व्यक्तीगत समस्यांपासून ते सामाजिक
समस्यांपर्यंत आपापल्या परीने संशोधकीय मार्गाने उत्तर देण्याचा प्रयत्न या
महोत्सवात दिसून आला. या स्पर्धेत सुमारे ३५० पदवी, पदव्युत्तर व संशोधक
विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन आपले संशोधनपर प्रकल्प, पोस्टर सादर केले. विद्यार्थी
विकास विभाग व भूगोल अधिविभाग यांनी या स्पर्धेचे संयोजन केले.
विद्यापीठ
परिक्षेत्रातील विद्यार्थ्यांमध्ये संशोधनात्मक दृष्टीकोन निर्माण करण्याचे
उद्दीष्ट बाळगून विद्यापीठ दरवर्षी आविष्कार संशोधन महोत्सव आयोजित करते. जिल्हास्तरीय
महाविद्यालयीन स्पर्धेच्या फेऱ्यांनंतर आज विद्यापीठस्तरीय आविष्कार संशोधन स्पर्धा
महोत्सव राजमाता जिजाऊसाहेब बहुउद्देशीय सभागृहात पार पडला. सकाळी कुलगुरू डॉ. दिगंबर
शिर्के यांच्या हस्ते आणि प्र-कुलगुरू, डॉ. प्रमोद पाटील व कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत
पाटील स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
पदवी,
पदव्युत्तर स्तरीय विद्यार्थी व संशोधक विद्यार्थी अशा तीन स्तरांमध्ये वर्गीकृत
असलेल्या या विद्यापीठस्तरीय आविष्कार महोत्सवात मानव्यशास्त्र, भाषा आणि कला, वाणिज्य, व्यवस्थापन आणि कायदा, विज्ञान, कृषी आणि पशुसंवर्धन, अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान तसेच
वैद्यकीय आणि फार्मसी या सहा श्रेणींमध्ये प्रकल्प सादरीकरण करण्यात आले. यामध्ये विज्ञान
व तंत्रज्ञानाच्या आधारे नागरिक, शेतकरी यांना भेडसावणाऱ्या अनेक समस्यांचे
निराकरण करण्यासाठीचे प्रकल्प होते. पर्यावरणीय समस्यांवर जैविक विघटनशील
प्लास्टीकसारखे पर्याय सादर करणारे प्रकल्पही होते. शिवाय, तृतीयपंथीयांपासून
वंचित घटकांच्या सामाजिक समावेशनासाठी, लोकांच्या मानसिक तणावावरील
उपाययोजनांपर्यंतच्या प्रकल्पांचाही समावेश होता. यामधून विद्यार्थ्यांमधील
सामाजिक जाणिवांची प्रचिती उपस्थितांना आली. कुलगुरू डॉ. शिर्के यांच्यासह
मान्यवरांनी फिरून सर्व प्रकल्पांची पाहणी केली आणि इतक्या मोठ्या संख्येने या
संशोधन स्पर्धेत सहभाग दर्शविल्याबद्दल संशोधक विद्यार्थ्यांचे अभिनंदनही केले.
यावेळी वाणिज्य
व व्यवस्थापन विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, मानव्यशास्त्र विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, आंतरविद्याशाखा अधिष्ठाता
डॉ. मेघा गुळवणी, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. प्रकाश गायकवाड, भूगोल
अधिविभागाच्या डॉ. मीना पोतदार, डॉ. जगदीश सपकाळे, राष्ट्रीय सेवा योजना संचालक
डॉ. तानाजी चौगुले, डॉ. सोमनाथ पवार आदी उपस्थित होते. विविध अधिविभागांतील तसेच महाविद्यालयांतील
शिक्षकांनी परीक्षक म्हणून तसेच समन्वयक म्हणूनही काम पाहिले.
No comments:
Post a Comment